अगदी कालपर्यन्त भाईंना आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नव्हती.

एक भाई काल गेला. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जावून सर्वांनीच शोक व्यक्त केला. गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला आणि त्यामधले हे भाई पाहिले तर गोवेकरांना आठवतात ते स्कूटरवरून फिरणारे तर कधी एखाद्या टपरीत जावून भाजीपाव खाणारे गोवेकरांचे भाई.

13 डिसेंबरला भाईंचा वाढदिवस असायचा. त्यांचा हा शेवटचा वाढदिवस ते प्रकृतीच्या अस्थिरतेमुळे साजरा करु शकले नव्हते. संपुर्ण गोवेकर दिवसभर होमहवन आणि यज्ञ करून त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करत होते.

असंख्य आठवणींमध्ये भाईंच्या शेवटच्या आठवणी दूखावण्यासारख्या होत्या की सिंघम सारख्या लढायला लावणाऱ्या होत्या हे समजं तस कठिणचं. कारण 14 ऑक्‍टोबर, 2018 रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून मुख्यमंत्री पर्रीकरांना गोव्यात आणण्यात आले होते. जाताना हसत खेळत इलाजासाठी गेलेले पर्रीकर येताना मात्र स्ट्रेचरवरून वैद्यकीय उपकरणांचा आधार घेत परतले होते.

पर्रीकरांना अशा अवस्थेत पाहूनच पर्रीकरप्रेंमींचा बांध फुटला होता कारण पहिल्या केमोथेरपी उपचारादरम्यान विधानसभेत आपली खणखणीत हजेरी लावून अगदी सिंघम स्टाईलमध्ये हजेरी लावणारे त्यांचे सकारात्मक भाई जर खरोखरच बरे असते तर स्ट्रेचरवरून गोव्यात कधीच परतले नसते हे समजण्याइतका गोवेकर शहाणा होता. इथपर्यंत की त्यांना शुद्ध असती, त्यांची तब्येत ठीक असती तरी भाईंनी स्ट्रेचरवरून जाणे कधीच मान्य केले नसते.

गोवेकरांचे हे भाई म्हणजे गोवेकरांसाठी मजबुती, विश्‍वास आणि जबरदस्त निर्णयक्षमतेचे मूर्तिमंत उदाहरण होते. गोव्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यामागे केवळ आणि केवळ एकच नाव कारणीभूत होत आणि पुढे गोव्यात भाजप अस्तित्वात राहिलं तरी राहील ते म्हणजे मनोहर पर्रीकर.

शालेय जीवनात बहुजनांचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) समर्थक असणारे पर्रीकर कॉलेज जीवनात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तप्रिय स्वयंसेवक म्हणून परिचित झाले. गेली वीस वर्षे पणजीचे आमदार म्हणून प्रसिद्ध असणारे पर्रीकर उत्तरप्रदेशातील लखनौमधून राज्यसभेचे खासदारही बनले होते.

1994 च्या विधानसभा निवडणुकीत मगो आणि भाजपच्या युतीने सोळा जागा जिंकल्यावर गोव्याच्या राजकारणावर पकड असणाऱ्या मगोच्या साथीने प्रथमच भाजपने नऊ टक्के मत मिळवून चार जागा जिंकल्या होत्या आणि यातली राजधानी प्रतिष्ठेची जागा मनोहर पर्रीकरांनी तब्बल अकराशे मतांनी जिंकली होती. ही निवडणूक भाजपच्या भविष्याची नांदी होती. 1994 च्या खासदारकीचा अपवाद वगळता पर्रीकर पणजीचे आमदार होते.

मूळचे म्हापश्‍याचे मात्र पणजीकरांच्या प्रेमाच्या आग्रहाखातर सुरवातीपासूनच पर्रीकर पणजीचे आमदार राहिले. 1994 ची निवडणूक त्यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळं आणि आयआयटीयन म्हणून जिंकली होती. पहिल्याच निवडणुकीत आपल्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्वाची छाप विधानसभेत सोडल्याने त्यांनी ही विधानसभा गाजवली होती.

90 च दशक म्हणजे आयाराम गयारामचे जणू लोणच होते, या दहा वर्षाचा काळात गोव्याने तेरा मुख्यमंत्री पहिले होते त्यामुळं गोवेकराना सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या राजकारणाची तलाश होती आणि पर्रीकरांच्या रूपाने त्यांना ती मिळाली. कॉंग्रेस आणि मगोच्या बजबजपुरीला लोक कंटाळले होते. आणि म्हणून 2000 च्या निवडणुकीत भाजपने चक्क 17 जागा जिंकल्या होत्या. आणि या 17 जणाची मूठ बांधण्यात पर्रीकर यशस्वी झाले आणि 24 ऑक्‍टोबर 2000 रोजी पर्रीकरांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हेच ते गोव्यातील पहिले भाजपचे सरकार. सरकार काठावरच्या बहुतमतात होते आणि अपक्ष पाठिंबा काढणार हे लक्षात येताच पर्रीकरांनी विधानसभा बरखास्त केली.

पक्षासाठी जीव देणारा कार्यकर्ता पर्रीकर. 

गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व तत्त्वांचा ते वापर करू शकतात, असे त्यांच्याबद्‌दल म्हटले जाते. एकूणच आपल्या हातावर मोजता येणाऱ्या वर्षांच्या कारकिर्दीच्या कालखंडात पर्रीकरांनी गोव्याच्या राजकीय क्षेत्रावर पर्रीकरांना मक्‍तेदारी प्राप्त करण्यात यश मिळाले. दूरगामी योजना आखात गोव्याच्या सर्वांगीण विकासाचा जणू पायाच त्यांनी रचला.

2002 सालच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी सरकार बनविण्यात मात्र पर्रीकरच यशस्वी झाले. 2002 आणि हे सरकार पुढे 2005 पर्यंत टिकलं. या चार वर्षाच्या काळात पर्रीकरांनी गोव्याचा यशस्वी राज्यकारभार केला आणि राजकारणावरची पकड मजबूत केली. पुढं कॉंग्रेसचे सरकार आलं मात्र विरोधी भाजपने सरकारवरच आपली पकड मजबूत ठेवली आणि 2007 च्या निवडणुकीत परत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला. मात्र कॉंग्रेसला सरकार कायम ठेवण्यात यश आलं.

2012 ची निवडणूक मात्र भाजपने गोवेकरांवर हावी होऊन जिंकली.

आणि पर्रीकरांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले. आतापर्यंत गोवा भाजपचा बालेकिल्ला झाला होता याला कारणीभूत केवळ आणि केवळ एकच नाव होत ते म्हणजे मनोहर भाई. जबरदस्त निर्णयक्षमता आणि उत्कृष्ट भाषण कौशल्यामुळे त्यांची आदरयुक्त दहशत विरोधकांमध्ये ते आजारी असताना देखील होती. केवळ विरोधक म्हणून टीका करणारे अनेक असले तरी कालपर्यन्त पर्रीकरांना खुले आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नव्हती.

2014 साली केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रीकरांवर सोपवली. त्यामुळे गोव्याच्या राजकारणातील हा दादामाणूस भारताच्या राजकारणावरही ठसा उमटविताना दिसला. पर्रीकरांच्या साधेपणाचा गाजावाजा देशभर झाला होता त्यात संरक्षणमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या जबाबदारीमुळं पर्रीकर देशातील घराघरांत पोचले.

सर्जिकल स्ट्राईक आणि ओआरओपी या दोन निर्णयांमुळे पर्रीकर सैन्यातही लोकप्रिय बनले.

संरक्षणमंत्रीपद सांभाळत असले तरी त्यांचे मन गोव्याच्या लाल मातीतच अडकले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या या गोव्याबद्‌दलच्या प्रेमाबद्‌दल टीका, टिप्पण्या आणि मिस्कील विनोदही करण्यात आले. पण पर्रीकरांनी अगदी नॅशनल मिडियाला दिलेल्या मुलाखतीतसुद्धा जाहीरपणे गोव्याबद्‌दलच्या प्रेमाचा स्वीकारच केला आणि त्यांच्या या सवयीमुळेच गोवेकरांचे लाडके भाई दिल्लीत राहूनही गोवेकरांच्या काळजापासून दूर झाले नाहीत.

पर्रीकरांच्या निर्णयक्षमतेचे उदाहरण द्यायचे तर याचवर्षी 2018 साली गोव्यात झालेली विधानसभा निवडणूक. भाजपच्या हातातून सत्ता जवळजवळ गेलीच होती पण अवघ्या काही तासातच रातोरात पर्रीकरांनी डाव फिरवला आणि राज्यावर भाजपचा झेंडा फडकला. या निवडणुकीत भाजपला केवळ 13 जागा मिळाल्या होत्या आणि कॉंग्रेसला 17. मुख्यमंत्री कोण होणार यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये भांडण लागली आणि याचीच संधी साधत पर्रीकरांनी इतर पक्षासोबत आपली युती घट्‌ट केली.

भाजपच्या 13 आमदारांसोबत त्यांनी गोवा फॉरवर्डचे तीन, अपक्ष तीन, मगोपचे तीन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका आमदारांना सोबत घेतले आणि युतीच्या सरकारची घोषणा स्वतः मुख्यमंत्रीपद  हातात घेऊन केली. आता गोव्यात भाजपचे काय होणार हा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. भाजपचे कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येत असले तरी या सर्वांची मूठ करून त्यांना एकत्र बांधून ठेवणारा भाई मात्र आज आपल्यात नाही. आपल्या या गोवेकरांच्या भाईला भावपुर्ण अभिवादन.

हे ही वाच भिडू. 

3 Comments
  1. Hitesh says

    Good analysis of Parrikar’s role in Goan politics

Leave A Reply

Your email address will not be published.