करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !
मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ गावातील गांगुली कुटूंबात जन्मलेल्या मुलाचं नांव ठेवण्यात आलं होतं आभास. एका बंगाली भद्रलोक कुटुंबात जेवढी गाण्याची परंपरा असते, तेवढीच त्याच्या घरीही होती. लहानपणापसूच तो के. एल. सैगल यांची नक्कल करायचा नंतर ‘दादामुनी’ म्हणजे अशोक कुमार यांचा हात धरून त्यांचा हा लहान भाऊ मायानगरीमध्ये आला आणि झाला किशोर कुमार.
पण मोठ्या माणसाच्या करियरची सुरवात ही अपमानापासूनच होते हा सृष्टीचा नियमच आहे जणू. फिल्मिस्तानमध्ये बसून किशोर कुमार ‘बम चीक बम चीक’ असं काहीतरी टेबलवर वाजवत बसायचे त्यावेळी लोक त्यांची बरीच टिंगल करायचे, अशोक कुमारचा भाऊ म्हणून काय आम्ही याला सहन करायचं का..? असं उपहासाने विचारायचे. पण कोंबडं झाकलं म्हणून उजडायचं राहत नाही ना..? अगदी तसंच किशोर कुमारना पुढे सिनेमामध्ये कोरस वगैरे गायला संधी मिळू लागली.
जिद्दी, शिकारी सारख्या सिनेमामध्ये काम मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=rhKGCbzHNU4
१९५१ साली ‘आंदोलन’ नावाचा सिनेमा आला पण त्यांचे खरे करियर सुरु झाले ते १९५४ साली आलेल्या ‘नौकरी’ सिनेमामुळे. त्यात त्यांनी बिमल रॉय आणि सलील चौधरीच्या मागे लागून “छोटासा घर होगा” हे गाणे म्हटले. आता किशोर कुमारांनी स्वतःसाठी गायला सुरुवात केली म्हणजे पडद्यावर स्वतः असताना गाणे तेच म्हणणार. पण गमतीचा भाग असा की १९५९ साली आलेल्या “शरारात” नावाच्या सिनेमामध्ये “अजब है दास्तान तेरी” गाण्यात पडद्यावर किशोर कुमार आहे आणि प्लेबॅक आहे रफी साहेबांचा.
‘इना मीना डिका’ असो वा झुमरू. सगळ्याच गाण्यांनी कमाल केली. आता किशोर कुमार हे गायक म्हणूनही यशस्वी होऊ लागले होते पण तरीही ९०% गाणी ही मोहम्मद रफी आणि उरलेली गाणी बाकीचे गायक गायचे. तेव्हा किशोर कुमार ही ‘बाकी सगळे’ याच कॅटेगरीमध्ये यायचे. मग किशोर कुमार, किशोर कुमार कसे झाले याचं उत्तर एकच सचिन देव बर्मन. बर्मननी किशोरदांना सांगितले पुरे झाली सैगल साहेबांची नक्कल स्वतःचा आवाज शोध.
मग १९६९ साली एक सिनेमा आला नाव होते “आराधना” पडद्यावर राजेश खन्नाने “हे हे हा हा” म्हटलं आणि पडद्यामागे किशोर कुमारने.
त्या सिनेमाने इंडस्ट्रीला दोन सुपरस्टार दिले. नट म्हणून राजेश खन्ना आणि गायक म्हणून किशोर कुमार. दोघेही रातोरात स्टार झाले. किशोर कुमार लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. एका मासिकात तर म्हणे लोक पत्र पाठवून भांडू लागले किशोर कुमार श्रेष्ठ का रफी श्रेष्ठ..? पण किशोर कुमारना हे सगळं बघवलं नाही. त्यांनी तडक त्याच मासिकाला २ पानी पत्र लिहून सांगितलं की माझी आणि रफी साहेबांची तुलना म्हणजे मूर्खपणा आहे. त्यांनी म्हटलेल्या गाण्यांची यादी देऊन विचारले सांगा म्हणू शकतो का मी ही सगळी गाणी? तेव्हा कुठे हा वाद थांबला.
यातून कोण श्रेष्ठ हे सिद्ध झालं नसलं तरी किशोरदांचा दिलदारपणा मात्र लोकांची मनं जिंकून गेला.
किशोर कुमारच्या बाबतीत एक गोष्ट विशेष. जेव्हा ते डुएट गातात किंवा एकाच गाण्याचे मेल आणि फिमेल व्हर्जन असते तेव्हा लोकांच्या लक्षात किशोर कुमारचाच आवाज राहतो. लोकांना तो आवडतो, “रिम झिम गिरे सावन”च घ्या लता मंगेशकरांनी म्हटलेल्या गाण्यात मुंबई दर्शन जरी असलं तरी आपल्याला ते पेटी वाजवणाऱ्या अमिताभचंच आवडतं.
काही माणसं जितकी हुशार तितकी वेडी असतात किशोर कुमारही त्यांच्यातील एक. एका डायरेक्टरने किशोर कुमारची त्याच्या पडत्या काळात चेष्टा केली होती. किशोर कुमार यशस्वी झाल्यावर त्यांच्याकडे सिनेमा साइन करायसाठी तो डायरेक्टर आला. किशोरदानी सांगितलं साइन करिन पण एका अटीवर. माझ्याबरोबर पवई तलावावर चल. ते पण कुडता आणि धोतर घालून जायचं. कपाळाला नाम ओढून आणि नामावर तांदूळ पाहिजेतच. अशा अवतारात आपण दोघे दोन नावावर उभे राहायचे. एका नावेवर एक आणि दुसऱ्या नावेवर दुसरा पाय असं उभा राहूनच मी तुझा सिनेमा साइन करणार. खरंतर त्यांना तो सिनेमा करायचाच नव्हता, असे बरेच लोक होते ज्यांनी किशोर कुमारच्या पडत्या काळात त्यांची साथ सोडली पाणउतारा केला त्यांच्याबरोबर किशोर कुमारनी कधीच काम केले नाही. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी पवित्रा असो किंवा मधुबालाशी लग्न करायसाठी मुसलमान धर्म स्वीकारणे असो किशोरदा नेहमीच आपल्या मनाप्रमाणे जगले.
पडद्यावर विनोदी भूमिका करणारा हा कलाकार वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप एकाकी होता. एकदा एक पत्रकार मुलाखत घ्यायला गेली असता त्यांनी सांगितले ही माझ्या बागेतली झाडं हेच माझे मित्र. मी यांच्याशीच बोलतो. सगळ्या लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या या मायानगरीत त्यांचं मन कधीच रमलं नाही. त्यांना नेहमीच खांडव्याला जावं वाटायचं.
https://www.youtube.com/watch?v=AMuRRXCuy-4
किशोर कुमार आपल्यातून गेले ती तारिख होती १३ ऑक्टोंबर. याच दिवशी किशोर कुमार यांच्या भावाचा म्हणजेच अशोक कुमार यांचा वाढदिवस होता. किशोर कुमार चेंबूरला राहणाऱ्या अशोक कुमार यांच्या घरी जायच्या तयारीत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. अशोक कुमारांना स्वत:च्या वाढदिवसादिवशीच किशोर यांच्या जुहूतारा रोडवरच्या गौरीकुंज बंगल्याकडे धाव घ्यावी लागली.
किशोर कुमार गेला पण आजही ५ रुपया १२ आना, पल पल दिल के पास अशी बरीच गाणी आपल्याला नशा चढवत राहतात.
हे ही वाच भिडू
- देवानंद यांना काळा कोट वापरण्यावर कोर्टाने बंदी का घातली होती..?
- या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !
- विनोद खन्नाचा बाप म्हणाला होता, सिनेमाचं नाव काढलं तर गोळ्या घालेन.
- मुस्लिम असल्याने लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्यास नकार दिला होता?
Most informative as well as entertaining….keep it up….have a good luck