चिपळुणच्या सुमित्राताई मध्यप्रदेशातून सलग ८ वेळा खासदार होत गेल्या ते यामुळेच..!

सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सर्वांना पडलेला एकच प्रश्न होता तो म्हणजे अरे त्या मराठी आहेत का? आणि मराठी आहेत तर आजवर त्यांच नाव कस काय माहिती नव्हतं… 

सुमित्रा महाजन मराठीच.

त्यांचा जन्म चिपळूणचा. पुर्वाश्रमीच्या साठ्ये लग्नानंतर इंदौरला जावून महाजन झाल्या. राजकारणाची कोणतिही पार्श्वभूमी नसणाऱ्या त्या अचानक राजकारणात आल्या. नुसत्या आल्या नाहीत तर महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेशात त्या लोकसभेवर सलग ८ वेळा निवडून गेल्या. असा विक्रम करणाऱ्या एकमेव महिला म्हणून त्यांच्या नावावर हा विक्रम कोरलेला आहे. 

देशात मोदी सरकार निवडून आल्यानंतर त्यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर मात्र त्यांच नाव सातत्याने चर्चेत येवू लागलं. त्या मराठी बोलतात, त्या मुळच्या कोकणातील आहे हे लोकांना समजू लागलं. 

एक मराठी व्यक्ती इंदौरमधून सलग ८ वेळा खासदार कशी झाली…? 

सुमित्रा महाजन यांचा जन्म १२ एप्रिल १९४३ चा. त्या चिपळुणच्या कोकणस्थ ब्राह्मण समाजातल्या. माहेरचं आडनाव साठे. १९६५ साली त्यांच लग्न इंदौरचे प्रसिद्ध होजियरी व्यापारी कुटूंबातल्या जयंत महाजन यांच्यासोबत झालं. लग्नानंतर त्यांनी पुढचं शिक्षण पुर्ण केलं. MA आणि त्यानंतर LLB पुर्ण केली. 

याच काळात त्या राष्ट्रसेविका समितीच्या संपर्कात आल्या. इंदौरमध्ये मैनाताई गोखले या रामायणाचे प्रवचन करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या देखील राष्ट्रसेविका समितीमध्ये रामायणावर प्रवचन देवू लागल्या. कालांतराने मैनाताईंच वय झालं आणि ही संपूर्ण जबाबदारी सुमित्रा महाजन यांच्यावर येवून पडली. 

दूसरीकडे राष्ट्रसेविका समिती आणि महाराष्ट्रातील महिलांचे संघटन असणाऱ्या भगिनी मंडळात त्या सक्रीय झाल्या. 

दरम्यानच्या काळात आणिबाणी लागू झाली.

आणिबाणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली जावू लागली. अशा काळात संबंधित कुटूंबावर वाईट वेळ येत. दोन वेळेच्या अन्नाला देखील असे कुटूंब महाग होत असत. सुमित्रा महाजन आपल्या सायकलवरून अशा कार्यकर्त्यांच्या कुटूंबाना भेटी देत. त्यांची मदत करत. यातून लोकसंपर्क वाढू लागला. 

आणिबाणी उठली. त्यानंतरच्या निवडणूकीत कॉंग्रेसविरोधी उमेदवारांच्या प्रचारात त्या भाषण देवू लागल्या. सुमित्रा महाजन यांना मिळालेलं हे पहिलं व्यासपीठ. यामुळे लोकांना त्यांचे विचार समजू लागले आणि बघता बघता त्या लोकप्रिय होवू लागल्या. 

१९८२ साली त्या इंदौरच्या महापालिका निवडणूकीत उतरल्या आणि निवडून आल्या.

१९८४ साली त्या इंदौरच्या उप महापौर देखील झाल्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्या मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीसाठी उभा राहिल्या. इथे मात्र पहिल्याच निवडणूकीत त्यांना पराभव पचवावा लागला. कॉंग्रेसचे उमेदवार महेश जोशी यांनी त्यांचा पराभव केला. 

पाच वर्ष गेली. १९८९ साली देशात निवडणूका लागल्या. 

इंदौरमधून कॉंग्रेसचे उमेदवार होते प्रकाशचंद्र सेठी. प्रकाशचंद्र सेठी हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. देशाचे माजी गृहमंत्री होते. कॉंग्रेसचे ते मात्तब्बर नेते म्हणून ओळखले जायचे. अशा नेत्याच्या विरोधात उमेदवार देणं हेच मोठ्ठ आव्हान होतं. वेगवेगळ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. ही जागा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होती. 

या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी अनपेक्षितपणे नाव समोर आलं ते सुमित्रा महाजन यांच. त्यांना उमेदवारी देण्यात कुशाभाऊ ठाकरे यांची भूमिका महत्वाची होती. 

अनपेक्षितपणे मिळालेली उमेदवारी आणि निवडून येवून दिलेला धक्का…! 

कॉंग्रेसचा मातब्बर नेता, माजी मुख्यमंत्री, देशाचा माजी गृहमंत्री अशा व्यक्तीला निवडणूकीत पराभूत करण्याच काम सुमित्रा महाजन यांनी केलं. त्या वेळेपासून ते २०१९ पर्यन्त म्हणजे सलग आठ वर्ष सुमित्रा महाजन निर्विवादपणे इथून निवडून येत गेल्या. 

देशात जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार आलं तेव्हा त्यांना राज्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर असाच अनपेक्षित धक्का देत मोदी सरकारच्या पहिल्या काळात त्यांना लोकसभेचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. 

२०१९ साली मात्र वयाची ७५ पार केल्याचं कारण सांगून त्यांच्या उमेदवारीवर कात्री लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. तत्पुर्वीच त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं घोषीत करुन टाकलं होतं. 

पण मुळ मुद्दा उरतो तो त्या मराठी असूनही इंदौरमधून खासदार कशा झाल्या. ते देखील इतक्या विक्रमी वेळा. तर याच उत्तर मिळतं ते त्यांचा कामात. राष्ट्रसेविका मार्फत घराघरात जोडलेले संबंध, इंदौरचा मराठी बाज सोबतच कॉंग्रेसचे गटातटाचे राजकारण अशा अनेक गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडत गेल्या व त्या विक्रम रचत गेल्या.

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. rohit says

    very impresive

Leave A Reply

Your email address will not be published.