लग्नात घेतलेल्या हुंड्याच्या पैशातनं “मर्सिडीज” कंपनी सुरू झाली.

मर्सिडीज बेंझ ही जर्मन कंपनी आपल्या लक्झरी गाड्यांसाठी जगभर ओळखली जाणारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. मर्सिडीज बेंझ विकत घेणं हे अनेकांचं स्वप्नं असतं. या कंपनीचं एक ब्रीद वाक्य आहे,

‘Best or nothing’

जे काही बनवू ते सर्वोत्तम असले पाहिजे ही त्यामागची प्रेरणा अणि या कंपनीने ते साध्य ही करून दाखवले आहे. जगातील लक्झरी गाड्या विकणारी सर्वात मोठी कंपनी आज मर्सिडीज बेंझ आहे.

आज जरी ही कंपनी सर्वोत्तम असली तरी हिची सुरवात इतकी सोपी नव्हती. आज अब्जावधीची ब्रँड व्हॅल्यु असणारी ही कंपनी पैशाअभावी एके काळी बंद पडणार होती.

ह्या कहाणीची सुरवात होते १८८६ सालापासून.

१८८६ साली कार्ल बेंझ नावाच्या ऑटोमोबाईल इन्जिनिअरने एक गाडी बनवली त्याने पेटंट ही मिळवले. तिला “बेंझ पेटंट मोटरवागेन” असे म्हणू जाऊ लागले. ही जगातील पहिली वहिली मोटार गाडी होती. या गाडीची किमत बेंझने १५० डॉलर्स इतकी ठेवली.

याच काळात अजून एक माणूस गाडी बनवण्याच्या ध्यासाने पछाडलेला होता त्याचे नाव होतं गोथिॲब डेमलर.  त्याने किंग ऑफ डिझाईन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलीहेम मेबॅक याच्या बरोबर मिळून घोडागाडीला पेट्रोलचं इंजिन जोडले आणि एक मोटारकार बनवली. या गाडीची चर्चा ती लॉंच होण्याच्या आधीपासूनचं होती.

१८९७ साली एमिल जेन्निलेक नावाच्या गर्भश्रीमंत जर्मन उद्योजकाने पहिली कार विकत घेतली. त्याला ती कार प्रचंड आवडली. त्याचातल्या उद्योजकाने त्या गाडीची क्षमता आणि मागणी ओळखली. लगेचच त्याने गोथिॲब डेमलरला सांगितले,

“मी तुझी कार प्रचंड आवडली आहे. तुझ्या कंपनीत गुंतवणूक करण्यास देखील मी तयार आहे. अशा शेकडो गाड्या बनवता येतील. फक्त एक अट आहे.”

डेमलर आर्थिक दृष्ट्या कमजोर होता त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने त्या एमिल जेन्निलेकच्या सगळ्या अटी मान्य करून त्याच्या करारावर सही केली. यातली सर्वात महत्वाची अट अशी घातली की तयार झालेली गाडी “मर्सेडिज” या नावाने विकली जाईल.

“मर्सिडीज” हे एमिल जेन्निलेकच्या मुलीचे नाव होते.

q6

पुढे १९०१ साली पहिली मर्सिडीज बाजारात आली. ही गाडी सुरवातीच्या मॉडेलपेक्षा बरीच वेगळी होती त्यात खूपच सुधारणा केल्या गेल्या होत्या. ही गाडी दिसायला ही प्रचंड आकर्षक होती. या गाडीने काही महिन्यातच प्रचंड लोकप्रियता मिळवली.

पुढे मात्र पहिल्या महायुद्धामुळे जर्मनीतील सर्वच ऑटोमोबाईल इंडस्ट्री अडचणीत आली. सरकारने टॅक्स अनेक पटीने वाढवले. त्यामुळे गाड्या बनवणे अशक्यप्राय गोष्ट बनून बसली. याच काळात पेट्रोलचा ही प्रचंड तुटवडा जर्मनीला भासला आणि हा उद्योग अजूनच अडचणीत आला. त्याची झळ गोथिॲब डेमलरला बसली. इतकी की कंपनी कशीबशी टिकावी म्हणून त्याने सायकल आणि टाईप रायटर तयार करून विकले. त्याचा पण काही उपयोग झाला नाही.

तिकडे कार्ल बेंझच्या कंपनीचीही हीच अवस्था होती. म्हणून १९१९ ला कार्ल बेंझने, गोथिॲब डेमलरला आपण दोन्ही कंपन्या विलीन करुयात असा प्रस्ताव दिला. पण गोथिॲब डेमलरने नकार दिला.

मध्यंतरी चार वर्ष गेली परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. दोघांनीही ओळखले आत्ता एकत्र येण्या शिवाय गत्यंतर नाही. १९२४ साली अखेर या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आणि तयार झाली “मर्सिडीज बेंझ”.

पुढच्याच वर्षी कंपनीने ८००० गाड्या विकल्या. १९३० ते १९४३ पर्यंत मर्सिडीजचं  मर्सिडीज बेंझ-७७० हे मॉडेल तुफान चालले. हिटलर पण मर्सिडीज बेंझ-७७० गाडी वापरायचा. यानंतर मात्र कंपनीने मागे वळून पहिले नाही. कंपनीने सुरक्षितता आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टीनां समोर ठेवून बाजारात अनेक मॉडेल्स आणली ती ही बरीच यशस्वी झाली.

 आज ह्या कंपनीत जवळपास एक लाख साठ हजार लोकं काम करतात. पण ही कंपनी सुरूच झाली नसती जर कार्ल बेंझच्या पत्नीने कार्लला पैसे दिले नसते.

त्याचे झाले असे की कार्ल बेंझने मोटरवॅगेनचा कच्चा आराखडा तयार केला होता, पण गाडी बनवण्यासाठी लागणारी जागा आणि सामग्री त्याच्या जवळ नव्हती. बर ती घेण्यासाठी पैसे ही नव्हते. कार्लला काहीच सुचत नव्हतं. अशा वेळेस त्याच्या पत्नीने म्हणजेच बर्था बेंझ हिने माहेरून हुंड्यात आणलेले पैसे कार्लला दिले आणि मग पहिली मोटरवॅगेन तयार झाली. बर्थाने कार्लला पेटंटची प्रक्रियेसाठी पण पैसे दिले होते.

अजून एक विशेष गोष्ट म्हणजे  जेव्हा गाडी बनली मोटरवॅगेन तेव्हा तिला पहिल्यांदा चालवली बर्था बेंझनेच. (बेंझ दादा कडे पर्यायचं नव्हता. बायकोच्या हुंड्याचे पैसे.)

म्हणजेच जगातली पहिली ऑटोमोबाईल कार एका स्त्रीने चालवली होती.  

गंमतीचा भाग सोडला तर कार्ल बेंझने शोधलेल्या मोटरवॅगणची टेस्ट ड्राईव्हर, फिल्ड टेस्ट इंजिनियर बर्थाच होती. तिच्यामुळेच लाकडी ब्रेकच्या ऐवजी लेदर ब्रेक पॅड, कार मधलं इन्सुलेटेड वायरिंग, फ्युएल लाईन डिझाईन इत्यादीचा शोध तिनेच लावला. जर त्याकाळचे कायदे विरुद्ध नसते तर पहिल्या कारच्या पेटंटवर तीच देखील नाव असत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.