चार चौघीत उठून न दिसणारी सामान्य रुपाची मुलगी चक्क सिनेमाची हिरोईन होते..

१९७४ चा रजनीगंधा हा एक सरप्राइज हिट होता. अनेक वेळा या वर लिहून आलं आहे म्हणून बोटं अजून बदडत नाही. परंतु एक बात काबिल ए तारीफ होती त्याकाळी आलेल्या या चित्रपटात. ती म्हणणे या कथेतली सगळी पात्रं अगदी तुमच्या आमच्या सारखी होती. नॉर्मल. इकडे डाकू नव्हते, स्मगलर नव्हते. हिरे नव्हते आणि गांव की गोरी नव्हती.

त्या काळातल्या तरुण पिढीला आकर्षून घेणारं, त्यांच्या मनोविश्वात अढळ स्थान मिळवणार असं काहीतरी नक्की होतं या सिनेमात.

आणि या कलाकारांमध्ये, अमोल पालेकर व विद्या सिन्हा.

ज्या काळात हेमा सारखं नेत्रदीपक सौदर्य, रेखा सारखा atom bomb आणि परवीन झीनत सारख्या बोल्ड नायिका इंडस्ट्री गाजवत होत्या त्या काळात चार चौघीत ही उठून न दिसणारी सामान्य रुपाची ही मुलगी चक्क सिनेमाची हिरोईन होते आणि लोकांना आवडू लागते. एक सुखद बदल होता. जया भादुरी नंतर विद्या ही ती नायिका होती जिच्या मध्ये लोकांनी A Girl Next Door पाहिली होती.

गंमत म्हणजे विद्याचे वडील प्रताप राणा हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माते होते. विद्याने आधी साड्या वगैरे अशी मॉडेलिंग केली होती. चक्क मिस बॉम्बे सुद्धा झाली होती ती असा उल्लेख आहे. तिचा पहिला सिनेमा हा किरण कुमार बरोबर राजा काका नामक एक फ्लॉप होता. इकडे रजनीगंधा साठी बासू चॅटर्जी यांना मलिका साराभाई हिने विनम्र नकार दिल्यावर त्यांना कुणीतरी विद्याचे नाव सुचवलं. आणि मग रेस्ट इज हिस्टरी.

त्या दहा बारा वर्षात विद्याने फार मोजकेच सिनेमे केले कारण तिच्या “घरेलु” लूकची लिमिटेशनस किंवा निर्माते दिग्दर्शक कंपूची मानसिकता…

असं असलं तरी राज एन सिप्पी, बी आर चोप्रा, गुलजार सारख्या दिग्गजांबरोबर विद्याने काम केलं आहे. आणि खणखणीत केलं आहे. पती पत्नी मधली तिची पत्नी ही रंजीता च्या वो समोर तितकीच ठाम उभी राहते. किताब मधली त्रासलेली, थोडीशी खडूस बहीण ही छान होती. मुक्ती मधली लल्ला लल्ला लोरी म्हणत स्फुंदणारी असहाय्य आई सुद्धा छानच…

उतरत्या ऐंशीच्या दशकात मात्र काळाची पावलं ओळखून तिने फिल्म इंडस्ट्री चा निरोप घेत आपला शेजारी आणि बचपन का साथी वेनकेश्र्वरन अय्यर शी लग्न केलं.

त्याच्या अकाली मृत्यू नंतर विद्या ऑस्ट्रेलिया ला गेली आणि तिथे एका व्यक्तीशी विवाह केला. पण हे सुख ही काही तिला लाभलं नाही. मारझोड झाल्याचे आरोप करत तिने लग्न आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही सोडलं. सल्लू भाई च्या बॉडीगार्ड मधून ती हिंदी सिनेमा नंतर टिव्ही क्षेत्रात आली. तिचं परत येणं सुद्धा तसच फारसा गाजावाजा न करता, भपका न गाजवता झालं. पण तिचा गोड, मनमिळावू स्वभाव या मुळे तिला परत कामं मिळत गेली.

तिचे दिग्दर्शक नेहमीच तिचं कौतुक करत राहिलेत. ती director’s actress होती.

बासू दा (रजनीगंधा, छोटी सी बात) आज नव्वद वर्षांचे झालेत. तरी विद्या सिन्हा म्हटलं की त्यांचे डोळे चमकतात. ती त्यांना आपले गुरू मानायची. बासू दांची मुलगी रुपाली च्या मालिकेमध्ये विद्या लगेच काम करायला तयार झाली आणि रुपालीला ती आपल्या मुलीसारखी वागवत असे.

गुलजार सुद्धा हळुवार पणे म्हणतात,

“विद्या आणि मी, आम्ही दोघांनी ही उत्तम कुमार बरोबर काम करणं एन्जॉय केलं. अशी ती बिलकुल डोक्यात हवा नसलेली मुलगी होती. सगळ्यांशी हसून खेळून राहणारी मग तो स्पॉट बॉय असो की कुणी हिरो…”

विद्याच हसू खूप लोकांना आवडायचं. गुलजार त्याला “दुधीया” असं म्हणतात…इतकं शुभ्र आणि चमकदार असावं नक्की…

जब वो हंसती थी आप भी उस के साथ हंस पडते थे…

आता मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात तिच्या सौम्य दर्वळाच्या आठवणीने अश्रू आले आहेत.

हे हि वाच भिडू.