जगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.

निळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते ?  तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची.

दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात असेल. आणि तो जगातल्या पहिल्या पाच ब्रॅण्डमध्ये पोहचत असेल तर नक्कीच माहित असावं असं आहे.

काही लोकांना वरवरून अमृत व्हिस्कीचं नाव माहित आहे. काही दर्दी पिणारे अमृतच नाव अभिमानाने घेतात.

एक अस्सल भारतीय माणूस सिंगल माल्ट तयार करतो काय आणि युरोप, अमेरिकेच्या बाजारपेठेत आपलं नाणं खणखवतो काय हि अस्सल गोष्ट आपण “दारू” वर चर्चा नको म्हणून विसरून जातो. 

गेल्या वर्षी निळकंठ राव जगदाळे यांच निधन झालं.

त्यांच वय ६६ वर्ष होतं. ते अमृत डिस्टिलरीचेमालक होते. व त्यांच्या कंपनीने पहिली भारतीय सिंगल माल्ट बनवली होती.

काहींना सिंगल माल्ट म्हणजे काय हा प्रश्न देखील पडला. 

तर कस असतं दारूत देखील वंशवाद असतो. संत्रा की रम, व्हिस्की की व्होडका हा झाला जातीयवाद. पण व्हिस्कीत सिंगल माल्ट की ब्लेन्डेड,ब्लेन्डेड माल्ट की स्कॉच असा वेगवेगळा वंश इथेही असतो. यात सर्वात श्रेष्ठ वंश कोणता तर सिंगल माल्ट. सिंगल माल्ट हे युरोपातल्या काही निवडक घराण्याची मक्तेदारी.

तिथे सिंगल माल्ट कशी बनवतात इथल्या पाण्यासाठी देखील झरे कंपनीचे असतात. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत कायम ठेवला जातो. पाण्याची काळजी घेतली जाते. बार्ली उत्तम प्रतीची बनवली जाते. अगदी लहान पोराचा राज्याभिषेक करुन त्याला गादीवर बसवावं तसा हा कार्यक्रम असतो. मग सिंगल माल्ट पिणारे ग्राहक त्याच तोऱ्यात ही पोटात ढकलतात.

सिंगल माल्ट पिणारा कधीच मी व्हिस्की पितो म्हणत नाही, तो फक्त मी सिंगल माल्ट पितो अस बेंबीच्या देठापासून अभिमानं सांगतो. 

आत्ता विचार करा असा सगळा सोवळ्या ओवळ्याचा कार्यक्रम असताना यात एक भारतीय म्हणून आपण काय करु शकलो असतो का? म्हणजे भारतात देखील सिंगल माल्ट तयार होते अस कोणी म्हणलं तर हे शिवाशिव पाळणारे सिंगल माल्टवाले ग्राहक पहिल्यांदा आपणाला लाजेनं मारतील आणि नंतर पायताणानं. 

पण नाही, भारतीय म्हणून कायतरी वेगळी सणक आपल्याला मिळालेलीच आहे.

झालं अस की बंगलूरला राधाकृष्ण जगदाळे यांनी १९४८ ला जगदाळे डिस्टलेरीची स्थापना केली. आपण भलं आणि आपली गावठी बरी या धर्तीवर त्यांनी रम आणि ब्रॅण्डीचं उत्पादन घ्यायला सुरवात केली. त्यांच्या पश्चाच हा वडिलोपार्जित दारूचा धंदा आला तो त्याचे सुपूत्र निळकंठ राव जगदाळे यांच्याकडे. त्यांनी या बिझनेसमध्ये व्हिस्की चालू केली. आपल्याकडची व्हिस्की म्हणजे उसाच्या मळीपासूनच तयार केलेली. त्यामुळे देशी संत्र्याचा एक उत्कृष्ठ प्रकार म्हणूनच व्हिस्कीचं कौतुक व्हावं अस आमचं व्यक्तिगत मत. भारतातल्या सर्वच कंपन्या अशाच प्रकारच्या व्हिस्की करत असल्याने कोणीच कुणाच्या व्हिस्कीला पाण्यात बघण्याच कारण नव्हतं. पण झालं अस की, 

१९९० च्या सुमारास निळकंठ राव यांनी आपण सिंगल माल्ट काढायचा विचार केला. 

विचार करा हा विचारचं करणं किती अविचारी असू शकतं. व्यक्तिश: आम्हाला अस वाटतं की असा विचार त्यांनी नक्कीच व्हिस्कीच्या आठव्या नवव्या पॅकला केला असणार. असो तर ते म्हणाले आत्ता आपण देखील उत्तर अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या राजघराण्याबरोबर स्पर्धा केली पाहीजे. त्यासाठी एकच उपाय तो म्हणजे सिंगल माल्ट. 

सिंगल माल्टसाठी सर्वात महत्वाचा घटक असतो ते म्हणजे पाणी. आत्ता इतकं शुद्ध सात्विक पाणी आणायचं कुठून म्हणून अमृत तर्फे आपल्या प्लॅन्टमध्येच विहीर खणण्यात आली. या पाण्यात कोणतेच रसायन मिसळणार नाही याची काळजी घेण्यात आली. एक शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर प्रश्न होता तो बार्लीचा. हि बार्ली सुरवातीच्या टप्यात बाहेरून मागवण्यात आली. नंतर इथेच त्याच उत्पादन घेण्यात आलं. ती देखील पुर्णपणे सेंद्रिय असेल याबद्दल काळजी घेण्यात आली. 

होय नाही करत अमृत वाल्यांची पहिली सिंगल माल्ट व्हिस्की बाजारात आली आणि गेली. भारताची सिंगल माल्ट म्हणल्यानंतर जे हस होणार होतं ते झालं. त्याच मेन कारण म्हणजे भारतात कोण सिंगल माल्ट पित असेल याचा विचार देखील केला जावू शकत नव्हता आणि जगाच्या मार्केटमध्ये भारतीय सिंगल माल्ट कोणी विकत घेवून पिल याची सुतराम शक्यता नव्हती. 

तेव्हा अमृत वाल्यांनी मार्केटिंगची एक शक्कल सुरू केली.

जिथे जिथे असे उंची गिऱ्हाईक येत तिथे अमृतची मार्केटिंग टिम जात असे. एका चांगल्या ग्लासमध्ये घोटभर व्हिस्की ओतली जात असे. हळुवार घोळून तीचा वास घेवून ती समोरच्याला दिली जात असे.  मग समोरचा तो एक कडक व्हिस्कीचा घोट आपल्या जिभेवर टेकवत. अस करत करत ती अमृत फ्यूजन हि किमान विकली जावू लागली. 

तिची सुरवातीची चर्चा सुरू झाली ती लंडनमध्ये, त्यानंतरच्या एक दोन वर्षात लोक आवर्जून अमृतची सिंगल माल्ट मागू लागले. पण अमृतच्या सिंगल माल्टवर खरा शिक्का पडला तो २००४ साली. दारूतला चवदार माणूस विश्वगुरू जिम मरे यांनी या व्हिस्कीला तब्बल १०० पैकी ८५ मार्क दिले. २०१० साली तर या माणसाने या अमृतचा समावेश जगातली तीसऱ्या क्रमांकावर केला.

२००९ ला मॅनिएक्सने या दारुच्या पवित्र ग्रॅथात जगातील सर्वोत्तम व्हिस्की असा उल्लेख केला गेला. त्यानंतर अमृतच्या फ्यूजनवर कोणतीच शंका घेण्याचं कारण राहिलं नाही. 

हे सगळं करण्यामागे डोकं होतं ते निळकंठराव जगदाळे यांच. जगदाळे हे बंगलुरचे. आत्ता आपण काय करतो की बघितलं तर दारूच बनवली म्हणून विषय सोप्पा करतो. पण तस नसतय भिडूंनो. जगाच्या पाठीवर आपण राजेच होतो हे सिद्ध करायला धमक लागते मग ते टाटांच जग्वार घेणं असो की अमृतच सिंगल माल्ट बनवनं असो. अस्मिता तर आपल्यापण सुखावतातच की. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Vishesh says

    Very well written article on Single Malts… originally in whiskey scotch market Scottish whiskey are popular .. but now. Amrut has reached on new Heights.. n now it’s waiving Indian Flag all over the world. .. Good work Bhushan

Leave A Reply

Your email address will not be published.