अडवाणींना वय झालं म्हणून रिटायर करणाऱ्या भाजपने मेट्रो मॅनसाठी नियम का बदलला?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीये. निवडणूक आयोगान दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत  एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. केरळमध्ये सर्वच्या सर्व  १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान पार पडणार असून केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी  संपणार आहे.

निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येवून ठेपल्यामुळ केरळात  राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतय.  प्रचाराच्या तोफा तापताना दिसतायत. राहुल गांधी केरळात तळ ठोकून बसलेत. अशातच भाजपच्या खेळीने केरळच्या राजकारणाला वेगळ वळण आलंय.

भाजपने केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार राजकारणाच्या बाहेरचा माणूस निवडलाय.  विशेष म्हणजे हा उमेदवार अवघ्या एक आठवड्यापूर्वी भाजपवासी झालेला आहे. त्याच नाव म्हणजे, मेट्रो मॅन ई. श्रीधरन 

आजच केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी जाहीर केलं की,

केरळात भाजपची सत्ता आल्यास ‘मेट्रो मॅन’ मुख्यमंत्री असणार असतील.

‘मेट्रो मॅन’ म्हणजे अर्थातच एलात्तुवलपिल श्रीधरन. कोकण रेल्वेचे निर्माते, भारतातील पहिल्या कलकत्ता मेट्रो पासून ते दिल्ली मेट्रो पर्यंत अनेक आव्हानात्मक प्रोजेक्टला आकार देणारे विश्वकर्मा म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे हे इ.श्रीधरन. त्यांच्या बद्दल संपूर्ण देशात आदरच आणि अभिमान आहे. मात्र भाजपने आज त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली आणि वादाला सुरवात झाली.

तुम्ही म्हणाल हा एवढा मोठा माणूस त्याच्या नावाला विरोध का होत असेल?  

पण भिडूंनो विषय येतो वयाचा. ई. श्रीधरन यांचं वय ८८ वर्षे इतकं आहे आणि  ७५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेत्यांना घरी बसवणाऱ्या भाजपनेत्यांना थेट मुख्यमंत्री पदाची उमेदवारी  दिली तर गोंधळ होणारच.

मोदी आणि अमित शहा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची धुरा आपल्या हातात घेतली तेव्हा त्यांनी एक नियम केला कि  ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही. मोदीजी म्हणजे नियमाला पक्के. त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला या मोठ्या नेत्यांना आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर मंत्रीपदाचा त्याग करावा लागला होता.

हे तर सोडा २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना देखील त्यांनी वयाची पंच्चाहत्तरी पूर्ण झालीय म्हणून सक्तीने निवृत्ती पत्करायला लावली होती.

लालकृष्ण अडवाणी म्हणजे एकेकाळचे मोदींचे गुरु, प्रत्येक संकटात साथ देणारे मात्र त्यांच्या वृद्धपकाळात मोदींनी तरुण रक्ताला वाव मिळावा म्हणून त्यांना राजकीय पदापासून वंचित ठेवलं.

भारतात भाजप रुजवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या  लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या नेत्यांना वेगळे नियम आणि काल परवा भाजपात आलेल्या ई. श्रीधरन यांना वेगळा न्याय असं कशासाठी, हा प्रश्न स्वतः भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील पडला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आडवाणी, जोशींना जे निकष लावून उमेदवारी नाकारली तेच निकष ई. श्रीधरन यांना लागू नाहीत का सवाल उपस्थित झाला.

असं काय आहे श्रीधरन यांच्यामध्ये कि मोदीजींनी त्यांच्यासाठी आपला नियम बदलून टाकला?

आज संपूर्ण देशात भाजपचा डंका वाजतोय. उत्तरप्रदेश पासून ते आसाम मेघालय पर्यंत प्रत्येक राज्यात साम दाम दंड भेद वापरत भाजप अगदी तळागाळात घुसली आहे. ज्या राज्यात त्यांची पक्षसंघटना औषधाला नव्हती तेथे अमित शहांच्या आक्रमक नियोजनामुळे ते जाऊन पोहचले.

इतकं सगळं असूनही त्यांना एका राज्याने विशेषतः छळले आहे. ते राज्य म्हणजे केरळ.

भारतातील सर्वात साक्षर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये फक्त दोनच पक्षांची चलती आहे ते म्हणजे काँग्रेस आणि डावे. दोघांकडे आलटून पालटून सत्ता असते. हिंदुत्ववादी विचार या राज्यात घुसू शकलेले नाहीत. भाजपने अनेक प्रयत्न केले पण त्यांना या राज्यात अगदी १ आमदाराच्या वर कामगिरी करता आलेली नाही.

भाजपचा केरळ मध्ये प्रभाव नाही म्हणूनच राहुल गांधी मागच्या लोकसभा निवडणुकीत इथल्या मतदारसंघातून उभे राहिले आणि विक्रमी मतांनी निवडून देखील आले.

हा डाव्यांचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला पाडायचं भाजपच्या मनात आहे आणि यासाठी मेट्रो मॅन श्रीधरन यांच्याशिवाय चांगला ऑप्शन देखील त्यांच्याकडे नाही. 

ई. श्रीधरन मूळचे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातले.त्यांनी इंजिनियरिंगचा शिक्षण  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पालघाट येथे पूर्ण केल. तिथे त्यांनी व्याख्याता म्हणून काही काळ काम केल होत.

पुढ ई. श्रीधरन यांनी इंजिनियरिंग एक्झामची परीक्षा पास केली आणि भारतीय रेल्वेत नोकरी सुरु केली. त्याचं पाहिलं काम १९५४ साली दक्षिण रेल्वेत प्रशिक्षणार्थी सहायक अभियंता म्हणून होत.  त्यानंतर त्यांनी भारतीय रेल्वेत मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्डात सदस्य, कोकण रेल्वे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक व दिल्ली मेट्रोच संचालक अशी पद भूषविली. ई. श्रीधरन यांनी दिल्ली मट्रो रेल्वे प्रकल्प असंख्य अडचणींना तोंड देत साकार केलाय.

८८ वर्षांचे इंजिनिअर ई. श्रीधरन यांचा चेहरा भारतात सर्वत्र परिचित आहे. त्यांच्यामुळ भारतात  दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र बदल आणण शक्य झाल. कोकण रेल्वेची यशस्वी बांधणी केल्यानंतर ई. श्रीधरन याचं नाव सर्व देशभरात गाजलं. अगदी दोन वर्षांपूर्वी पर्यंत ते भारतातल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रोजक्टमध्ये कार्यरत होते.

त्यांनी आजवर उभारलेले प्रोजेक्ट अत्यंत कमी खर्चात व विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहेत. त्यांच्यावर पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यांची स्वच्छ प्रतिमा देशभरात फेमस आहेच पण शिवाय केरळचा ते अभिमान आहेत. त्यांच्याबद्दल तिथल्या नागरिकांमध्ये प्रेम आणि आदराची भावना आहे.

ई.श्रीधरन कधी चुकीचं करणार नाहीत असा विश्वास त्यांच्याबद्दल मल्याळी सर्वसामान्य माणसामध्ये दिसून यायचा.

त्यांच्या या लोकप्रियतेला आकर्षित करून घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न झाले होते. असं म्हणतात की २०१७ साली त्यांना देशाचा राष्ट्रपती करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. पण श्रीधरन यांनी तेव्हा नकार दिला होता. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते,

‘कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही आणि  जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन.’

मात्र, काही दिवसांपूर्वीच ई. श्रीधरन केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास केरळचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा बोलवून दाखवली होती.

आता खुद्द मेट्रो मॅन पलटी मारतोय म्हटल्यावर भाजपने देखील आपले नियम वाकवले. त्यांची विकसनशील प्रतिमा, केरळच्या लोकांची त्यांच्या प्रति असणारी आपलेपणाची भावना लक्षात घेता आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो. म्हणूनच अमित शहा यांनी आडवाणी, जोशी तसेच इतर दिग्गज नेत्यांना लावलेले निकष  ई. श्रीधरन यांना लागू न लावता थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली.

आता निकाल काय लागेल, ई श्रीधरन यांच्या नावाचा भाजपला फायदा होतो कि नाही, ते मुख्यमंत्री होतात की नाही हे काळचं आणि केरळची जनताच ठरवेल. पण तो पर्यंत अडवाणीजींवरील अन्यायाची चर्चा तर होणारच.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.