लक्ष्या, तू फक्त मराठी सिनेमा जगवला नाहीस, तर आमचं बालपण अगदी मज्जेत घालवलस..
कॉमेडी म्हणजे काय? हे जेव्हा आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा लक्ष्या आयुष्यात आला.
निखळ विनोद, उत्तम मनोरंजन, अफलातून टायमिंग अशी अनेक कौशल्य लक्ष्याच्या अंगी होती. ‘अशी ही बनवाबनवी’ पाहून आपण नेमकं काय पाहतोय, हे कळण्याचं वय नव्हतं. पण लक्ष्याचा अभिनय पाहून , त्याच्या करामती बघून प्रचंड हसायला यायचं. थोडं कळायला लागलं, तेव्हा लक्ष्या हा किती ग्रेट कलाकार आहे हे कळायला लागलं.
रंगभूमीवर कधी प्रत्यक्ष बघता आलं नाही, पण यू ट्यूब वर ‘शांतेचं कार्ट चालू आहे ‘ हे नाटक पाहण्यात आलं. आणि लक्ष्याचा धमाल अभिनय पाहून अचूक टायमिंग कशाला म्हणतात, हे कळालं.
लक्ष्याला एकूण पाच मोठे भाऊ. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यामुळे घरी थोडा पैशांचा हातभार लागावा म्हणून लक्ष्या भावंडांसोबत लॉटरीची तिकीटं विकायचा. बेर्डे कुटुंबीय मुंबईमध्ये गिरगावात राहायला.
लोकमान्य टिळकांनी मुंबईत ज्या जागेत गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, अशा गिरगावात हा उत्सव पारंपरिक वातावरणात जल्लोषात साजरा केला जायचा. गणपती उत्सवाच्या वेळेस लहान मुलांची नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर व्हायचे. या कार्यक्रमांमध्ये लक्ष्याचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.
पुढे शाळा आणि कॉलेजमध्ये गेल्यावर तेथे सुध्दा अभ्यासापेक्षा लक्ष्या नाटकात रमु लागला. अभिनय करायची आवड जडली. त्यामुळे ज्या ठिकाणी अभिनय जोपासता येईल अशा ठिकाणी लक्ष्याने नोकरी करायला सुरुवात केली.
मुंबई मराठी साहित्य संघात लक्ष्याने नोकरी पत्करली. येथे नोकरीला असल्यामुळे अनेक नाटकं आणि नाटककारांशी लक्ष्याचा जवळून संबंध आला.
१९८३ – ८४ दरम्यान लक्ष्याने नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली.
लक्ष्मीकांत बर्डे या नावाला खरी ओळख मिळाली ती पुरूषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ नाटकामुळे.
लक्ष्या जवळ असणारी अनोखी विनोदी स्टाईल सर्वांना अनुभवायला मिळाली. याच नाटकामुळे १९८४ साली ‘लेक चालली सासरला’ आणि याच वर्षी आलेल्या ‘धूमधडाका’ या सिनेमातून लक्ष्मीकांत बेर्डे हा किती ताकदीचा विनोदी अभिनेता आहे, याची सगळ्यांना जाणीव झाली. पुढचा इतिहास आपण जाणतोच.
लक्ष्या स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत असला तरीही प्रत्यक्ष जगण्यातला विनोद लक्ष्याची आई त्याला शिकवून गेली.
लक्ष्याच्या आईचं नाव रजनी बेर्डे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, लक्ष्याची घरची आर्थिक बाजू काहीशी कोलमडलेली. परंतु घरची गरीबी, दुःख या सर्व गोष्टी लक्ष्याच्या आईने मुलांसमोर कधी दाखवल्या नाहीत. सर्व दुःख पचवून ती कायम हसतमुख चेहऱ्याने घरात वावरायची.
यामुळे काहीही झालं तरीही चेहऱ्यावरचं हसू मावळू द्यायचं नाही, ही शिकवण लक्ष्याने आईकडून घेतली.
एकदा झालं असं.. आईचं छातीचं दुखणं बळावलं होतं. त्यामुळे मोठा भाऊ, वहिनी आणि लक्ष्या आईला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी हॉस्पिटल मध्ये कसलातरी संप सुरू असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण होतं. आणि अचानक ‘रजनी’ अशा नावाचा पुकारा झाला. आईचा नंबर आला असं समजून लक्ष्याचा भाऊ आणि वहिनी आईला स्ट्रेचर वरून डॉक्टरांच्या तपासणीसाठी घेऊन गेले. लक्ष्या बाहेर थांबला होता.
थोडाच वेळ होतोय तोच लक्ष्याची आई हसत हसत बाहेर आली. काय झालंय लक्ष्याला कळेना. इतक्यात डॉक्टर लक्ष्याजवळ येऊन म्हणाले,
“अहो, तुम्ही कोणाला घेऊन आलात. मी रजनी शाह असं म्हणालो होतो. रजनी बेर्डे नाही.”
आता झाला प्रकार लक्ष्याच्या लक्षात आला. डॉक्टर रजनी शाह समजून लक्ष्याच्या आईचं अबॉर्शन करायला निघाले होते. हे कळाल्यामुळे लक्ष्याची आई हसत हसत बाहेर आली.
दूरदर्शन वरील मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगताना लक्ष्या म्हणाला,
“त्या वेळी आई आणि माझ्यामध्ये एक मुक संवाद झाला. आई जणू मला सांगू पाहत होती की, विनोद फक्त तुलाच करता येत नाही. सुशिक्षीत माणसांनाही विनोद करता येतो.”
या काहीशा गमतीशीर प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी लक्ष्याची आई हे जग सोडून गेली. परंतु जाता जाता लक्ष्याला जगण्यातला विनोद सांगून गेली.
अभिनेता म्हणून लक्ष्या प्रचंड यशस्वी झाला. पण प्रत्यक्ष आयुष्यात आलेली दुःख त्याने कधी जगासमोर मांडली नाहीत. तो कायम हसतमुख दिसला. लक्ष्याची या जगातून झालेली अचानक एक्झिट सर्वांसाठी दुःखदायक होती.
आजही लक्ष्याचे सिनेमे पाहिल्यावर सगळ्या चिंता दूर होऊन आपण सर्वजण खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. वी मिस यू लक्ष्या !
हे ही वाच भिडू
- काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.
- लक्ष्यासारख्या खोडकर मुलाचा कलंदर बाप म्हणून शरद तळवलकर शोभून दिसायचे
- बनवाबनवी नंतर मराठीत कुठला बाप विनोदी पिक्चर झाला असेल तर तो जत्रा