महाराष्ट्रात बीजेपी पाय रोवू शकली ती गोपीनाथरावांमुळेच..

महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र दोन्हीकडे कॉमन असतात. पण गोपीनाथ मुंडे मात्र कधीच पक्ष सोडून गेले नाहीत.

उस कारखाना आणि उस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाला त्यांनी उसतोड कामगारांच्या साथीने टक्कर दिली.  एक काळ बीजेपीच्या लोकांना असं वाटायचं की आपण आजन्म विरोधी पक्षातच राहणार. भयंकर नैराश्य यावं असा तो काळ होता त्या काळातही महाराष्ट्र पिंजून काढणारे दोनच नेते होते.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे.

महाजन लवकर दिल्लीत गेले. मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात बीजेपी सांभाळली ती मुंडेंनी. महाजन आणि श्रेष्ठींची महाराष्ट्रात बहुजन समाजातलं नेतृत्व पुढे आणायची चाल यशस्वी ठरली याला कारण फक्त गोपीनाथ मुंडे यांचा प्रभावी जनसंपर्क. बीजेपीचा इतर कुठला नेता एवढा लोकप्रिय होऊ शकला नाही. एवढी माणसं जमवू शकला नाही.

पवारांनी धनंजय मुंडेना राष्ट्रवादीत नेलं तेंव्हा गोपीनाथ मुंडेंनी सांगलीचे संजयकाका पाटील बीजेपीत नेले.

मुंडे असते तर त्यांनी राष्ट्रवादीला आणखी मोठं खिंडार पाडलं असतं. मुंडे असते तर सिंचन घोटाळयाचं वेगळं चित्र दिसलं असतं. हे स्वप्नरंजन नाही. मुंडे किती धडाकेबाज गृहमंत्री होते हे महाराष्ट्राने पाहिलंय. पण दुर्दैवाने मागच्या सत्तेच्या काळात एवढा कणखर गृहमंत्री देणारी बीजेपी आपल्या काळात मात्र गृहखात्यात चमकदार कामगिरी करताना दिसली नाही.

गोपीनाथ मुंडे यांचं व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व प्रभावी होतं. महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासारखे कित्येक नेते त्यांनी पुढे आणले. एकेकाळी कधीच सत्तेत येऊ शकणार नाही अशी बीजेपी सत्तेत यायला दोन महत्वाची माणसं कारण होती. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे गोपीनाथ मुंडे.

मुंडेंनी शरद पवार यांच्यावर आरोपाची राळ उठवली.

महाराष्ट्र पिंजून काढला. त्यावेळेसपासून शरद पवार यांची प्रतिमा डागाळली ती डागाळलीच. त्यातून अजूनही शरद पवार सावरू शकले नाहीत. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देणे ही धक्कादायक खेळी होती. धनंजय मुंडे जेंव्हा राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवडून आले तेंव्हा निराश झालेले गोपीनाथराव सगळ्यांनी पाहिलेत. त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

प्रमोद महाजन यांचं अकाली निधन आणि धनंजय मुंडे यांचं पक्षांतर या दोन गोष्टी मुंडेंना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. एरव्ही गोपीनाथराव आपल्या थाटात असायचे. प्रचंड आत्मविश्वास ही त्यांची ओळख होती.

तळागाळात कार्यकर्ते असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर नेहमी एक हुकुमी आत्मविश्वास असतो. 

कधीतरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावानी एकमेकांना मिठी मारली आणि भल्या भल्या लोकांच्या पापण्या ओलावल्या. कुणाच्या का असेना, घरातली माणसं एकत्र राहिली पाहिजेत असं वाटणं ही आपली संस्कृती आहे. राज उद्धव एकत्र यावेत असं त्यांच्या पक्षात नसलेल्या लोकांनाही वाटतं ते यामुळेच.

पंकजा मुंडेना जेंव्हा गोपीनाथरावांचा अपघात झाल्याचा फोन आला तेंव्हा त्यांनी ते फार मनावर घेतलं नाही. कारण गोपीनाथराव आणि अपघात हे समीकरणच झालं होतं.

महराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त अपघात झालेले नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. पण प्रत्येक अपघातातून ते सहीसलामत बचावले होते. नेहमीसारखा एखादा किरकोळ अपघात असेल असं वाटून पंकजा मुंडे फार अस्वस्थ झाल्या नाहीत.

पण तो नेहमीसारखा अपघात नव्हता.

हेलिकॉप्टर अपघातातून वाचलेला माणूस एका साध्या कार अपघातात वाचू शकला नाही.

गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे सगळ्यांनी गृहीत धरलेलं होतं.

मराठवाड्याच्या तर ती मनातली गोष्ट होती. मुंडेंनीच एकदा सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रत्येक गोष्ट विलासरावांपेक्षा थोडी उशिरा मिळत गेली. विलासरावांना राजकीय पार्श्वभूमी होती. गोपीनाथ मुंडेना शाळेत जायला आठ आठ किलोमीटर पायी जावं लागायचं.

विलासराव पुण्यात शिकत होते त्याकाळात मुंडे अंबेजोगाईत शिकत होते. विलासराव सायन्सला होते. मुंडे कॉमर्सला. मुंडे म्हणायचे त्याकाळी कॉमर्सला मुली कमी असायच्या. सायन्सला जास्त.

तरी मुलींच्या त्या कमी संख्याबळातही मुंडेंच प्रेमप्रकरण जमलं. तेसुद्धा चक्क प्रमोद महाजन यांच्या सख्ख्या बहिणीशी. तर असं संख्याबळ कमी असलं तरी मुंडे आपलं गणित जमवायचं फार आधीपासून शिकले होते.

विलासरावांच्या नंतर मुंडेंची गाडी आली. आमदारकीपण विलासरावांच्या नंतर मिळाली. मंत्रीपद पण कारखाना पण विलासरावांच्या नंतर. आणि अर्थातच या लोकप्रिय जोडीतल्या दुसर्या जोडीदाराला मुख्यमंत्रीपद पण विलासरावांच्यापेक्षा थोडं उशिरा का होईना मिळेल असं मराठवाड्याला वाटत होतं.

पण नेमकं ते सोडून मुंडे विलासरावांच्या मागे गेले. 

या दोन नेत्यांनी अशी जग सोडून जायची बरोबरी करायला नको होती. कारण या दोघांच्या जाण्याने मराठवाड्यात नेतृत्वाचा पण दुष्काळ आलाय. आस्मानी होती आता सुलतानी आलीय. सुलतानी नेहमी दुबळ्या नेतृत्वामुळे येते.

गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्याच्या नुसत्या आठवणी काढून फक्त गर्दी जमेल. पण त्यांच्यासारख तडफदार नेतृत्व निर्माण झालं तर त्यांच्याभोवती होते तसे दर्दी कार्यकर्ते जमतील. नाहीतर हुजरे तर गल्लीबोळातल्या वार्डप्रमुखाच्या मागे पण असतात.

जीवाला जीव देणारे कार्यकर्ते गोपीनाथ मुंडेंसारख्या माणसाच्याच नशिबात असतात.

आपल्याकडे मुलांची जन्मतारीख लक्षात ठेवणे वगैरे भानगड त्याकाळी नव्हती. मुंडेंची जन्मतारीख त्यांच्या शाळेतल्या शिक्षकाने त्याच्या मनाने लिहिली आणि तीच फायनल झाली. तोच जन्मदिवस. म्हणून मुंडेंची कुंडली मांडायला त्यांच्या विरोधकांना जमलं नाही. पण ज्या माणसाला राजकारणात संपवण विरोधकांना जमलं नाही त्या माणसाला नियतीने मात्र क्रूरपणे आपल्यातून ओढून नेलं.

आज मुंडे असते तर युतीची बोलणी अशी थोडक्यासाठी तुटली नसती. आज मुंडे असते तर भाजपला आणि शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत हक्काने त्यांनी बांधून ठेवल असत. गोपीनाथराव मुंडे असते तर भाजपच्या मुख्यमंत्र्याला सकाळच्यावेळी चोरून शपथविधी घ्यावी लागली नसती.

मुंडेंनी खडसेंसारख्या मोठ्या नेत्यावर नाराजीची वेळ येऊच दिली नसती. मुंडेच्या मुलीला घरच्या मतदारसंघात आप्तस्वकियांकडून दगा करण्याच धाडस कोणाच झालं नसत.

अपघाताने मोठं होणारे लोक खूप आहेत. पण स्वबळावर मोठा झालेला माणूस अपघाताने जावा हे खूपच वाईट आहे. तो मुंडेंचा नाही मराठवाड्याचा राजकीय अपघात होता. त्या अपघातातून मराठवाडा अजूनही सावरू शकला नाही.   

हे ही वाचा. 

2 Comments
  1. Subhash Andhale says

    मुंडे साहेब याना पुन्हा…….

  2. Babasaheb Shirsath says

    Babasaheb Shirsath

Leave A Reply

Your email address will not be published.