ते म्हणाले होते, महाराष्ट्रीयन माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवय नाही, ती भेट मिळालेली चालतात.

लेखक, नाटककार, समीक्षक, पटकथाकार, पत्रकार, शिक्षक व भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा द्विभाषिक लेखकांमध्ये ज्यांचा समावेश होतो, अगदी जर्मन भाषेत त्यांच्या साहित्याची भाषांतरं व तेथील उच्च नागरी सन्मान मिळाला आहे. ‘स्प्लिट वाईड ओपन’ ह्या चित्रपटातून अभिनय केलेले, अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार असलेले, ककल्ड या पुस्तकासाठी २००१ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारे,

किरण नगरकर यांच्या निधनाची बातमी नुकतीच कळली.

आणि आजवर मराठीत पहिली कादंबरी लिहिणारे व बुद्धिजीवी वर्ग वगळता फारशी दाखल घेतली नाही म्हणून इंग्रजीकडे मोर्चा वळवणारे (तब्बल सत्तावीस वर्षांनी तिची दुसरी मराठी आवृत्ती छापली गेली) साहित्यिक-सांस्कृतिक- सामाजिक व्यवहारांपासून बरेचसे अलिप्त राहणारे आणि म्हणूनच महाराष्ट्रात फारसे लोकप्रियता न मिळवू शकणारे परंतु हार्पर कॉलिन्स पासून अनेका नामवंत प्रकाशनाने छापलेली त्यांची कादंबरी, नाटक असो की अमीर खान ते नासीरुद्दीन शहा सारख्या अभिनेत्यांनी जाहीरपणे त्यांच्या कादंबरीचे केलेले वाचन असो असा हा लेखक आज काळाच्या पडद्याआड गेला त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

मला ते भेटले सर्वप्रथम ‘सात सक्कं त्रेचाळीस…’

या त्यांच्या पहिल्या कादंबरीतून.

ही कथा सरळरेषीय (linear) नाही. पण वाचक काय तर समीक्षक देखील ती सरळरेषीय पद्धतीने वाचतो, आणि काहीतरी भलतेच निष्कर्ष काढतो, भलतंच लेबल लावतो. हेच कारण असावे की बुद्धिजीवी वर्ग सोडता इतर लोकांना ती फारशी कळाली नसावी ते देखील साठाव्या दशकाच्या उत्तरार्धात. मला आठ दहा वर्ष्यापूर्वी वाचतांना जाम आवडली होती, कारण तोवर असा फॉर्म असणारे अनेक चित्रपट, कादंबरी येऊन गेले होते.

नुकताच पाहिलेला आमोरेस पेरॉस’ परदेशी किंवा लाईफ इन मेट्रो हा हिंदी या चित्रपटाच्या तीस एक वर्षे अगोदर ही कादंबरी आलेली. चित्रपटात तीन समांतर कथानक आहेत तर कादंबरीत तीन नाही, १० ते ११ समांतर कथानकं ट्रॅक आहेत.

सात सक्कं त्रेचाळीस मध्ये अनेक भयानक, ट्रॅजिक, हतबल प्रसंग आहेत. त्याकाळच्या अनेक समीक्षकांनी त्यामुळे कादंबरी झोडपली होती. त्या काळी भाषेच्या संदर्भात जयवंत दळवींनी मारलेला टोला. ललित मासिकामधल्या ‘ठणठणपाळ’ मध्ये त्यांनी प्रश्न उभा केला होता..

‘आम्ही असं ऐकतो की, नगरकरांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’चा इंग्रजीमध्ये अनुवाद होत आहे. अहो, पण अनुवाद पहिल्यांदा मराठीमध्ये नको का करायला?’ ……

हे सगळं मराठीत असलेल्या कादंबरी विषयी बरका. ‘सात सक्कं त्रेचाळीस..’ ची भाषा जास्त वेगळी बोलीभाषेत (लोकल) होती, तंत्र वेगळं होतं तेव्हाच्या काळाच्या पुढे असेल म्हणूनही कदाचित. ते स्वतः त्या बद्दल लिहितात की,

“मुंबई ही एक रिंगवाली वा पाच रिंगवालीसुद्धा सर्कस नाहीये. ती वीस, तीस, पन्नास रिंगवाली सर्कस आहे. Chaos is itls element and it thrives on it. या मॅड, सतत अ‍ॅड्रिनालिनवर जगणाऱ्या शहराला माझ्या कादंबरीत उतरवायचा माझा प्रयत्न होता आणि म्हणूनच मला वेगळ्या तंत्राची गरज भासली.””

मी माझं पहिलं पुस्तक मराठीत का लिहिलं, असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. खरं सांगायचं तर, मलाही त्याची पूर्ण कल्पना नाही ! पुढे मी इंग्रजीत लेखन केलं, पण हे लेखन मी कमावलेल्या इंग्रजी भाषेतून केलेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेलं असलं तरी पाचवीपासून पुढे पदव्युत्तर शिक्षण हे इंग्रजीत झालेलं आहे. त्यामुळे यात जी इंग्रजी भाषा शिकलो त्यातून ते लेखन झालं आहे.

आता ‘सात सक्कं त्रेचाळीस’बद्दल..

तर एका रात्री मी दिलीप चित्रेंच्या घरी गेलो होतो. दिलीपचे वडील ‘अभिरुची’ नावाचे साहित्यविषयक नियतकालिक चालवत होते. ‘अभिरुची’ च्या अंकासाठी एका कथेची मागणी चित्रेंनी माझ्याकडे केली. तिथून मी घरी परत आलो आणि एक लघुकथाच लिहायला घेतली ! त्या रात्री ही मराठीतील कथा मी लिहून पूर्ण केली.

ती ‘अभिरुची’त छापूनही आली, पण काय झालं माहीत नाही, ही कथा लिहिल्यानंतरच्या दुसऱ्याच रात्री मी कादंबरी लिहायला घेतली ‘सात सक्कं त्रेचाळीस’. तिच्या कथानकाबद्दल माझ्या मनात आधी काहीच ठरलेलं नव्हतं. अकस्मात लिहायला सुरुवात झाली. कदाचित ‘अभिरुची’साठी लिहिलेल्या कथेचा पुढचा भाग म्हणूनही ही कादंबरी सुचली असावी.”‘ त्यांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरूची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९७४ मध्ये ‘मौज प्रकाशन’ने ती प्रकाशित केली. नंतर थेट २००४ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

ते म्हणत की,

“कोणत्याही कादंबरीतील व्यक्तिरेखा कशा आहेत, त्यांचे परस्परांशी नाते कसे आहे, त्या कशा वागतात यातून त्या कादंबरीचे कथानक कसे पुढे जाते आणि ते परिणामकारक होते का, हेच महत्त्वाचे असते”

‘बेडटाइम स्टोरी’ या त्यांच्या नाटकाला काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर अनेक वर्षं बंदी होती.

‘कबीराचे काय करायचे’, ‘स्ट्रेंजर अमंग अस’ ही त्यांची नाटकंसुद्धा गाजली. ‘बेडटाइम स्टोरी’ हे नाटक लिहीलं तो आणीबाणीचा काळ होता. या नाटकात त्यांनी महाभारतातील भीष्म पितामह यांच्यावर लिहिलं होतं. या पात्राबद्दल त्यांचं काही म्हणणं होतं. द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी असो किंवा कौरव-पांडव युद्धासाठी परस्परांसमोर उभे ठाकले तेव्हाही भीष्म काहीच बोलले नाहीत. कौरवांनी ते करू नये, हे ते त्यांना सांगू शकले नाहीत.

हे सर्व नगरकरांनी ‘ककल्ड’मध्येही पुन्हा थोडय़ा वेगळ्या संदर्भात वापरलं आहे. ‘सामूहिक स्मृतिभ्रंश’ (erasure of memories) हा मुद्दा या नाटकाच्या लेखनात येतो. कळत नकळतपणे ‘ककल्ड’मध्ये तो मांडला आहे. असो पण तेव्हा ‘बेडटाइम स्टोरी’ चे प्रयोग काही होऊ दिले गेले नाहीत. ‘कबीराचे काय करायचे’, ‘स्ट्रेंजर अमंग अस’, ‘द ब्रोकन सर्कल’, ‘द विडो ऑफ हर फ्रेंड्स’, ‘द एलिफंट ऑन द माऊस’ आणि ‘ब्लॅक टुलिप’ ही त्यांची इंग्रजी आणि मराठी भाषेतील नाटकं खूप गाजली.

‘रावण अ‍ॅण्ड एडी’ या इंग्रजी कादंबरीची पहिली सत्तर पानं त्यांनी सुरुवातीला मराठीत लिहिली होती. पण पुढे ते पूर्णत्वाला गेलं नाही. याचं कारण म्हणजे, त्यांना मराठीत वाचकच नव्हते…..

ते एकेठिकाणी म्हणाले होते की,

“महाराष्ट्रीय माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवयच नाही. आम्हाला पुस्तकं भेट मिळालेली चालतात. त्यासाठी इतरांनी ती खरेदी करावी, पण आम्ही स्वत: खरेदी करत नाही. इंग्रजी लेखकांना जसा राष्ट्रीय स्तरावर व्यापक वाचकवर्ग मिळतो, तसा भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांना मिळत नाही. ‘ककल्ड’ या माझ्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे तिच्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. भाषालेखकांच्या पुस्तकांना असा वाचक वर्ग मिळत नाही.”

याच वर्षी आलेले The Arsonist हे पुस्तक कबीर या प्रोटागोनिस्ट वर आहे, एक खरा खुरा कबीर, आणि सहा शतकानंतर यातील आजचा कबीर. हे पुस्तक मुळापासून वाचवं असेच आहे त्यांच्या इतर कोणत्याही पुस्तकां सारखं. ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’, ‘गॉड्स लिट्ल सोल्जर’, ‘रेस्ट अँड पीस’ आणि ‘जसोदा: अ नॉवेल’ या त्यांच्या इतर प्रसिध्द कादंबऱ्यां आहेत.

आजारपणामुळे मुंबईतील झेवीयर्स कॉलेज सोडून ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आले होते इथेच त्यांनी BA, MA केले. नगरकर परिस्थितीने गरीब असले, तरी westernized गरीब होते (हा त्यांचाच शब्द). त्यांचे आजोबा ब्राह्मो समाजी होते. पाचवीपुढे सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं, त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व फर्ग्युसनच्या इतर मराठी कॉलेज विद्यार्थ्यांपेक्षा जरा जास्त होतं. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग आणि नगरकर हेच चौघे द्वैभाषिक लेखक मला तरी आज आठवतात. इंग्रजीवरील प्रभुत्व हे एक कारण असू शकेल.

जाता जाता त्यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलेले सांगतो,

“प्रत्येक लेखक आपली वाट शोधतो आणि प्रत्येकाचे स्वत:करिता असलेले आंतरिक नियम असतात. उद्याचं मला माहीत नाही; परंतु आजपर्यंतच्या माझ्या लिखाणाच्या बाबतीत मला स्वत:ला आत्मभानापासून वेगळं करता येत नाही. तत्त्वज्ञान, सोशिऑलॉजी, संशोधन किंवा पेंटिंग हे माझे विषय नाहीत. माझा पिंड गोष्टी सांगणाऱ्याचा. माझ्या मते, गोष्टकार हा फक्त एक जबरदस्त संवेदनशील माध्यम असतो. अहंपणा आणि गोष्टीचा छत्तीसचा आकडा. कादंबरीतली पात्रं, त्यांच्या आयुष्याचा प्रवाह, एकमेकांच्या संबंधांची गुंतागुंत आणि प्रवासाच्या शेवटी ते कुठे पोहोचतात, याच्या बाहेरचं सगळं संपूर्ण असंबद्ध.

जेवढ्या निष्ठेने लेखक आपल्या comfort zone मध्ये बसणाऱ्या वर्तुळातल्या व्यक्तींना उभं करू शकतो, तेवढ्याच तीव्रतेने जर तो अगदी प्रतिकूल पात्रांशी वाचकांचा परिचय करू शकला आणि त्यांना खऱ्याखुऱ्या हाडामांसाचा बनवू शकला, तरच त्याला सलाम करण्यात अर्थ आहे. पात्रांशी इमानदारीने वागाल तरच ती जिवंत निपजतील; नाही तर ती कठपुतळीच राहतील.”

ता. क. : त्यांची बरीच पुस्तकं. मराठीत अनुवादित झाली आहेत, तेव्हा त्यांचं एक तरी पुस्तक मराठीतील किंवा इंग्रजी अथवा अनुवादित का होईना वाचून खरेदी करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली असे होईल. 

Leave A Reply

Your email address will not be published.