पडद्यावर असणारा मुन्शीजी खऱ्या आयुष्यात मात्र बिघडलेला विकी बाबू होता.

शराबी सिनेमा बघितलाय ना? श्रीमंत बापाचा दारूत वाया गेलेला मुलगा म्हणजे आपला बच्चन हातात दारूचा ग्लास घेऊन एका पार्टीत शेर सांगत असतो. सगळे बघे उगाचच वाहवाह करत असतात पण

त्यावेळी मुन्शीजी तिथे येऊन खराब शायरी बद्दल त्याचं कान पकडतो. विकी बाबू झालेला बच्चन त्याला एक डायलॉग म्हणतो,

“मुंशीजी हमारी जिंदगी तीन बंबूओ पे खडी है. शायरी, शराब और आप .”

 लहानपणीच वारलेली आई आणि बिझनेसच्या व्यापात आपल्या पोराकडे दुर्लक्ष करणारे बाबा या दोघांच्याही वाटणीच प्रेम हा मुन्शीजी विक्की बाबूला देत असतो. तोच त्याचा आईबाप सगळ असतो. त्याला योग वेळी रागावण, त्याला प्रेमान जवळ घेण या सगळ्याचा अधिकार मुन्शीजीलाच असतो. हा मुन्शी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मरतो त्यावेळी बच्चन बरोबर अख्खा थिएटर रडला होता. 

मुन्शीजीचा रोल केला होता कधी प्रेमळ तर कधी कडक, कधी नाचणारा गाणारा तर कधी हसवता हसवता रडवणारा हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या लाडक्या दद्दूने म्हणजेच ओमप्रकाशने. आजही अभिनेता ओमप्रकाश म्हटल्यावर सगळ्यांना शराबीमधल्या मुन्शीजीची आठवण येते.

ओमप्रकाश यांच पूर्ण नाव ओमप्रकाश छीब्बर. त्यांचा जन्म जम्मूच्या एका श्रीमत कुटुंबात झाला. जम्मू, लाहोर अशा शहरात त्यांची भरपूर प्रॉपर्टी होती. ओमप्रकाश घरात लाडके असल्यामुळे त्यांच्यावर कधी कुठल्या गोष्टीचे बंधन नव्हते. म्हणूनच शाळेपेक्षा नाटक शास्त्रीय संगीत अशाच गोष्टीच्या शिकण्यात त्याचं मन रमले.

पुढे तरुणपणी त्यांनी नोकरी करण्यापेक्षा एक लॉंड्री सुरु केली. तेव्हा लॉंड्री ही श्रीमंतांची चैन होती. ओमप्रकाशनी ही लॉंड्री सुरु करण्यासाठी घरातून १६ हजार रुपये घेतले. तेव्हाचे १६ हजार म्हणजे आताचे लाखो रुपये तर सहज असतील. ही लॉंड्री काही चालली नाही. घरच्यांचे एवढे पैसे खर्च केल्यावर ओमप्रकाश यांचे डोळे उघडले. आता वेळ होती स्वतःच्या पायावर उभे राहण्याची.

ओमप्रकाश यांचा स्वभाव खूप गप्पिष्ट होता. कुठल्याही पार्टीसमारंभाचे ते जान असत. याच बोलण्याच्या त्यांच्या स्किलचा उपयोग झाला आणि त्यांना रेडियोवर नोकरी मिळाली. रेडियोवर ते फतेहदिन या नावाने शो करायचे. हा फतेहदिन पूर्ण लाहोर पंजाब मध्ये फेमस झाला. 

एकदा अशाच एका कार्यक्रमात ओमप्रकाश यांना जोक सांगताना लाहोर फिल्म इंडस्ट्रीचे मोठे डायरेक्टर द्लसुख पांचोली यांनी बघितलं. कोणीतरी त्यांना सांगितल हाच तो फेमस फतेहदिन. त्यांनी त्याला भेटायला बघितलं. जेव्हा जम्मूवरून आलेला ओमप्रकाश त्यांना फोन वर आपल नाव सांगू लागला तेव्हा पांचोली साहेबांनी त्याला ओळखलच नाही. नंतर त्यांना प्राण या सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं फतेहदिन म्हणजेच ओमप्रकाश.

ओमप्रकाशच फिल्मी करीयर तेव्हा सुरु झालं. फेमस असूनही शिपायापेक्षा कमी पगार देतात म्हणून त्यांनी लाहोर रेडियोची नोकरी सोडली. आता फक्त आणि फक्त सिनेमा यातच करीयर करायचं त्यांनी फायनल केलं होत.

याच काळात भारतपाकिस्तान फाळणी झाली. ओमप्रकाश जीव वाचवून भारतात आले. मुंबईला फिल्मसाठी हात पाय मारले. एकेकाळी श्रीमंती अनुभवलेला हा नट आता अर्धपोटी राहून काम शोधत होता. बी.आर.चोप्रा यांनी त्यांच्यामधला टलेंट ओळखले. ओमप्रकाश यांना व्हिलन म्हणून पहिला ब्रेक मिळाला, सिनेमा होतं लखपती.

तिथून ओमप्रकाश यांचे अच्छे दिन सुरु झाले. ओमप्रकाश यांनी आपल्या व्हर्साटाइल अभिनयाने एक काळ गाजवला. त्यांची संवादफेकीची स्टाईल, त्यांच कॉमेडीच अचूक टायमिंग, उर्दू पंजाबी हिंदी वर जबरदस्त पकड याचे सगळेच फॅन होते. पण ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारबरोबर त्यांनी गोपी मध्ये जो इंटेन्स अभिनय केला त्याला तोड नव्हती. अनेकांना वाटलं की या सिनेमात ओमप्रकाशनी आपल्या अभिनयाने सुपरस्टार दिलीपला खाऊन टाकलं.

खुद्द दिलीप कुमार एकदा म्हणाला होता की

“ओमप्रकाश यांच्या बरोबर अभिनय करायचा असेल तर मला तयारी करून यावी लागते “

आपला महेश कोठारेचा धुमधडाका ज्या सिनेमाचा कॉपी आहे त्या प्यार किये जा या सिनेमामधला एक सीन आहे.

ओमप्रकाश यांना त्यांचा डायरेक्टर होण्याच खूळ डोक्यात असलेला मुलगा म्हणजेच मेहमूद रात्रीच्या वेळी आपल्या हॉररफिल्मची स्टोरी सांगत असतो. त्यावेळी ती स्टोरी सांगनारा मेहमूद आणि ऐकताना घाबरलेला ओमप्रकाश यांची अक्टिंगची जुगलबंदी म्हणजे बाप आहे. (मराठीत हा सीन लक्ष्या आणि शरद तळवलकर यांनी केलाय. तो सुद्धा ओरिजिनल एवढाच रंगलाय.)

सुनील दत्त यांच्या सोबतचा पडोसन, धर्मेंद्र बरोबरचा चुपके चुपके, राज कपूर सोबत मेरा नाम जोकर, राजेश खन्ना बरोबर अमर प्रेम अशा अनेक सिनेमात त्याने छोट्या छोट्या पण कधीच न विसरता येतील अशा भूमिका केल्या. अमिताभ बरोबर तर त्याची जोडी छान जमली. जंजीर, शराबी, परवाना, नमक हराम असे बरेच सिनेमे केले.

अनिल कपूरचा “चमेली की शादी” हा सुद्धा त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा सिनेमा होता. यामध्ये अनिल कपूरचा उस्ताद मस्तराम पेहलवानचा रोल त्यांनी केला. आपल्या पठ्ठ्याना “बरखुद्दार, औरत गन्ने का रस निकालनेवाली मशीन होती है. चालीस साल की उम्र तक उनसे दूर राहा करो” शिकवणारा हा पहिलवान शेवटी आपल्या आयुष्यभराच्या तत्वज्ञानाला आपल्या लाडक्या शिष्यासाठी मुरड घालतो आणि त्याच्या आंतरजातीय लग्नाला संरक्षण देण्यासाठी कसा पहाडासारखा उभा राहतो हे पाहताना हसून हसून डोळ्यात पाणी येत .

ओमप्रकाश यांनी जवळपास तीनशेच्या वर सिनेमामध्ये रोल केले. हिंदी सिनेमात गेस्ट अपियरंसची सुरवात त्यांनी केली. कोणताही रोल असु दे ओमप्रकाश याच रोल साठी जन्माला आलेत की काय असं वाटाव इतपत ते प्रत्येक भूमिकेत एकरूप झाले. आजही त्यांचा फोटो पहिला तर आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य फुलून येत.

गेली पन्नास वर्षे त्यांच्या संवादफेकीच्या स्टाईलंची अनेक मिमिक्री कलाकार  नक्कल करतात. पण त्यांनी मोठया पडद्यावर जो कमाल करून दाखवला त्याची नक्कल करणे कोणालाच जमू शकलेले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.