महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.

एका बाजूस कर्नाटक तर दूसऱ्या बाजूस महाराष्ट्र. डोंगराच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक गाव. या गावाचा इतिहास काय तर महिपाळगडाचा. हो तोच महिपाळगड जो स्वराज्यातील एक दुर्गम गड म्हणून ओळखला जातो. स्वराज्याबरोबरच या गडाची आणि पर्यायाने तिथे असणाऱ्या महिपाळगड गावाची एक कथा आहे ती कथा म्हणजे हे गाव सातबाऱ्यावर नाही. गावातल्या कोणाकडेच स्वत:ची कागदपत्र नाहीत की जमीनीचे उतारे नाहीत. 

 

पुर्वेला कर्नाटक, दक्षिणेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मालकी तर उर्वरीत भागावर वनविभागाने व्यापलेली जमिन अस एकंदरित या गावाचं स्वरुप. गावची लोकसंख्या दिड हजारांच्या घरात.  गावातले तरुण नोकरीसाठी पुण्या मुंबईत स्थायिक झालेले तर काही तरुण सैन्यात जावून देशसेवा करणारे.  गावात ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा कारभार देखील चालतो मात्र या गावातल्या कोणाकडेच आपलं घर आणि शेत दाखवणारा सातबारा नाही. 

 

थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार दप्तरी दिड हजार लोकवस्तीचं हे गाव अस्तित्वातच नाही. 

 

सरकार दरबारी फक्त किल्ला – 

महिपाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला फक्त इतकीच नोंद या जागेची करण्यात आलेली आहे. महिपाळगड गावाची तिथल्या शेतजमीनींची, घरांची कोणतीच नोंद नाही. हा भाग महाराष्ट्रात येतो. राज्याच्या राजधानीपासून कोसो दूर असणाऱ्या हा भाग दूर्गम आहे. गडाचा विस्तार सुमारे २०० हेक्टरवर पसरलेला आहे. गडाचं नाव देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे दूसऱ्या बाजूला शासनाने सातबारा ऑनलाईन देण्याची सोय केली आहे मात्र तरिही संपुर्ण गावच सातबाऱ्याच्या नकाशावरुन गायब असल्याने गावकऱ्यांनी आत्ता सातबाऱ्याचा लढा तिव्र केला आहे.