सुरक्षायंत्रणेला गंडवून एक म्हातारा थेट मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममध्ये घुसला होता. 

विचार करा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही शासकिय निवासस्थानी आहात. सकाळी लवकर उठता. दिवसभर करायची कामे आणि भाषण वाचून घेत असता. अचानक तुमच्यासमोर कोणीतरी उभा असल्याचा भास होतो. तुम्ही समोर पाहता तर एक म्हातारा तुमच्याकडे बघत असतो. 

भूत भूत म्हणून ओरडायचं बाकी असतं. 

कारण साधासुधा माणूस सुरक्षा यंत्रणेला असा गुंगारा देवून आतमध्ये येणं शक्य नसतं. मुख्यमंत्री प्रसंगावधान दाखवतात आणि विचारतात तुम्ही कोण काय काम काढलत..? 

तेव्हा हा म्हातारा माणूस काय म्हणतो, 

काही नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा दिसतो ते बघायला आलेलो. 

हा असला भन्नाट किस्सा. किस्सा घडलेला नागपूरमध्ये आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. 

१९९५ साली राज्यात भाजप सेना युतीच राज्य आलं. सेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सोपवली. नव्याने झालेल्या मुख्यमंत्र्याकडे पूर्वीच्या मुख्यमंत्र्यापेक्षा तुलनेत कमी गर्दी असायची. भेटायला येणाऱ्या लोकांच्यात देखील ९० टक्के शासकीय अधिकारीच असायचे. 

घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर मुक्कामाला होते.

बंगल्याच्या गेटवरच पोलीसांची ड्युटी असायची. तिथेच भेटायला येणाऱ्या लोकांची नोंद केली जायची. चौकशी व्हायची आणि मगच आत सोडले जायचे. आत गेल्यानंतर मुख्य बंगल्यातच डावीकडच्या बाजूस सचिवालय होते. तिथे जुजबी चौकशी व्हायची. त्यानंतर व्हरांडा झाला की मुख्यमंत्र्याच्या हॉलमध्ये प्रवेश दिला जायचा. हॉलच्या शेजारीच मिटींग रुम असायची तिथे अधिकृत बैठका व्हायच्या. तिथून एक मोठ्ठा दरवाजा होता व नंतर पॅसेज. पॅसेज झाला की मुख्यमंत्र्याच्या बेडरुम्स आणि अॅटिचेम्बर होतं. त्यापैकी सर्वात डावीकडच्या कौपऱ्यातील बेडरूम्स ही मुख्यमंत्र्यासाठी असायची तर इतर बेडरुम्स त्यांच्या नातेवाईकांसाठी असायच्या. 

हॉल सोडला तर इतर ठिकाणी बंगल्यातील कर्मचारी व अतिविशिष्ट अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नसे. 

मुख्यमंत्री तेव्हा दौऱ्यानिमित्ताने नागपूरच्या रामगिरीवर मुक्कामास होते. दूसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या दरम्यान सैनिक स्कूल येथे त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. 

मनोहर जोशी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लवकर उठले. आवरून भाषणाची तयारी करत वर्तमानपत्राची वाट पाहत आपल्या बेडरूममध्ये बसून होते. सकाळचे साडेसहा वाजले असतील. मुख्यमंत्री खाली मान घालून कागदपत्र वाचत असतानाच समोर कोणीतरी उभा असल्याचा भास त्यांना झाला. समोर पाहिलं तर खरोखरच एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या समोर उभा होते.. 

हा कोण, आत्ता काय करावे !!

मुख्यमंत्र्यांनी इतकेतिकडे पाहिलं तर सुरक्षेसाठी असणारे शिपाई देखील जवळपास नव्हते. त्या वृद्ध गृहस्थाकडे  पाहून मुख्यमंत्री गांगरले होते. आत्ता काय करावे म्हणून आपण कोण व कशासाठी आला विचारून परस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा दिसतो ते बघायला आलो. 

पुढच्या संवादात मुख्यमंत्र्यांना समजलं की ते निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत व लक्ष्मीनगरमध्ये राहतात. त्यांच्याकडून आपणाला कोणताच धोका नाही हे लक्षात आल्यानंतर मनोहर जोशींनी उठून बेल दाबली. कर्मचाऱ्याकडून चहा मागितला. व्यवस्थित निरोप देण्यात आला. त्या गृहस्थाला मुख्यमंत्र्यांचे फक्त दर्शनच झाले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरचा चहा त्यांच्यासोबत थेट बेडरुममध्येच घेता आला. 

हा किस्सा प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या डायरी या पुस्तकात सांगितला आहे.   

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.