बायकोची परवानगी काढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी चिंटूला साईन केलं

वडील पृथ्वीराज कपुर हे बाॅलिवुडमधले ‘मुगल-ए-आझम’. वडिलांची आणि त्याची तुलना होणं साहजिक होतं. पण तरीही तो ‘आवारा’ होता. कोण काय बोलतंय याची त्याला अजिबात चिंता नव्हती. त्याचे भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर बाॅलिवुडच्या व्यावसायिक सिनेमांमध्ये ब-यापैकी लोकप्रिय होत होते. दोन भावांच्या बाॅलिवुड प्रवेशाच्या आधीपासुनच १९३५ पासुन राज कपूर बाॅलिवुडमध्ये काम करत होता.

वयाच्या दहाव्या वर्षीच ‘इन्कलाब’ या सिनेमातुन बाॅलिवुडमध्ये दाखल झालेला राज कपूर १९४७ च्या ‘नील कमल’ सिनेमातुन पहिल्यांदा हिरो म्हणुन झळकलेला.

समोर हिरोईन म्हणुन होती सौंदर्यवती मधुबाला. राज कपूरने वयाच्या २४ व्या वर्षी आर.के.स्टूडिओ उभारला. सुरुवातीला नुकसान सहन करावं लागलं पण नंतर ‘आवारा’, ‘बुटपाॅलिश’, ‘श्री ४२०’ हे आर.के.स्टुडीओचे सिनेमे सुपरहिट झाले. याच दरम्यान १९५३ साली ‘जीवन ज्योती’ सिनेमातुन शम्मी कपुर देखील ‘याsss हू’ म्हणत बाॅलिवुडमध्ये आला.

विषय आहे राज कपूरचा.

१९४६ साली राजचं कृष्णा मल्होत्राशी लग्न झालं. पुढे या दोघांना रणधीर, ॠषी, राजीव हि तीन मुलं तर रितु, रिमा या दोन मुली झाल्या. राज कपुरचे सिनेमे प्रेक्षकांना आवडत होते. आर.के.स्टुडिओ सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या विस्तारत होता.

या सर्वातच ज्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल असा ‘मेरा नाम जोकर’ सिनेमा बनवण्याचं राज कपूरने ठरवलं.

‘मेरा नाम जोकर’ चं शुटींग सुरु होणार होतं. स्वतः राज कपूर सिनेमा दिग्दर्शित करणार होता. मनोज कुमार, धर्मेंद्र, सिमी गरेवाल, दारा सिंग अशी तगडी स्टारकास्ट होती. राज कपूर ‘राजु’ ची प्रमुख भुमिका साकारणार होता. ‘राजू’ या व्यक्तिरेखेचं तरुणवय साकारणारा एक उत्तम कलाकार राज कपूरला हवा होता. ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ अशी राज कपूरची अवस्था झाली होती.

स्वतःची तीन मुलं असताना त्यांच्यापैकीच एकाला सिनेमात का घेऊ नये, असा विचार राज कपूरच्या मनात डोकावला.

विचार जरी मनात असला तरीही त्यासाठी पत्नीची परवानगी घेणं आवश्यक असतं. एकदा डायनिंग टेबलवर पत्नी आणि मुलांसमवेत राज कपूर जेवायला बसला होता. त्यावेळी अचुक साधत राजने पत्नीला विचारलं,

‘ मेरा नाम जोकर साठी मी तुझ्या चिंटूला घेण्याच्या विचारात आहे.’

आपल्या सर्वांनाच माहितीय ॠषी कपूर यांचं टोपणनाव ‘चिंटू’ आहे. कृष्ण राज कपूर यांनी राज कपूरचं म्हणणं ऐकलं. त्या म्हणाल्या,

‘ त्याच्या अभ्यासात काही नुकसान होणार नसेल तर जरुर तुम्ही त्याला सिनेमात घेऊ शकता.’

पत्नीकडुन संमती मिळाल्यावर राज कपूरचा जीव हायसा झाला.

राज कपूर आणि कृष्णा या पती-पत्नींमध्ये हे संभाषण चालु असताना या दोघांचा लाडका ‘चिंटू’ अर्थात ॠषी कपूर तिथेच शांतपणे जेवत होता. वडिलांचं हे बोलणं ऐकल्यावर आणि आईचा होकार आहे असं कळाल्यावर चिंटूच्या मनात आनंदाचे लाडु फुटले होते. पण तो मुद्दाम शांतपणे जेवत होता.

तिथेच आनंद साजरा केल्यावर आई तिचं म्हणणं बदलेल अन् सिनेमात काम करायची परवानगी देणार नाही, याची चिंटूला धास्ती होती.

जेवण संपवुन तो जवळपास धावतच त्याच्या खोलीत गेला. खोलीत गेल्यावर स्वतःच स्वतःसाठी आनंद साजरा केला. ॠषी कपूर त्यावेळी १८ वर्षांचा असावा. त्याने सर्वप्रथम काय केलं असेल??? तर..

ॠषीने कागद घेतला आणि भविष्यात मोठा स्टार होणार या विचाराने लोकांना ऑटोग्राफ देण्यासाठी ॠषीने कागदावर स्वतःच्या ऑटोग्राफचा सराव केला.

ॠषी कपूरचा नंतरचा प्रवास आपल्याला माहितच आहे. मराठीत एक म्हण आहे ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’. वडिलांनी ‘मेरा नाम जोकर’ साठी घेतल्यावर पुढे मी मोठा कलाकार होणार हे स्वतः ॠषीने ठरवलं होतं. म्हणुनच तो नकळत्या वयातही थेट ऑटोग्राफचा सराव करु लागला. अर्थात राज कपूर यांनी सुद्धा पहिल्याच सिनेमात मुलाला चांगली भुमिका दिलीच आणि उत्तम अभिनय सुद्धा करवुन घेतला.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. रश्मी says

    तुम्हीमजकूर लिहून झाल्यावर तो तपासण्यची तसदी घेत नसाल असच वाटतं आहे….भाषेविषयीच्या चुका हमखास असतात….तेही एक दोन नव्हे तर अनेक….. यापूर्वीही मी ही बाब तुमच्या निदर्शनास आणून दिली होती….भाषेच व्याकरण, शुद्धलेखनाचे नियम सगळच कस तुम्ही धाब्यावर बसवता…

Leave A Reply

Your email address will not be published.