हायसा कुठं? टेन्शन फ्री करायला पुरुषांचं ‘आय-पिल’ येतंय

आमच्या वर्गात एक जोडपं होतं. पार कॉलेजच्या दिवपासून त्यांच्यातलं प्रेम बहरलेलं. जसं दोघं नोकरीला लागले, तसं अगदी साधेपणात लग्न केलं. लग्नाच्या आधीच या दोघांनी ठरवलेलं, ‘हम दो, हमारा एक.’ घरच्यांची काय घाई नव्हती, पण जोडीला लवकरच एक गोंडस पोरगं झालं. आता पोरगं थोडंफार मोठं होतंय, पण स्वतःशी खेळून कंटाळत असेल की.

म्हणून दोघांच्या घरातली म्हणली, त्याला एखादं भाऊ-बहीण असायला पाहिजे.

आता आपल्या देशात घरच्यांची नातवंडांची अपेक्षा आणि आग्रह काय नवा नाय. पण आमच्या या रोमिओ-ज्युलिएटमध्ये त्यावरनं लय राडा झाला. लेकरू दोघानांही नको होतं, मग राडा झाला कशावरुन? तर ऑपरेशनवरुन.

आमच्या रोमिओला सुई आणि ऑपरेशन या गोष्टींची लय डेंजर भीती, त्यात ऑपरेशन झाल्यावर काही गंभीर मॅटर झाला तर? याचं वेगळंच टेन्शन.

आमच्या ज्युलिएट वहिनी म्हणल्या, ‘नेहमी बायकांनीच ऑपरेशन का करायचं, मी नाही करणार…’

रोमिओला आलं टेन्शन, मग त्यानं आम्हाला सोल्युशन मागितलं. हे म्हणजे इंझमाम उल हक ला १०० मीटर पळण्याबाबत सल्ला मागितल्यासारखं होतं, कारण आमची गॅंग बिनलग्नाची. पण आमच्याकडे इंटरनेट नावाची पॉपर ए… आम्ही हुडकलं आणि भावाला खुशखबर दिली.

‘पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांची चाचणी यशस्वी, लवकरच येणार बाजारात’

त्याला सांगण्याआधीच आमच्या फ्युजा उडालेल्या. बालसुलभ वयात मालाडीची जाहिरात आणि तरुणसुलभ वयात आय-पिलशी संबंध येईल अशा घटना घडल्यामुळं स्त्रियांसाठी गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा वापर होतो हे माहीत होतं. पण पोरांसाठी गोळ्या? घेतल्यानं शरीरात प्रोसेस काय होणार? आपलं तर अजून लग्न व्हायचंय, काय लफडं झालं तर? असे लय प्रश्न पडले.

आत्ताच या गोळ्या चर्चेत का आल्या?

तर झालं असं, की या गोळ्यांची उंदरांवर चाचणी घेण्यात आली. चाचणीचा निकाल ९९ टक्के यशस्वी आला. उंदरांनी गोळ्या घेतल्यानंतर चार आठवड्यांनी ते पुन्हा प्रजननासाठी सक्षम झाले. 

उंदरावर केलेली चाचणी यशस्वी आल्यानंतर साहजिकच आता पुरुषांवरही लवकरच चाचणी होणार…

पण ही गोळी आहे तरी काय आणि ती तयार कुणी केली?

ही गोळी हे एक वैज्ञानिक सुत्रीकरण आहे, ज्याचं नाव आहे GPHR-529 किंवा YCT529. लिहिता लिहिता डोक्यात आलं, हे मेडिकलमध्ये मागायचं म्हणलं तर पाठ करुन जावं लागेल. पण जिथं आपण इतर साधनांसाठी कोडवर्ड काढले तिथं हे काहीच नाही.

हे सूत्रीकरण तयार केलंय, मोहम्मद अब्दुल्ला अल नोहान आणि गुंदा जॉर्ज (मॅडम आहेत नावावर जाऊ नका) या दोघांनी. मोहम्मद अब्दुल्ला हे बांगलादेशमध्ये शिकले आणि सध्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा मध्ये ते पीएचडी करत आहेत. तर जॉर्ज मॅडम या इन्स्टिट्यूट ऑफ थेरप्युटिक्स अँड डिस्कव्हरीच्या डायरेक्टर आहेत. हे दोघंही पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधकांवर सातत्यानं काम करत आहेत.

पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्यायच्या, इफेक्ट किती दिवस राहणार, इफेक्ट अचानक संपला तर गणित बिघडणार, तर नाय ना… अशा लय लडतरी आहेत, पण गोळी आल्यावर डिटेल समजतीलच की.  

आता भिडू लोक, साधी क्रोसिन घेतानाही आपण अर्धीच घेतो का तर काय साईड इफेक्ट्स नको व्हायला.

मग आयुष्यातल्या अगदी महत्त्वाच्या विषयाशी निगडित असलेली ही गोळी घ्यायच्या आधी आपण पन्नास वेळा विचार करणार.

पण विषय असाय की, ही गोळी पुरुषांमध्ये हार्मोनल चेंजेस घडवून आणणार नाही. ही पुरुषांमधल्या व्हिटॅमिन ए ला टार्गेट करते. पुरुषांमधली प्रजनन क्षमता कायम राहण्यात व्हिटॅमिन ए चा फार मोठा वाटा असतो. या व्हिटॅमिनचा म्हणावा तसा पुरवठा किंवा परिणाम झाला नाही, तर प्रजनन क्षमतेचं मीटर डाऊन होत असतंय. पुरवठा वाढला की मीटर अप.

आता सध्या तरी नुसत्या ट्रायल्स सुरू आहेत, त्यातही अजून प्रत्यक्ष माणसांवर ट्रायल्स सुरू झालेल्या नाहीत. मार्केटमध्ये कधी येणार? असा प्रश्न पडला असला तर जरा आठवा लशी मार्केटमध्ये यायलाच किती वेळ लागला होता.

भारतात जेव्हा पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून नसबंदीची स्कीम आलेली, तेव्हा काय मेजर राडा झालेला तुम्हाला वेगळं सांगायला नको. आता कम्पल्सरी नसलं, तरी नसबंदीचा पर्याय उपलब्ध आहेच. इतरही स्वस्त आणि बरेच पर्याय आहेत. 

गोळी येण्याची वाट बघत बसू नका… आहेत त्या गोष्टी वापरुन जरा दमानंच घ्या… यात इस्क असलं, तरी रिस्क लय मोठी असती…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.