या सव्वा लाख मतांनी दाखवून दिलयं ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ अजून संपलेली नाही….
२०१८ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष त्यावेळी बेळगावमधील जागांकडे होतं. कारण इथून हमखास महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येत असतं. पण त्या निवडणुकीत समितीचा एक हि उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आणि तिथूनच चर्चा चालू झाली ६२ वर्षांपासून सीमाभागासाठी लढा देत असलेली समिती आता संपली की काय….
मात्र समिती अजून बाकी होती…
२०२१ ची लोकसभा पोट निवडणूक. महाराष्ट्र एकीकरण समितीनं २५ वर्षाच्या शुभम शेळकेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. शिवसेनेनं देखील शुभमला पाठिंबा दिला. आज निकाल लागला तेव्हा बेळगाव लोकसभा मतदारसंघातून शुभमनं तब्बल सव्वा लाख मत घेतली आहेत. त्यामुळे मतांनी दाखवून दिलयं कि ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ अजून संपलेली नाही.
असा आहे समितीचा राजकीय इतिहास..
बेळगाव म्हणजे आजपर्यंत मराठी माणसाणं ज्या भूभागासाठी आणि ज्या अस्मितेसाठी आपल्या मागच्या ३ पिढ्या खर्ची घातल्या असा हा प्रदेश. अखंड महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी भाषिक मागच्या ६२ वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र या स्वप्नांसाठी लढत आहेत. तिथं वेगवेगळी आंदोलन उभी करतं आहेत. मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज देत आहेत.
हा लढा जिवंत ठेवण्यात आणि अग्रभागी होऊन लढण्यात महाराष्ट्र एकीकरण समितीनं कायमच महत्वाची भूमिका पार पाडली आहे. या सगळ्या दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती लोकेच्छा दर्शविण्यासाठी आणि आपला आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचवण्यासाठी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका लढवण्यास सुरुवात केली. समितीच प्राबल्य प्रामुख्यानं सीमाभागातील बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी या भागांमध्ये होतं.
त्यामुळे काही निवडणुकांचा अपवाद सोडल्यास समितीचे उमेदवार सातत्याने निवडून येत गेले. १९५७ साली समितीचे सर्वोच्च ७ आमदार निवडून आले होते. त्यानंतर १९६२ साली ६, १९६७ साली २, १९७२ साली ३, पुन्हा १९७८ साली ५ असे आमदार निवडून येत गेले.
या दरम्यान जेव्हा सीमाभागाच आंदोलन सर्वोच्च बिंदूवर होते त्यावेळी समितीच्या एपी पाटील, आनंद गोगटे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये १ लाखांहून अधिक मत मिळाली होती.
पण काळ बदलत गेला आणि समितीलासुद्धा अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं.
१९९९ च्या निवडणुकीतही समितीला पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत समितीनं पुन्हा २ जागा मिळवल्या. पुढे मराठी भाषिकांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून मतदारसंघांची फोडाफोडी केली. त्याचा फटका २००८ च्या निवडणुकीत समितीला बसला आणि पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं.
याच निवडणुकीदरम्यान समितीमध्ये फाटाफूट झाली…
२००८ मध्ये किरण ठाकूर यांनी शहर सामितीची स्थापना केली, तर दीपक दळवींचा दुसरा गट. पण २०१३ मध्ये कै. सुरेश हुंदरे यांनी पुढाकार घेऊन सीमावासीयांचे मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी जाहीर केलेल्या ४० जणांच्या यादीमधील सगळ्यांना बोलावून त्यांची संयुक्त बैठक घेतली.
त्यांनी दोन्ही गटांत समझोता करून किरण ठाकूर अध्यक्ष आणि दीपक दळवी कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली साऱ्यांना कार्य करण्यास भाग पाडले. निवडणूक झाली आणि २०१३ मध्ये पुन्हा समितीचे २ आमदार झाले. मात्र त्या निवडणुकीनंतर एक दिवसही अध्यक्ष, कार्याध्यक्ष, इतर सभासद आणि समितीचे निवडून आलेले आमदार यांनी एकत्रितपणे काम केलं नसल्याचं सांगितलं जात.
त्यामुळे पुन्हा एकदा एक गट किरण ठाकूर म्हणून, तर दुसरा गट दीपक दळवी म्हणून कार्यरत राहिला. शहर आणि तालुक्यातील मराठी जनता, नेते, कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले. इथूनच समितीची ताकद कमी होण्यास प्रारंभ झाला.
त्यामुळे २०१८ च्या निवडणुकीत समितीच्या चारी उमेदवारांचा धुव्वा उडाला. कर्नाटक विधानसभेतुन समिती बाहेर गेली.
समिती एकसंध होती तोपर्यंत बेळगावात कर्नाटकचे मंत्री जाहीर कार्यक्रमात भाग घेण्याचं धाडस करत नव्हते. समितीचं कोणतही आंदोलन असलं तरी त्यात सर्वसामान्य मराठी भाषिकांचा सहभाग असायचा. आंदोलनं यशस्वी व्हायची आणि पोलिसपण मराठी भाषिकांना हात लावण्याचं धाडस करत नसायचे.
पण मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांकडे आपण लक्ष दिलं तर बेळगाव महापालिकेवर लाल-पिवळा झेंडा फडकवण्याची घटना, मणगुत्ती मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच प्रकरण असेल, किंवा सातत्यानं मराठी भाषिकांवर होणारी मारहाण, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे यामुळे समितीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाली.
पण सप्टेंबर २०२० मध्ये इथले भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन झालं. आणि इथं पोट निवडणूक जाहीर झाली. यात महाराष्ट्र एकीकरण समितीनं एकमतानं० शुभम शेळके या २५ वर्षीय तरुणाला रिंगणात उतरवलं. प्रचार सुरु झाला. अन्यायाचा राग मराठी भाषिकांमध्ये होताच.
अशातच शिवसेनेने देखील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शुभम शेळकेला पाठिंबा जाहीर केला, आणि नुसता जाहीरच केला नाही तर शिवसेनेचे नेते संजय राऊत, खासदार धैर्यशील माने यांनी प्रचारसभा, रोड शो देखील घेतले.
शुभमच्या उमेदवारीचा आणखी एक फायदा म्हणजे एक तर तो तरुण आहे. त्यामुळे आताच्या पिढीतील मराठी भाषिकांपर्यंत समिती आणि सीमावाद पोहचण्यास मदत झाली. त्यांचा पाठिंबा देखील मिळाला. बेळगाव आणि आजूबाजूच्या मराठी भाषिक गल्ल्या-गल्ल्यांमध्ये समितीचा आवाज पुन्हा पहिल्यासारखा घुमू लागला. बॅनरवर समितीचा सिंह पुन्हा दिसू लागला.
हेच चित्र आता आज जेव्हा निकाल जाहीर होतं आहे तेव्हा देखील पाहायला मिळतं आहे, यात भाजपच्या मंगला अंगडी यांना ४ लाख ४० हजार ३२७ तर काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांना ४ लाख ३५ हजार ८७ मत मिळली आहेत. पण खरी लक्षणीय मत घेतली आहेत ती शुभम शेळके या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराने. ती आहेत तब्बल सव्वा लाख मत.
याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे कि, हे सव्वा लाख लोक अजूनही समितीच्या पाठीमागे भक्कम उभे आहेत आणि समिती अजूनही संपलेली नाही….
हे ही वाच भिडू.
- थरार.. ३४ वर्षांपूर्वीच्या बेळगाव आंदोलनाचा !
- मारवाडी मिठाईवाल्याची रेसिपी गंडली त्यातून बेळगावचा कुंदा जन्मला
- त्यादिवशी बेळगावमध्ये पवारांच्या पाठीवर वळ उठेपर्यन्त कर्नाटक पोलीसांनी मारलं…