जेव्हा जगात कम्युनिस्ट विचारसरणी ढासळत होती, तेव्हा भारतात या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना हरवणं अशक्य होतं.

ज्योती बसू. कट्टर मार्क्सवादी. तेवीस वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले भारतीय राजकारणातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अटलबिहारी वाजपेयी आणि ते एकाच पिढीतील नेते. राजकारणात उजव्या आणि डाव्या अशा दोन टोकाला असणाऱ्या या राजकारण्यामध्ये घट्ट मैत्री होती.

ज्योती बसूंचा जन्म ८ जुलै १९१७ साली कलकत्यामधल्या एका उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

त्या काळातल्या प्रत्येक श्रीमंत कुटुंबातल्या तरुणांप्रमाणे वकिलीचे शिक्षण घ्यायला ते इंग्लंडला गेले. तिथं गेल्यावर साम्यवादी विचारसरणीच्या प्रेमात पडले. देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर इंग्रजाबरोबर भारतातले स्वतःला उच्च समजणारे जमीनदार भांडवलदार यांची पण सत्ता काढून घेतली पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता.

इंग्लंडमध्ये शिकत असतानाच स्वातंत्र्यलढ्याचे काम सुरु केले. सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांची लंडनमध्ये होणाऱ्या सभा मिटिंगची व्यवस्था करण्याचे काम त्यांच्याकडे असे. भारतात परतल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीचे काम करण्यास सुरवात केली. मजदूर युनियन रेल्वे युनियन यांच्यासाठी त्यांनी लढा सुरु केला. याकाळात या युवा नेत्याची प्रसिध्दी वाढत गेली.

१९४६ साली त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि निवडून आले. तेव्हा पासून पश्चिम बंगाल मधले ते सर्वात लोकप्रिय नेते होते.

कॉंग्रेसचे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांच्या कारकिर्दीत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा गाजवली. १९६७साली कम्युनिस्ट पक्षाचे युती सरकार स्थापन झाले. त्याचे ते उपमुख्यमंत्री होते. १९७० साली त्यांना इंदिरा गांधीनी मुख्यमंत्री होऊ न देता बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावून टाकली. आणीबाणीच्या काळात कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या लढ्यामुळे १९७७ सालच्या निवडणुकीत जबरदस्त बहुमत घेऊन ज्योती बसू पहिल्यांदा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले.

वाजपेयी आणि ज्योती बसू यांची मैत्री वाजपेयी पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून गेले तेव्हापासून होती.

जनसंघ मध्ये असल्यापासून कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये पक्षाला रुजवण्यासाठी वाजपेयीजी प्रयत्नशील असायचे. तिथे त्यांच्या अनेक सभा व्हायच्या. मात्र तिथे गेल्यावर ज्योतीबाबूंची भेट मात्र ते कधी चुकवायचे नाहीत. वाजपेयी आणि ज्योती बासू यांची जी मैत्री होती याच्याबरोबर उलट स्थिती अडवाणी आणि ज्योती बसू यांची होती. दोघांचेही एकमेकाशी पटायचे नाही.

मृदू स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्ची वृत्ती अशी अनेक साम्यस्थळे अटलजी आणि ज्योतीबाबू यांच्यात होती. याच बरोबर त्यांच्यात आणखी एक साम्य होते ते म्हणजे सदा ताजीतवानी विनोदीवृत्ती. 

प्रचाराच्या दरम्यान अनेकदा एकमेकावर जोरदार टीका व्हायची. अशाच एका प्रचारसभेमध्ये ज्योती बासू यांनी भाजपला बर्बर लोकांचा पक्ष असे म्हटले. बर्बर म्हणजे क्रुर व जंगली. वाजपेयीजीना ही टीका आवडली नाही. दोघांची भेट झाल्यावर त्यांनी हा विषय काढला. त्यावेळी ज्योती बसू म्हणाले,

“धर्मस्थलों को तोड़ने वालों के लिए कोई दूसरा उचित शब्द मिल जाये तो ढूंढकर बता दीजिएगा.”

वाजपेयी ज्योती बाबूंच्या हजरजबाबीमुळे निरुत्तर झाले.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहण्याचा विक्रम त्यांच्या एकेकाळी ज्योती बाबूंच्या नावे होता. जेव्हा संपूर्ण जगात कम्युनिस्ट विचारसरणी पराभूत होत होती तेव्हा फक्त तेव्हा या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्याला हरवणे कोणालाही जमत नव्हते. गोरगरीब जनता शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी राहिली.

१९८९ साली व्ही.पी.सिंग यांना प्रधानमंत्री पदी बसवण्यात आले तेव्हा त्यांच्यापाठीशी ज्योती बसू आणि अटलजी दोघेही होते. दोघानाही अनेक वर्षे राजकारणात काढून पंतप्रधानपदी जाता आले नव्हते.

तो योग १९९६ साली जुळून आला. सरकार मध्ये असलेल्या काँग्रेसला तेव्हाच्या निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागली. पण इतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. तेव्हा सर्वात प्रथम वाजपेयीजीना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण राष्ट्रपतींनी दिले पण ते बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे काही दिवसातच पायउतार झाले.

त्यांच्यानंतरची संधी ज्योती बासू यांनाच होती. देशातल्या कोणत्याच पक्षाने आक्षेप न घ्यावा असे एकमेव नेते ज्योतीबाबू होते.

युनायटेड फ्रंट च्या नेत्यांमध्ये त्यांचेच नाव फायनल झाले. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोने ज्योतीबाबूंना आघाडीच्या सरकारचा पंतप्रधान होण्यासाठी परवानगी दिली नाही. पक्षाचा आदेश झुगारून ज्योतीबाबू सहज प्रधानमंत्री बनले असते एवढी त्यांची लोकप्रियता होती. पण आयुष्यभर डाव्या विचारसरणीच्या करड्या शिस्तीत वाढलेल्या ज्योती बासू यांनी पक्षाचा आदेश मानला व प्रधानमंत्री पदावर पाणी सोडले. त्यांच्या ऐवजी देवेगौडा पंतप्रधान झाले.

वाजपेयीजीना त्यानंतर दोनवेळा प्रधानमंत्री होण्याची संधी मिळाली पण ज्योती बाबूंना कधीच ती संधी मिळाली नाही. पुढे अनेक वर्षांनी कम्युनिस्ट पार्टीने ही आपली सर्वात मोठी घोडचूक होती ते मान्य केले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.