चर्चा १० वर्ष आणि काम ५ वर्षांत, असा झाला पुणे मेट्रोचा प्रवास

पुणे तिथं काय उणे, हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण एक सच्चा पुणेकर म्हणून सांगायचं झालं, तर पुण्यात लय गोष्टी नाहीयेत आणि त्यावरुन लय जणांचं काय काय ऐकून घ्यावं लागायचं. आता उदाहरण द्यायचं तर आमची आजी. आजीचं सगळं आयुष्य गेलं मुंबईत, काही वर्षांपूर्वी ती पुण्याला शिफ्ट झाली. आता नेमकं साल आठवत नसलं, तरी तेव्हा सेना आणि भाजप एकत्र होते, महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाकडून खेळत होता आणि कोविडचा लांबलांबपर्यंतही अंदाज नव्हता.

तर हा आजी पुण्यात आली आणि पहिल्या पंधरा दिवसात वैतागली. तिला सारखं माणसांमध्ये राहायची सवय, त्यात दुपारी काय तिचा डोळा लागायचा नाही. कुठं बाहेर जायचं म्हणलं की, पुणेरी रिक्षावाल्यांशी तिचं पटायचं नाय, पीएमपीएमएलनं जायचे एक-दोन अयशस्वी प्रयत्न तिनं करुन पाहिले, पण तिला काय दमछाक सहन होईना. आजी म्हणली, परत मुंबईला जाते… पण आम्ही तिला थांबवून ठेवलं कारण आम्हाला माहीत होतं की, मेट्रो येतीये.

पुण्याची मेट्रो, अनेक मिम्सचा, विनोदाचा आणि प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेली पुण्याची मेट्रो ६ मार्चच्या दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं . त्यांच्या हस्ते वनाज ते गरवारे हे पाच किलोमीटरचं अंतर आणि पिंपरी ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या अंतराच्या मेट्रोचा नारळ फुटला. त्यामुळं या मार्गांवर का होईना पण लोकं माना वर करुन मेट्रोकडं बघत बघत जात आहेत. 

आता हा झाला वर्तमानकाळ, पण पुण्यात मेट्रो सुरू होणं ही काय सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळं जरा मेट्रोच्या चर्चा सुरू होण्यापासून थेट मेट्रो सुरू करण्यापर्यंतचा प्रवास बघुयात.

तर साल होतं २००६-०७. पुण्यात मेट्रो सुरु होणार अशी चर्चा राजकीय कट्ट्यावर, पक्ष कार्यालयात सुरु झाली होती. मुंबईप्रमाणं पुण्यातही मेट्रो असायला हवी असा सूर राजकीय नेत्यांमध्ये होता. दुसरीकडे मात्र महागडी मेट्रो पुण्याला परडवणारी नाही असं संगितलं जाऊ लागलं. पुणेकर मात्र स्वप्नात रंगलेले, ”कोथरूडमधून डेक्कन फक्त १० मिनिटांत, अरे व्वा!” पण या १० मिनिटांच्या प्रवासाला १० वर्षांपेक्षा जास्त वाट पाहावी लागली.

पुण्यातल्या मेट्रोला उशीर होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मेट्रो भुयारी की एलिव्हेटेड? असा वाद रंगला होता. पहिली काही वर्ष या चर्चेतच गेली. त्याचवेळी पुण्याचे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी ‘पुणे मेट्रो’बाबत पुढाकार घेतला. २००९ मध्ये मेट्रोचा डिपीआर म्हणजेच डिटेल रिपोर्ट तयार करण्यात आला. 

दिल्ली मेट्रोचे जनक मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी स्वतः हा अहवाल पुणे महापालिकेत सादर केला होता.

२०१२ च्या महापालिका निवणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यातली मेट्रो भुयारी असायला हवी असा पवित्रा घेतला होता. मात्र हे काम खूप खर्चिक होईल असं सांगितलं जाऊ लागलं आणि प्रकल्पाला उशीर होत गेला. त्यानंतर २०१४ मध्ये मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुढं राज्यात आघाडीचं सरकार जाऊन युतीचं सरकार आलं. पण भुयारी की एलिव्हेटेड? हा वाद सुरूच होता. एलिव्हेटेड म्हणजे मोठे बीम टाकून त्यावरून धावणारी मेट्रो. 

अनेक वादंगानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांना मान्यता दिली.

२००६ मध्ये सुरु असलेल्या चर्चांना तब्बल १० वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये पूर्णविराम मिळाला आणि प्रत्यक्ष मेट्रोचं काम सुरू झालं.

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गांचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी असं सांगण्यात आलं होतं की, पुणे मेट्रो डिसेंबर २०२० मध्ये सुरु होईल. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळं अनेक गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळं पुणे मेट्रोला थोडा उशीर झाल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे.

आता पुण्यातल्या कुठल्याही मुख्यमार्गावर गेल्यावर तुम्हाला दिसेल की कसा बदल झाला आहे. २०१९ मध्ये मेट्रोचे डबे रुळावर चढवण्यात आले. तेव्हापासून अनेक टेस्टही झाल्या. शिवाजीनगर न्यायालयाजवळच्या भूमिगत स्थानकाममध्ये पुणे मेट्रोचे मार्ग एकत्र येणार आहेत.

मागच्या वर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयडीयल कॉलनी इथं मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘पुण्याचा विकासाचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. तसंच मेट्रोबाबत पुणेकरांनी संयम दाखवल्याबद्दल धन्यवाद.’

पुणे मेट्रो ही मुंबई, नागपूर पाठोपाठ राज्यातली तिसरी मेट्रो ठरणार आहे. केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत मेट्रो मार्गाच्या चाचणीपर्यंतचा टप्पा गाठणारी पुणे मेट्रो ही पहिली मेट्रो ठरली आहे. मेट्रोसाठी वजनानं हलके आणि सुरक्षित अल्युमिनियम कोचेस वापरणारं पुणे देशातलं पहिलं शहर ठरणार आहे.

मेट्रो उभे करणारे हात-

सर्व मेट्रो प्रकल्पांच्या सोप्या आणि विनाअडथळा अंलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या ५०:५० अशा संयुक्त मालकीची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली. त्या माध्यमातून पुणे मेट्रो धावणार आहे. नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) चं पुनर्निर्माण करून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) या नावानं नवी कंपनी तयार करण्यात आली आहे.

पुण्यात ट्रॅफिक असतं, हे आपण लय वेळा आणि लय जणांकडून ऐकतो. आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्यात पुणेकरांचा दिवसाला शंभर मिनिटं वेळ वाया जातो. पुणे मेट्रोनं दावा केला आहे की, मेट्रोमुळे पुणेकरांचा ७५ टक्के प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळं मेट्रो सुरु होणं पुणेकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे.

आकड्यांचा विषय निघालाच आहे, तर पटकन एक नजर मारुन घ्या…

पुणे मेट्रोचे एकूण तीन मार्ग असणार आहेत. त्यातले २ मार्ग महामेट्रो, तर १ मार्ग पीएमआरडीए तयार करणार आहे. पहिला मार्ग असेल पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. त्याची लांबी १६.५ किलोमीटर असेल आणि मार्गावर ५ भूमिगत तर ९ एलिव्हेटेड थांबे असतील.

दुसरा मार्ग असेल वनाज ते रामवाडी. त्याची लांबी १४.६ किलोमीटर असेल आणि या मार्गावरचे सर्व १४ थांबे हे एलिव्हेटेड असतील.

तिसरा मार्ग असेल पीएमआरडीए द्वारे तयार करण्यात येणारा शिवाजीनगर ते हिंजवडी. त्याची लांबी २३.३ किलोमीटर असेल आणि त्यावर २३ थांबे असतील. राज्य सरकारनं हा ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित केला असून हा प्रकल्प टाटा-सिमेन्स कंपनीच्या वतीनं करण्यात येत आहे.

बांधकाम कसं झालं-

पुणे मेट्रोच्या दोन मार्गांच्या बांधकामासाठी तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. यात पिंपरी ते रेंज हिल्स (रिच 1), वनाज ते सिव्हील कोर्ट (रिच 2), रामवाडी ते सिव्हील कोर्ट (रिच 3) हे तीन भाग करण्यात आले आहेत. वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या मार्गावर ३११ पैकी २८२ खांब बांधून झाले आहेत. या मार्गावर आवश्यक २९६ पैकी १७२ स्पॅनचं काम झालं आहे. तसंच रामवाडी ते सिव्हील कोर्ट या मार्गावर ३१९ पैकी २४२ खांब बांधून उभे आहेत. मात्र २९६ स्पॅनपैकी फक्त ९३ स्पॅन या मार्गावर बांधण्यात आले आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही विषय खोल-

कोरोना आणि लॉकडाऊनच्या प्रतिकूल काळातही पुणे मेट्रोच्या कामात सातत्य बघायला मिळालं आहे. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या मार्गांवरच्या चाचण्यांचं काम सुरू झाल्यापासून ५० महिन्यांत पूर्ण झालं. पुण्यात पुढच्या ५० वर्षांसाठी उपयुक्त ठरतील अशा मेट्रो मार्गांचं नियोजन असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ‘महामेट्रो’च्या अंदाजानुसार २०३१ पर्यंत रोज १० लाख पुणेकर मेट्रोनं प्रवास करतील.

लक्ष्य डिसेंबर २०२२

याआधी मेट्रोचा ३१ किलोमीटरचा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण करण्याचं ध्येय होतं. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळं या कामाला विलंब झाला होता. सध्याच्या नियोजनानुसार हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२२मध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट आम्ही ठेवल्याचं महामेट्रोच्या वतीनं सांगण्यात आलंय.

आता एवढी सगळी माहिती आमच्या आजीला सांगितली, तर ती म्हणाली हा पण यासाठी पैसे किती जाणार? प्रश्न महत्त्वाचा आहे… तर मेट्रो प्रवासासाठी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त ५० रुपये तिकीट निश्चित करण्यात आलंय. प्रवाशांवर तिकिटाचा भार टाकण्यापेक्षा, जहिराती व इतर उत्पन्नाचे स्रोत वापरण्याचं महामेट्रोनं ठरवलंय आणि गर्दीचं म्हणाल, तर १४५ प्रवासी बसून प्रवास करतील, तर ९७५ प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येईल.

तर आता आमची आजी मेट्रोतून प्रवास करुन आली, की तिचा अनुभव आम्ही तुम्हाला फिक्स सांगणार, तोवर तुम्ही मेट्रोतून जाऊन आलात, तर तुमचा अनुभव तेवढा सांगायला विसरू नका…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.