छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.
‘हजार वेळा पंढरी आणि एक वेळा जेजुरी’ अशी खंडोबाची वारी.
खंडोबा. महाराष्ट्रातल्याच नाही तर बेळगाव, कर्नाटक, हैदराबाद ते अगदी आंध्र प्रदेशातल्या लोकांचंही हे कुलदैवत. महाराष्ट्रात तर अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदरांचा हा देव. जेजुरी, पाली, नळदुर्ग, धावडी, शेगुड, अणदूर, धामणी, कोडथन, निमगाव अशा कितीतरी ठिकाणी खंडोबाचा कुळाचार केला जातो. ज्याचं हे कुलदैवत त्यांना देवाच्या नावानं जागरण घालणं अनिवार्य असतं.
मग नवीन घर बांधलं, विहीर खांदली, लग्न झालं की लोक आवर्जून जागरण घालतात. लग्न झाल्यावर तर हमखास. महाराष्ट्रातील अनेक घरात कुलदैवत आणि कुलस्वामिनी म्हणजे देवासोबत देवी असल्याने जागरणासोबतच गोंधळही घातला जातो. म्हणून त्याला जागरणगोंधळ म्हणतात.
परंपरेनुसार वाघ्या-मुरळी, गोंधळी, भैरवाचे भराडी किंवा सिद्धनाथाचे डवरी हा जागरण- गोंधळ घालत असे.
अशाच डवरी गोसावी समाजात जन्मालेला खंडोबाचा वाघ्या म्हणजे लोककलावंत छगन चौगुले.
डवर हे लोकवाद्य सिद्धनाथासाठी वाजवले जाते. त्याच देवाचे हे दास. म्हणून हे डवरी गोसावी. या समाजाचे पोटपाणी भिक्षुकीवर अवलंबून असल्याने तिन्ही त्रिकाळ या समाजाच्या वाट्याला दुःखच आले.
त्याच समाजात १८ सप्टेंबर १९५६ साली छगन यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या लोकवाड्मयात सोलापूरच्या अनेक दिग्गजांचे योगदान आहे. शाहीर अमर शेख, प्रल्हाद शिंदे आणि लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पातही इथलेच. याच जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नातेपुते नजीक कारुंडे हे त्यांचे गाव. वडील रामचंद्र चौगुले देवाची गाणी म्हणत उपजीविका करत.
तेव्हा अशा कामांसाठी कुणी फार पैसे देत नसे. त्यामुळे माधुकरी मागून जगणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशातच वडिलांसोबत संबळ, तुणतुणं, दिमडी वाजवत छगन चौगुलेंनी जागरण गोंधळात प्रवेश केला. परंपरेने हे चालत आल्याने काही गुण त्यांच्यात उपजतच होते. पण त्या गुणांच खरं सोनं झालं ते या मुंबापुरीत.
आता ते सोलापुरातून मुंबईला कसे आले,
तर रामचंद्ररावांचा माधुकरीवर गुजराण होत असला तरी सोलापुरातला बराचसा भाग दुष्काळी आहे त्यामुळे आर्थिक चणचण ही पाचवीला पुजलेली असायची. त्यात प्लेग, मलेरिया, हगवणीच्या वारंवार येणाऱ्या साथीने ग्रामीण जीवन हादरून गेले होते. त्यामुळे तात्कालीन परिस्थितीला कंटाळून शेतकरी, मजूर, भटके, मागासवर्गीय पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरू लागले. त्यापैकीच मुंबईत दाखल झालेले एक होते रामचंद्र चौगुले.
पूर्वी मुंबईत आलेला कष्टकरी माणूस एकतर कल्याणच्या कोळशेवाडीत राही, घाटकोपरात किंवा माटुंग्याच्या लेबर कॅम्पात. रंजलेगांजलेल्यासाठी जणू हे माहेरच. पण रामचंद्रराव मात्र आपल्या एकुलत्याएक मुलाला घेऊन पत्नीसमवेत थेट अंधेरीत दाखल झाले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी अंधेरी पूर्वेतील भाईदास मिल कंपाउंडमध्ये एक झोपडी उभारली आणि मुंबईतल्या नव्या संसाराला सुरवात झाली.
मुंबईतही ते पोटापाण्यासाठी पारंपारिक जागरण गोंधळ, अंबाबाईची गाणी, यल्ल्लामाचे मेळे, चौकभरणी, भराड, गेनमाळ असे धार्मिक कार्यक्रम करत असे. कालांतराने वडिलांसोबत छगनभाऊंचेही मन यात रमू लागले. छगन चौगुले दिसायला सावळ्यावर्णाचे असले तरी मोठं कपाळ, तरतरीत नाक, कुरळे केस, मानेवर झुपका यामुळे ते रुबाबदार दिसायचे आणि तितकाच रुबाब त्यांच्या आवाजातही येऊ लागला होता.
वडिलांसोबतच जागरण परंपरेतल्या अनेक दिग्गजांचे संस्कार त्यांच्या आवाजावर आणि ज्ञानावर झाल्याने त्यांचे कार्यक्रम अधिकच रंगू लागले होते.
छगनराव ज्या गावात कार्यक्रम करायचे त्या गावात महिनाभर तरी त्यांचीच चर्चा असायची.
हाच आवाज ८० च्या दशकात विंग्स कसेट कंपनीने हेरला.
तेव्हा रेडीओ जगतातून नुकतेच आपण पुढे सरकलो होतो आणि टेपरेकोर्डरचा जमाना आला होता. कृणाल, विंग्स, टी सिरीज, व्हीनस या कंपन्यांनी जणू लोककलावंतांना दत्तकच घेतले होते.
यातूनच प्रल्हाद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप, शाहीर साबळे, कृष्णा शिंदे आणि नंतरच्या काळात जनार्दन साठे, आनंद शिंदे, छगन चौगुले ही मंडळी घराघरात पोहोचली.
लोकगीते, कोळीगीते, भीमगीते, देवी- देवतांची गाणी याला जणू सुगीचे दिवस आले होते. छगनराव विंग्स पर्यंत कसे पोहोचले ही देखील एक धमाल गोष्ट आहे. त्याकाळी विंग्सने जागरण गोंधळाची कॅसेट काढण्यासाठी एका नामवंत जागरण पार्टीला रेकॉर्डिंगसाठी आमंत्रित केले होते.
त्या पार्टीत छगनराव कोरसमध्ये संबळ वाजवायला म्हणून गेले. कसेट रेकॉर्डिंगचा अनुभव नसल्याने काही तासांचे सादरीकरण करून पार्टी थांबली पण जागरणातली कथा अपूर्ण राहिली.
आता काय करायचं म्हणून कंपनीच्या मालकाने डोक्याला हात लावला. त्यावेळी संबळ वाजवणारे हात पुढे आले आणि मी कथा पूर्ण करतो असा विश्वास छगनरावांनी कंपनीच्या मालकाला दिला. सुरवातीला मालकाचा विश्वास बसला नाही पण जेहा छगनरावांनी सादरीकरण केले तेव्हा मात्र आपल्या हाती हिरा लागल्याची जाणीव विंग्सच्या मालकाला झाली.
पुढे छगन भाऊंनी महाराष्ट्रातील एकही लोकदैवत सोडलं नाही.
खंडोबा, जोतीबा, सिध्दनाथ, भैरवनाथ, अंबाबाई, भवानी, लक्ष्मी, काळूबाई, यल्लम्मा, सप्तशृंगी प्रत्येक देवाच्या दारात छगनरावांचं गाणं वाजलं. गार डोंगराची हवा, तुळजापूरच्या घाटात, सप्तशृंगी देवी तुला शोभती अठरा भूज, गेला बानूला आणायला, देव मल्हारी रुसून अशी कितीतरी गाणी आजही घराघरात आणि मनामनात अजरामर आहेत.
त्याचं वैशिट्य म्हणजे त्यांनी फक्त गाणी गायली नाही तर स्वतः लिहून गायली. त्यामुळे गाण्यातील शब्दरचना, ताल, लय यांची त्यांना उत्तम जाण होती. गाण्यासोबतच त्यांनी देवाची आख्यान काव्य म्हणजेच कथाही रेकोर्ड केल्या. श्रेयाळ-चांगुणा, सती अनुसया, चिल्या बाळ, नवनाथ कथा, भैरवनाथ कथा, खंडोबा म्हाळसा लगीन, परशुराम कथा एवढचं नाही तर भीमकथा आणि बुद्धकथांनाही त्यांनी प्राधान्य दिले.
कोणतेही शिक्षण नसताना जागरण परंपरेवर त्यांचा असलेला दांडगा अभ्यास हा त्यांच्या प्रतिभेची जाणीव करून देणारा आहे.
त्यांनी लिहिलेलं आणि गायिलेलं ‘नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं.
बघताबघता हे गाणं भारताच्या सीमा ओलांडून परदेशातही वाजू लागलं. त्यामुळे या गाण्याने छगन चौगुले यांना जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं. विंग्स कंपनीचीही ही खऱ्या अर्थाने भरभराट होती. तीच कृतज्ञता कंपनीने कायम जपली. ज्यावेळी कंपनी बंद पडली त्यावेळी एका लोककलावंतावर उपाशी राहायची वेळ येऊ नये म्हणून कंपनीने छगनरावांना दरमहा १५००० रुपये देण्याचा निर्णय घेतला.
छगन चौगुलेंच्या जागरण गोंधळाचे सादरीकरण पाहणे ही देखील एक पर्वणी असायची. नव्याजुन्याचा संगम त्यांनी आपल्या कलाकृतीत आणला होता. विनोदाच्या माध्यमातून ते सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सहज आणि मार्मिक भाष्य करायचे. इतक्या वर्षांची ही तपश्चर्या असतानाही त्यांनी याचा कधी गवगवा केला नाही. प्रसिद्धीपासून दूर राहण्यात त्यांना कायम स्वारस्य वाटे.
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या पुढाकाराने छगन यांनी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीची पायरी चढली. बरीच वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना जागरण गोंधळाचे प्रशिक्षण दिले. लोककला अकादमीच्या माध्यमातून छगनराव अभ्यासाकांपर्यंत पोहोचले. ही बाब दखल घेण्याजोगी आहे. मागील काही वर्षात याच लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी छगन चौगुलेंना पुन्हा प्रकाशात आणले. केवळ प्रकशातच आणले नाही तर त्यांची कला प्रस्थापित माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. अन्यथा इतकी वर्ष या कलाकाराची कोणत्याही प्रस्थापित माध्यमांनी दखल घेतली नाही, कदाचित पुढेही घेतली नसती. ही खंत मात्र कायम मनाला चटका लावून जाते.
छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.
नवरात्रीत सततच्या कार्यक्रमाने घसा बसलेला असतानाही ते जीव एकवटून गायचे पण कधी कुणाला नाराज केले नाही. सामान्य गोंधळींपेक्षा छगनभाऊंची सुपारी जरा महाग असायची पण कार्यक्रम सुद्धा तितकाच दर्जेदार असायचा. एकदा एखाद्याच्या दारात कार्यक्रम केला की पुन्हा त्याचं बोलावणं स्वतःहून येणार याची खात्रीच असायची.
अमुक एका गावात छगन चौगुले येणार हे कळताच लोक गाड्या- घोडं घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात जायचे. म्हणूनच कार्यक्रमापलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येकाशी हितसंबंध जोडले होते, अगदी घरच्या सारखे. स्वभावातली नम्रता त्यांनी कायम जपली. छगन भाऊंचे शर्ट पाहण्यासारखे असायचे. नंतर नंतर त्यांच्या चकचकीत शर्टाची फॅशनच बनली.
शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली कला जोपासली पण दुर्दैवाने कलेतून त्यांना फारसे पैसे मिळवता आले नाही. कार्यक्रमाची सुपारी जास्त असली तरी ताफा मोठा असायचा. सहकालाकारांचे मानधन देऊन हातात अगदी तुटपुंजी रक्कम उरायची. त्यातच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. पार्टीत मुरळी म्हणून नाचणाऱ्या मुलींनाही ते स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावायचे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे अनेक राजकारण्यांशी जवळचे संबध आले. अनेक मंत्र्यांच्या घरी त्यांनी स्वतः जागरणगोंधळ घातला आहे. असे असले तरी आपल्या परिस्थितीचे भांडवल करत त्यांनी कधीही कुणापुढे हात पसरले नाही. पदरी असलेली कला सादर करत ते कायमच स्वाभिमानाचे जीवन जगले. अगदी शेवटपर्यंत.
त्यांचं निधन करोनासारख्या आजाराने झालं हे मात्र सर्वात मोठं दुर्दैव. कारण प्रकृतीचे उत्तम ठेवण असताना अशा आजाराने जाणं, तेही इतकं अचानक. हे उभ्या महाराष्ट्राच्या मनाला धक्का देऊन गेलं. त्यांच्यातल्या मानवतेने त्यांना शेवटपर्यंत स्वस्थ बसू दिलं नाही.
मुंबईत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली हे त्यांना कुठेतरी सलत होते. म्हणून गोरगरीबांना अन्नदान करावं या उद्देशाने ते अंधेरीतल्या लोकवस्तीत उरतले आणि मदतीचा हात पुढे केला. या घटनेनंतर काही दिवसातच त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आणि जे घडू नये तेच घडले. त्यांच्या जाण्याचे दुःख न संपणारे आहे.
असा ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत आज आपल्यात नसला तरी त्यांच्या स्मृती मात्र कायम आपल्या स्मरणात राहतील. चिरंतन.
-निलेश अडसूळ. 9004493061
हे ही वाच भिडू
- गणपतीची शेकडो गाणी लिहीणारा उत्तम कांबळे उपाशीपोटी मेला तरी आपल्याला कळालं नाही.
- खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने