‘कमांडर’ किंवा ‘तिसरा डोळा’ याहूनही या दहा गोष्टींसाठी रमेश भाटकर यांना लक्षात ठेवायला हवं.

मराठी फिल्मइंडस्ट्रीतले जेष्ठ कलाकार एव्हर ग्रीन डॅशिंग हिरो रमेश भाटकर यांचे आज मुंबईमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयाने रंगभूमी सिनेमाआणि छोटा पडदा ही तिन्ही माध्यम गाजवली. त्यांच्या आठवणी अनेकांनी कमांडर, तिसरा डोळा आणि हॅलो इन्फेक्टरच्या भूमीकांमध्ये जपून ठेवल्या. मात्र याहूनही अनेक गोष्टींसाठी रमेश भाटकर यांना आठवणीत ठेवायला हवे. अशाच काही गोष्टी बोलभिडू वाचकांसाठी.

रमेश भाटकर यांच्या बद्दलचे काही अज्ञात पैलू.

१. रमेश भाटकरांचे वडील स्नेहल भाटकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध संगीतकार होते.

रमेश भाटकर यांचे वडील वासुदेव भाटकर हे चाळीस च्या दशकात हिंदी आणि मराठी सिनेमांना “स्नेहल भाटकर ” या नावाने संगीत देत. त्यांची “कशी जाऊ वृंदावना”, “हम पर जादू डाल गये ” सारखी गाणी त्याकाळात खूप गाजली.  त्यांची भजने विशेष प्रसिद्ध होती.

२. घरात संगीताचा मोठा वारसा असूनही रमेश भाटकर यांना संगीत शिकण्यात रुची नव्हती.

रमेश भाटकर हे शाळेत असताना उत्कृष्ट जलतरणपटू होते. त्यांनी संगीत क्षेत्रात काही तरी करावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती. त्यांना टिळक संगीत विद्यालयात गाण शिकण्यासाठी दाखल करण्यात आलं होत. व्हायोलीन शिकण्यासाठी संगीतकार प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा यांच्याकडे काही दिवस तर तबला शिकण्यासाठी उस्ताद अब्दुल करीम खां यांच्याकडे पाठवण्यात आलं. पण रमेश भाटकर यांचा संगीतामध्ये जास्त रुची नव्हती. त्यांनी यापैकी कोणतच शिक्षण पूर्ण केलं नाही.

३. रमेश भाटकर हे योगायोगाने अभिनयक्षेत्राकडे वळले.

शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांनी गंभीरपणे अभिनय केला नव्हता. पुण्यामध्ये टेल्को इथे नोकरी असताना त्यांना त्यांच्या मित्रांनी कंपन्याच्या दरम्यान होणाऱ्या नाट्यस्पर्धेत काम करण्याचा गळ घातला. तिथे काम करत असताना त्यांना अभिनयाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.

४. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेली लाल्याची भूमिका करायची संधी त्यांना मिळाली.

टेल्को मध्ये काम करत असताना रमेश भाटकर औद्योगिक कामगार रंगभूमी गाजवल्यानंतर प्रभाकर पणशीकर यांना त्यांच नाव कळाल. त्यांनी “अश्रूंची झाली फुले” या नाटकासाठी काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेली लाल्याची भूमिका दिली. रमेश भाटकरांनी सुद्धा हि जबाबदारी समर्थपणे पेलली. याच नाटकामुळे त्यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरले.

५. रमेश भाटकर यांचा चित्रपटात प्रवेश टीव्हीमुळे झाला.

रमेश भाटकर यांची नाटके रंगभूमी गाजवत होती. याचमुळे त्यांना पियानो या एकांकिकेत काम मिळालं. ही एकांकिका दूरदर्शनसाठी शुटिंग करण्यात आली होती. त्यात त्यांच्यासोबत वंदना पंडीत ही अभिनेत्री होती. त्यांच टीव्हीवर काम पाहिल्यावर या दोघांनाही अष्टविनायक या सिनेमामध्ये काम मिळालं. रमेश भाटकर यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश चांदोमामा भागलास का या सिनेमामधून झाला. हा सिनेमासुद्धा त्यांना दुरदर्शनच्या नाटकामुळे मिळाला होता.

६. रमेश भाटकर यांची पत्नी मृदुला भाटकर या हाय कोर्टात न्यायाधीश आहेत.

मृदुला भाटकर यासुद्धा रंगभूमीवर अभिनय करायच्या. नवराबायको दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात नको म्हणून त्यांनी अभिनयाचं करीयर सोडून आपल्या कायद्याच्या शिक्षणाकडे लक्ष वळवल. आज त्या मुंबई उच्च न्यायालयात एक कणखर न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर खून खटल्यासारख्या अतिशय महत्वाच्या केस मध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं प्रसारमाध्यमांमध्ये विशेष कौतुक करण्यात आलं .

७. टीव्हीवरच्या भूमिकांनी पूर्ण देशात इन्स्पेक्टर म्हणून ओळख मिळवून दिली.

अधिकारी बंधूनी त्यांना हलो इन्स्पेक्टर या सिरीयलमध्ये त्यांना चान्स दिला. या सिरीयल मधली इन्स्पेक्टर वरदे ही भूमिका गाजली. मराठी बरोबरच हिंदी मधले प्रेक्षकांच्यातही या सिरीयलच नाव गाजलं यामुळे अधिकारी  बंधूनी नुकत्याच सुरु झालेल्या झी या वाहिनीसाठी कमांडर या सिरीयलमध्ये त्यांना रोल दिला. कमांडर ही त्यांची आतापर्यंत सर्वात जास्त गाजलेली सिरीयल होती. पुढे अनेक वर्षांनी तिसरा डोळा या मालिकेमध्ये रमेश भाटकर आपल्या सुप्रसिद्ध खर्जातल्या आवाजात गुन्हेगारांना गार करताना दिसले.

८. रमेश भाटकर यांना हिंदी सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली होती.

रमेश भाटकर यांची कमांडर या सिरीयलची लोकप्रियता एवढी होती की त्यांना एका  हिंदी मधल्या मोठ्या निर्मात्याने हिरोची भूमिका दिली होती. पण त्यावेळी एका मध्यस्त एजंटने त्याच्या कमिशनच्या बोलणीची चर्चा फिसकटल्यामुळे हा रोल भाटकरांना गमवावा लागला. पुढे काही हिंदी सिनेमामध्ये त्यांना छोटे रोल मिळाले पण त्यांचा क्षमतेला न्याय देतील असे रोल न मिळाल्यामुळे त्यांनी हिंदीत काम करणे थांबवले.

९. रमेश भाटकर यांचा सर्वात हिट सिनेमा म्हणजे माहेरची साडी.

मराठीतला आत्तापर्यंतचा ब्लॉकब्लसटर सिनेमा माहेरची साडी या सिनेमामध्ये रमेश भाटकर यांनी अलका कुबलच्या पतीचा रोल केला होता. पण अलका कुबल यांच्याबद्दल पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेत इतर कलाकारांबरोबर रमेश भाटकर यांचा रोल कडे सुद्धा प्रेक्षकांचे दुर्लक्ष झाले.

१०. रमेश भाटकर यांचा मृत्यू जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशी झाला.

रमेश भाटकर हे गेली काही महिने मुंबईच्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. आज ४ फेब्रुवारी रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दुर्दैवी योगायोग म्हणजे आज जागतिक कर्करोग दिन आहे.

तीस वर्षापूर्वी रमेश भाटकर जसे दिसायचे तसेच वयाच्या सत्तराव्या वर्षी दिसायचे. त्यांचा दमदार आवाज त्यांच्या भूमिका लोक कधीच विसरणार नाहीत.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.