कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी ७० वर्षांपूर्वी कोळशाच्या गॅसवर गाडी पळवून दाखवलेली

बाबा आदमच्या काळात पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की लोक गाड्या घेऊन पंपावर पळायचे… 

कशाला तर टाक्या फुल्ल करायला. आता बाबा आदम म्हणजे लै जुना काळ नाही तर अलीकडचाच म्हणजे साधारण १५ वर्षांमागे..

तर त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली की दुसर्‍याच दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर दर वाढल्याच्या मोठ्या मोठ्या हेडिंग असायच्या. किंमत वाढल्याची बातमी समजताच लोक नवीन दर लागू नये म्हणून गाडीचा टँक भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करायचे .

पण आता असं काही दिसत नाही. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ ही बातमीच नाही. ते कसाय ना, रोज रोज नवे दर येणार मग कोण छापणार आणि कोण पळणार त्या पम्पाकडं..

ते म्हणतात ना रोजच मडं, त्याला कोण रडं. तसंच झालंय काहीस तेलाच्या बाबतीत. 

यावर तोडगा म्ह्णून केंद्र सरकारनं कोळशाच्या गॅसिफिकेशन वर गाड्या चालवायचं नियोजन केलंय. तशी तर ही गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी फार जूनी आहे. म्हणजे पार १८०० च्या काळात याची सुरुवात झाली.

आणि कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी वापर करून गाड्या पळवून दाखवल्या. 

तर रांगड्या कोल्हापूरची ओळख कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, अंबाबाईच मंदिर, रंकाळा तलाव, ऊस साखर गुळापर्यंत मर्यादित नाही. राजर्षी शाहू महाराजांचा सर्वोत्कृष्टतेचा ध्यास ठेवणाऱ्या या करवीर नगरीने प्रत्येक क्षेत्रात आपल नाव गाजवलं आहे.

असच कोल्हापूरचा दबदबा असलेलं आणखी एक क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्र.

छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या प्रेरणेने विसाव्या शतकाच्या सुरवातीला कोल्हापूरने इंजिनियरिंग क्षेत्रात पाऊल टाकलं. यंत्रमहर्षि वाय. पी. पोवार, तात्या शिंदे, कै.रामभाई सामाणी इत्यादींच्या कष्टपूर्वक प्रयत्नामुळे कोल्हापूरचं नाही तर दक्षिण महाराष्ट्रात यांत्रिकिकरणाचे नवे युग सुरू झाले. उद्यम नगरीचा विशाल परिसर यंत्र सामुग्री व सुटे भाग यांच्या निर्मिती कार्यात मग्न राहिला.

अशातलेच एक होते म्हादबा मिस्त्री…

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सगळीकडेच पेट्रोलियम वस्तूंची मोठी टंचाई भासू लागली. उद्भवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कल्पक असणाऱ्या मिस्त्री महादेव नानाजी शेळके यांनी कोळसा गॅसवर मोटर चालवण्याचा विचार केला.

यासाठी त्यांनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि कठोर परिश्रमानंतर यश येऊन चारचाकी गाडी कोळसागॅस वर धावू लागली. हेच ते तंत्रज्ञान जे आज २०२१ ला भारत सरकार ट्राय करु पाहतंय.

त्या काळात कोल्हापुरात पेट्रोल टंचाईवर मात होऊन हजारो मोटारी हे इंधन वापरू लागल्या. हेच महादेव नानाजी शेळके पुढील काळात ‘म्हादबा मिस्त्री’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. सतत संशोधन करणाऱ्या म्हादबा मिस्त्री यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मोटारींच्या बॅटरीसाठी उपयुक्त असे नवीन तंत्रज्ञान सुद्धा शोधून काढले. 

असे होते हे म्हादबा मिस्त्री… एकदमच भन्नाट 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.