अप्पासाहेबांच्या घरात काम करणारा पोऱ्या पुढे जावून “शिक्षणमहर्षी” झाला…..

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळातील ही गोष्ट

तेव्हा आईवडिलांच छत्र नसलेला एका मुलगा शिक्षणाची आस घेवून इस्लामपूरात आला. इस्लामपूरात हा मुलगा वार लावून जेवण करू लागला.

हूशारीच्या बळावर त्याने ११ वी मध्ये ‘धामणस्कर पारितोषिक’ मिळवले व पुढील शिक्षणासाठी तो कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाला. निवासाची सोय मराठा बोर्डिंगमध्ये झाली होती.

पुढे हा मुलगा डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या संपर्कात आला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव ठेवून आयुष्यभर गरिब विद्यार्थांसाठी झटलेले गुरूवर्य. हा पोऱ्या त्यांच्या घरी दूध घेवून जाणे, कपबशा धुवून देणे अशी पडेल ती कामे करू लागला.

‘कमवा व शिका’ ही गोष्ट त्याने अंमलात आणली.

डॉ. अप्पासाहेब पवार यांनी या मुलाला आपले मानसपुत्र मानले. त्याच्या शिक्षणात जातीने लक्ष घातले.

हाच मुलगा पुढे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे म्हणून ओळखला जावू लागला.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून आज बापूजी साळुंखे यांना ओळखण्यात येते. रयत शिक्षण संस्थेपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वांधिक शिक्षण संस्था ‘स्वामी’ च्या असल्याचं सांगण्यात येत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंदाजे ३७० हून अधिक शिक्षण संस्थामार्फत ‘स्वामीचा’ पसारा व्यापलेला आहे.

ही गोष्ट आहे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या संघर्षाची आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेची.

बापूजी इयत्ता सातवीपर्यन्त रामापूर येथे शिकले. या वयात आई वडिलांचे छत्र गेले. पुढे ते इस्लामपूर येथे आले. ११ पर्यन्तचे शिक्षण पूर्ण करून कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या सहवासात त्यांची ओळख अप्पासाहेब पवार यांच्यासोबत झाली. त्यांच्या पाठिंब्यातून ते मराठी आणि संस्कृत विषयाचे सखोल ज्ञान घेवून बी.ए. झाले पुढे ते बी.टी. झाले.

१९४० साली त्यांचा विवाह सुशिलादेवी यांच्यासोबत झाला. या काळात ते सोंडूर संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास लिहण्याची जबाबदारी सांभाळत होते. वास्तविक ही जबाबदारी डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडे होती मात्र आपल्या व्यस्ततेमुळे त्यांनी ही जबाबदारी बापूजींकडे दिली होती.

लग्न होवून बापूजी सोंडूर येथेच मुक्कामी राहू लागले. सोंडूरच्या यशवंतराव घोरपडे यांनी बापूजींना राजपुत्राचे राजगुरूपद बहाल केले.

दरम्यानच्या काळात भारताचा स्वातंत्र्य लढा आकारास येत होता. प्रतिसरकार सांगली सातारा भागात धुमाकूळ घालत होते. १९४२ साली महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देवून ते भूमिगत झाले. भूमिगत होवून ते क्रांन्तीकार्य करू लागले.

बॅरिस्टर नाथ पै, नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड असे सहकारी त्यांना या लढ्यात लाभले.

१९४५ साली साने गुरूजींच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक कार्याला मदत म्हणून या बैठकीत १ लाखांचा निधी गोळा करण्याचे धोरण आखण्यात आले.

त्यावेळेस बापूजी साळुंखे यांच्याकडे विद्यार्थी काॅग्रेसची जबाबदारी होती. बापूजींनी हा निधी गोळा करण्यात सिंहाचा वाटा तर उचललाच पण पुढील सर्व आयुष्य कर्मवीरांच्या रयतच्या कार्याला वाहून घेतले.

कर्मवीरांची रयत वाढवण्यासाठी ते कार्य करू लागले. कर्मवीरांनी त्यांची राहण्याची सोय सातारा येथे केली.

कर्मवीरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख सांगताना सुशिलादेवी सांगतात,

आजही आमच्या घरी कर्मवीरांनी दिलेली भांडी आहेत.

बापूजी साळुंखे साताऱ्यात बोर्डिंगचे सुपरवायझर झाले. पुढे सयाजीराव हायस्कूलमध्ये ते शिक्षक झाले. कर्मवारांच्या रयतच्या रुकडी शाखेची जबाबदारी त्यांच्यावर आली व पुढे ते रुकडीला स्थायिक झाले.

तत्कालीन शिक्षण पद्धत म्हणजे शाळेसोबत विद्यार्थांच्या बोर्डिंगची व्यवस्था, गाई म्हशींचा राबता व शेती असायची. रुकडी येथील शाळेचा कारभार बापूजी पाहू लागले. बोर्डिंगच्या मुलांच्या जेवणाची जबाबदारी सुशिलादेवी पहात असत. या काळात विद्यार्थांना जेवण खावू घालण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यन्त सर्व काम हे दोघे मिळून करत असत.

पुढे १९४५ च्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील व बापूजी साळुंखे यांच्यात वैचारिक मतभेद झाले. तिथूनच स्वतंत्र शिक्षणसंस्था काढण्याचा ध्यास बापूजींनी घेतला.

सर्वश्री झांबरे, माने, काकडे, कुरणे यांच्याबरोबर प्राथमिक बैठक होवून संस्था स्थापनेचा निर्णय पक्का झाला.

दिनांक १९ ॲाक्टोंबर १९५४ साली रामानंद भारती यांनी सुचवलेल्या नावाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेची स्थापना कृष्णा कोयनेच्या संगमावरील योगेश्वर मुरलीधराच्या मंदीरात करण्यात आली.

हळुहळु संस्था मोठी होवू लागली. ठिकठिकाणचे दानशूर व्यक्तीपुढे येवून संस्थेस जागा देवू लागले. त्या काळात अनुदान नसल्याने दहा-पंधरा पैसे गोळा करून बोर्डिंग चालवले जात असत.

कोल्हापूरचे नगराध्यक्ष दादा हळदणकरांकडे बापूंजींनी जून्या बुधवारातील उकिरडे व अस्वच्छता असणारी जागा मागितली. हळदणकरांनी बापूजींना अन्य जागांचा पर्याय सुचवला त्यावर बापूजी म्हणाले,

मला या जून्या बुधवारचा नवा बुधवार करायचा आहे.

पुढे साडेतीनशेहून अधिक संस्था आणि अडीच ते तीन लाख विद्यार्थीसंख्या असणारी संस्था असे स्वरूप “स्वामी” स  मिळाले. शिक्षणावरील अढळ निष्ठ म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी, डॉक्टर्स ॲाफ लेटर्स अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार” या त्रिसुत्रीवर संस्थेचा नावलौकिक झाला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.