राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या ३ वर्षातच त्यांनी जिल्हा रुग्णालयांची साखळी उभारली..
ही गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या आरोग्यमंत्र्याची अर्थात दादासाहेबांची…
विचार करा आणि डोळ्यांसमोर फक्त चित्र आणा.
महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचं पदावर असताना निधन होतं. निधनानंतर एक महिना होतो आणि काही पत्रकारांना त्यांच्या पत्नी एका बस स्टॅण्डवर बसच्या तिकीटासाठी रांगते उभारलेल्या दिसतात. हे पत्रकार तिथे जातात. आजचा जमाना असता तर या गोष्टींची पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूज केली असती. पण त्या पत्रकारांनी अगदी हट्टाने माजी मुख्यमंत्री बाईंना बसच तिकीट काढून बसमध्ये बसवलं.
त्यांच्या पत्नी जितक्या साध्या होत्या, तितकेच ते देखील साधे होते. पण साधं असणं हे त्यांच भांडवल किंवा PR करणारी गोष्ट नव्हती. त्यांच “काम” ही खरी त्यांची कमाई होती. त्यांच नाव होत मारोतराव कन्नमवार
कधीकाळी वर्तमानपत्र विकणारा पोरगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांच नाव घेण्यात येत ते मारोतराव कन्नमवार अर्थात दादासाहेब हे राज्याचे पहिले आरोग्यमंत्री देखील होते.
१९४१-४२ च्या काळात ते नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. त्यानंतरच्या काळात ते कॉंग्रेसच्या तिकीटावर घटना समितीवर निवडून गेले. १९५२ सालच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूकीत ते मध्यप्रांत व वऱ्हाडच्या विधीमंडळात निवडून गेले आणि आरोग्यमंत्री झाले.
पुढे जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मारोतराव कन्नमवार राज्याचे पहिले आरोग्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि दळणवळण मंत्री म्हणून कारभार पाहू लागले.
मारोतराव कन्नमवार कघीकाळी वर्तमानपत्र टाकणाऱ्या पोराचं काम करायचे. कॉंग्रेस कमिटीत काम करून तिथल्याच बाकड्यांवर झोपी जायचे. अगदी दारिद्र्यातून आलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.
साहजिक त्यांची राहणी देखील साधी असायची. स्वच्छ इस्त्रीचे कपडे, पांढरीशुभ्र खादी असा प्रकार त्यांच्या गावी देखील नव्हता. त्यामुळे व्हायचं अस की गरिबांचा नेता म्हणून त्यांची प्रशासकिय वर्गात इच्छेत टिंगळटवाळी व्हायची.
कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसणारा माणूस मध्यप्रांत व पुढे महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री होतो म्हणून शिकल्या सवरल्यांकडून त्यांची पात्रता काढण्यात येत असे. त्यांच्या नावाने तेव्हा एक अफवा देखील पसरवण्यात आली होती. कुठल्यातरी मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णाचे उपचाराचे रिपोर्ट हातात घेऊन मारोतराव त्याला पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणाले अशी ती अफवा.
मात्र मारोतराव कन्नमवार फक्त दिसायलाच साधे होते. प्रत्यक्षात ते उत्तम इंग्रजी बोलायचे. इंग्रजीत भाषण द्यायचे. पदवीधारक विद्वान त्यांच्या पाठीमागे त्यांच्या नावाने विनोद करत असत.
मात्र हा माणूस १९५२ ते १९६२ या काळात आरोग्यखात्यांचा कारभार पहात सुधारणा करत राहिला.
१९६२ सालात यशवंतराव चव्हाण दिल्लीस संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि राज्याची जबाबदारी मारोतराव कन्नमवार यांच्याकडे देण्यात आली.
राज्यांचे मुख्यमंत्रीपद हाती येताच त्यांनी आरोग्य खात्याची चौकट अधिक घट्ट करण्यास सुरवात केली. आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख रुग्णालय असणं गरजेचं आहे. त्यातूनच जिल्हा रुग्णालयाची संकल्पना पुढे आली. त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय बांधून ते कार्यरत देखील झाले.
त्याचप्रमाणे जिल्हा सर्जन ही जी पोस्ट आहे त्याची निर्मीती करण्याचं श्रेय देखील कन्नमवार यांनी देण्यात येतं. कन्नमवार मुख्यमंत्रीपदावर असतानाच त्यांनी जिल्हा सर्जन ही पोस्ट सुरू केली.
पोस्टमार्टम वरुन जोक्स पेरणारे उच्चभ्रू प्रशासकीय अधिकारी कालांतराने त्यांची कामे पाहून अवाक् होऊ लागले. दूर्देवाने मुख्यमंत्रीपदाचा कारभार त्यांना खूप कमी पहाता आला. नोव्हेंबर १९६३ सालीच मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांचे निधन झाले. इतक्या कमी काळात देखील त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची घडी घातली.
निश्चितच आज राज्यातल्या सरकारी दवाखान्यांची अवस्था गंभीर आहे, पण अवस्था गंभीर असायला त्या जागेवर रुग्णालय असणं देखील गरजेचं होतं. दादासाहेबांनी त्यांच्या वाटणीचं काम चोखपणे केलं.
दादासाहेबांनी त्यांच्या काळात राज्यभरात जिल्हा रुग्णालयांची साखळी निर्माण केली. दूर्देवांने नंतरच्या राजकारण्यांना त्यात भरीव काही करता आलं नाही म्हणून दादासाहेबांच्या कार्याकडे डोळेझाक करून थोडेच चालणार आहे.
हे ही वाच भिडू
- एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.
- खाजगीत दिलेल्या शब्दाला शास्त्रीजी जागले आणि तडकाफडकी त्यांनाच मुख्यमंत्री केलं..
- मलबार हिलच्या बंगल्याला नकार देऊन छोट्या घरात राहणारा एक मंत्री महाराष्ट्रात होऊन गेला.