भारतीय क्रिकेटचा बाजीराव, “खंडेराव मोरेश्वर रांगणेकर”.

१९१७ सालची गोष्ट.

औरंगाबादमधील एका महिलेला झालेली मुलं जन्मतःच मरण पावत होती. या महिलेची ५ मुलं जन्मतःचं मरण पावली होती. त्यावेळी प्रचंड दुखी, कष्टी झालेली ती महिला जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाली. आपल्याला मुलगा व्हावा यासाठी खंडेरायाजवळ नवस बोलली.

खंडेराया तिच्या नवसाला पावला आणि एका मुलाचा जन्म झाला. खंडेरायाच्या नवसाने जन्मलेल्या मुलाचं नाव देखील खंडू असंच ठेवण्यात आलं. जवळपास ४ वर्षे व्यवस्थित गेली आणि एका दिवशी अचानक खंडू आजारी पडला. खूप सारे उपचार करून झाले पण काही केल्याने फरक पडत नव्हता. मुलाच्या प्रकृतीने व्याकूळ झालेल्या या मातेने परत एकदा जेजुरी गाठलं.

धावत पळत जाऊन अनवाणी पायाने तिने जेजुरीच्या ९५० पायऱ्या न थकता चढल्या. तोपर्यंत खंडू बेशुद्ध पडला होता. मातेने परत एकदा आपल्या मुलाला जीवनदान देण्यासाठी खंडेरायाचा धावा सुरु केला.

पुढच्या १० मिनिटात चमत्कार झाला आणि बेशुद्ध झालेला खंडू उठून जेजुरीच्या पायऱ्यांवरून पळतच सुटला. खंडू अलौकिक वेगाने पळत सुटला आणि पुढे भारतिय क्रिकेट विश्वाला आणि बॅडमिंटनला देखील एक उत्कृष्ट खेळाडू मिळाला.

खंडेराव मोरेश्वर रांगणेकर असं या खेळाडूचं नाव.

जेष्ठ क्रीडा पत्रकार मकरंद वायंगणकर यांना खंडेराव रांगणेकरांच्या पत्नी विमलताई रांगणेकर यांनी सांगितलेला हा किस्सा किती खरा किती खोटा हे माहित नाही पण खंडेराव उर्फ खंडू रांगणेकर हे भारतीय क्रिकेटमधलं जादुई रसायन होतं एवढं नक्की.

खंडू रांगणेकरांविषयी असं सांगितलं जातं की ते त्यांच्या काळातले भारतीय क्रिकेटमधले डावखुऱ्या हाताने बॅटिंग करणारे सर्वोत्तम खेळाडू समजले जायचे. फिल्डर तर ते भन्नाटच होते. त्याकाळी कव्हर पॉइंटवरील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं.

ball
विमला ताई रांगणेकर यांनी जपून ठेवलेला रांगणेकरांची सही असलेला तो बॉल

१९४४ सालच्या एका सामन्यात रांगणेकरांनी त्यावेळचा स्टार बॅटसमन गुल मोहोम्मद चा  कव्हर पॉइंटवर पकडलेला पकडलेला कॅच तर इतका भन्नाट होता की बॉलिंग करणाऱ्या कर्नल सी.के. नायडू यांनी या कॅचनंतर जवळपास ५ मिनिटे त्यांना मिठी मारली होती. खंडेरावांनी पकडलेल्या त्या कॅचचा बॉल रांगणेकरांच्या पत्नी दिवंगत विमलाताई रांगणेकर यांनी यांनी जपून ठेवला होता. ज्यावर त्यांची सही देखील आहे.

रांगणेकर हे फक्त उत्तम क्रिकेटरच नव्हते तर त्याकाळातील भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंपैकी एक म्हणून देखील त्यांनी खूप नाव कमावलं होतं. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं एकेरीतील उपविजेतेपद आणि दुहेरीतील विजेतेपद त्यांच्या नावावर होतं.

माजी भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांच्यामते रांगणेकरांनी त्यांची  बॅडमिंटनमधील आक्रमकताच क्रिकेटमध्ये आणली होती. तीच चपळाई त्यांच्या फिल्डिंगमध्ये असायची. डाव्या हाताने बॅटिंग करणारा हा खेळाडू बॉलिंग मात्र उजव्या हाताने करायचा. पण त्याचं वेळी जेव्हा ते  बॅडमिंटनच्या कोर्टवर असायचे त्यावेळी पुन्हा ते प्रतिस्पर्ध्यावर उजव्या हातातील रॅकेटनेच वर्चस्व गाजवायचे.

त्यांच्याविषयीची अजून एक विस्मयकारक गोष्ट अशी की फिल्डिंग दरम्यान ते आपल्या दोन्हीही हातांनी सारख्याच वेगाने बॉल थ्रो करू शकायचे.

क्रिकेटिंग करिअर गाजवल्यानंतर रांगणेकर भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात आणि राजकारणात देखील उतरले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या रांगणेकरांनी ठाणे नगरपालिकेचे अध्यक्षपद देखील भूषवलं होतं.

मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांनी खंडू रांगणेकरांचा ‘भारतीय क्रिकेटचा बाजीराव’ या उपाधीने गौरव केला होता. १९८४ साली आजच्याच दिवशी घशाच्या कॅन्सरने त्यांचं निधन झालं होतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.