मंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याच काम एका मुस्लीम मुख्यमंत्र्याने केलं. 

मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले. धर्माने ते मुस्लीम होते. लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. राजकारणात कटकारस्थान करायचे पण ते राजकारणात टिकूनच राहिले नाहीत तर आपल्या मनगटाच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून दाखवलं. 

तुमच्या लक्षात आलच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय, 

बॅरिस्टर ए.आर. अंतुले. 

१९६२ ते ८० च्या काळात श्रीवर्धन मतदारसंघातून सातत्याने ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राज्यसभेचे खासदार, ८९ आणि ९१ च्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार. आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस असा दिर्घ राजकीय ग्राफ असणारे नेते म्हणजे अंतुले. 

अंतुलेचा उल्लेख करत असताना दोन गोष्टी चटकन सांगितल्या जातात. एकतर त्यांनी कथित सिमेंट घोटाळा आणि दूसरी गोष्ट कर्जमाफी करणारा देशातला पहिला नेता.

पैकी सिमेंट घोटाळा काय होता हे बोलभिडूने आपल्यासमोर यापुर्वीच मांडलेलं आहे. कर्जमाफीच सांगायचं झालं तर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांना बॅंकेच कर्ज फेडणं अशक्य आहे अशा शेतकऱ्यांचे एकूण ५० कोटींच कर्ज एका फटक्यात माफ करुन टाकले होते.

यावर रिझर्व बॅंकेकडून त्यांना विचारणा झाली. रिझर्वं बॅंकेमार्फत त्यांना विचारण्यात आलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे तुम्ही कोण. तेव्हा या मुख्यमंत्र्याने उत्तर दिलं, हे विचारणारे तुम्ही कोण? तुम्हाला पैसै मिळाल्याशी मतलब. शेतकऱ्यांनी तुम्हाला पैसै दिले का सरकारने दिले हा तुमचा संबंध नाही. एका फटक्यात सडेतोड निर्णय घेण्यासाठी अंतुले फेमस होते. 

त्यांचा असाच एक निर्णय म्हणजे फलोत्पादन खात्याचा. आज तुम्हाला सांगितल्यावर पटणार आहे का की एक टेबल एवढच या खात्याचं स्वरुप होतं?

कोकणातल्या असणाऱ्या अंतुलेना फळांची खरी किंमत कळाली. कृषी खात्यात असणारा एक टेबल म्हणजे फलोत्पादन हा संदर्भ त्यांनी एका रात्रीत बदलला आणि तातडीने निर्णय घेवून त्यांनी एका रात्रीत फलोत्पादन खात सुरू केलं. 

अंतुलेचे एकाहून एक सरस किस्से आजही चर्चेला येतात. फक्त १८ महिन्याच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी जे करून दाखवलं ते आजही एखाद्या नेत्याला करणं अशक्य वाटतं. अंतुले हूशार होते. ते लंडनमधून वकिलीचं शिक्षण घेवून आले होते. तिथे देखील त्यांनी चळवळ उभा केली होती. याच हूशारीचा पुढे महाराष्ट्राला फायदा झाला. 

बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न अजेंड्यावरच होता. महाजन आयोगाने यासंबधित केंद्राकडे अहवाल सादर केला. राज्यांची पुर्नरचना करताना भाषेच्या आधारावर करण्यात आली होती. मात्र पुर्वीपासून मराठी भाषिकांवर अन्यायच झाला होता. महाजन आयोग योग्य निष्कर्ष काढेल अस वाटत असताना, महाजन आयोगाने नेमका विरोधी सुर आवळला. तेव्हा फक्त आमदार असलेल्या अंतुलेंनी महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड पुस्तक लिहून या आयोगाच्या चिंधड्या उडवल्या होत्या.

त्यांनीच महाजन आयोग कसा पक्षपाती आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं म्हणून महाजन आयोग लागू करण्याच धाडस कर्नाटक करू शकलं नाही. जि गोष्ट महाजन आयोगाची तिच गोष्ट अपाईंटमेंट ऑफ चिफ जस्टिस. हे पुस्तक कोणाला प्रतिउत्तर म्हणून लिहण्यात आलं होतं तुम्हाला माहित आहे का? हे पुस्तक खुद्द नाना पालखीवाला या कायदेतज्ञाला दिलेलं सडेतोड उत्तर होतं. या पुस्तकामुळे अंतुले यांच्या अभ्यासावर शिकामोर्तबच झालं होतं. 

कर्जमाफीसारखाच त्यांचा दूसरा एक छोटासा निर्णय इथे सांगण्यासारखा आहे. तो म्हणजे मंत्र्यांच्या ड्रायव्हरांना कायमस्वरूपी नोकरीत घेणे.

यापुर्वी मंत्रीपद मिळालं की शासकिय गाडी मिळायची. त्या गाडीवर ड्रायव्हर हे मंत्र्याच्या मतानुसार खाजगी ड्रायव्हर असायचे. अंतुलेंनी काय केलं तर त्यांना शासकीय सेवेत घेतलं. कुठलाही मंत्री वाटेल त्याला काढून वाट्टेल त्याला घेवून शकत नव्हता. सरकारी गाडीसोबत सरकारी ड्रायव्हर झाला. ड्रायव्हर लोकांना सरकारी निवासाची देखील सोय केली. आज मंत्री कोणताही असो, कोणत्याही पक्षाचा असो, पण त्यांचा ड्रायव्हर मात्र अंतुले साहेबांच्या या उपकाराची नक्कीच जाणीव ठेवतो. 

अन् आत्ता तो महत्वाचा निर्णय.

अंतुले मुस्लीम होते. महाराष्ट्राचे पहिले आणि आजतागायतचे एकमेव मुस्लीम मुख्यमंत्री. त्यानंतर महाराष्ट्रात अंतुलेंच्या तोडीस तोड अस मुस्लीम समजातून नेतृत्व निर्माण होवू शकलं नाही. कुलाबा जिल्ह्याच नामकरण रायगड करण्याच काम देखील त्यांनीच केलं. छत्रपती शिवरायांचीभ भवानी तलवार ब्रिटनला जावून आणण्यासाठी त्यांनी व्यापक जनआंदोलन उभा केलं. तलवारीचा खरा इतिहास सापडला नाही पण भवानी तलवारीची अस्मिता तरुणांमध्ये त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण होवू शकली. त्याच पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवरायांचे मंत्रालयात चित्र लावले. केंद्रात सुरू करण्यात आलेली पोलीओ डोस ची संकल्पना अंतुलेनी केंद्रीय आरोग्यमंत्री असताना सुरू केली होती. असे हे अंतुले. बॅरिस्टर ए.आर. अंतुले. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.