मराठी नाटकासाठी फिरता रंगमंच बनवला तो “कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी”…

८ ऑक्टोबर १९६२ रोजी दसऱ्याच्या दिवशी आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” हे महानाट्य रंगमंचावर आलं. आज ६६ वर्षांनी देखील ‘तो मी नव्हेच’चं गारुड रसिकांच्या मनात तसेच आहे. या नाटकाचे पन्नास वर्षाच्या काळात ३००० पेक्षा अधिक प्रयोग झाले. अनेक विक्रम या नाटकाच्या नावावर आहेत.

यात प्रभाकर पणशीकरांनी साकारलेली ‘लखोबा लोखंडे’ ही बहुरूप्याची भूमिका गाजली. एवढी गाजली की एखाद्या बेरकी आणि धूर्त माणसाला लखोबा लोखंडे नावाची उपाधी देण्यात येते. या नाटकात निपाणीचा तंबाखू व्यापारी लखोबा लोखंडेवर केस चालू असते. त्याने अनेक स्त्रियांना वेगवेगळ्या वेशात भुलवून त्यांच्याशी लग्न केल्याचा आरोप असतो. लखोबाचं अर्ग्युमेंट असतं की असा लबाड माणूस जगात असेलही पण “तो मी नव्हेच !”

कोर्टाच्या भाषेत याला ‘डिफेन्स ऑफ डिनायल’ असे म्हणतात. अडाणीपणाचं सोंग घेतलेल्या लखोबाने साक्षीदारांची घेतलेली उलटतपासणी पाहिली तर कळते कि किती टोकाचा तो चाप्टर आहे.

आचार्य अत्रेंच्या खुसखुसित शैलीतला आणि सगळ्यांना खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा, काही क्षणातच कपडे बदलून वेगळ्याच रुपात वेगळ्याच ढंगात स्टेजवर येणारे पणशीकर, भारतातला ‘पहिला फिरता रंगमंच’ हे सगळं मराठी प्रेक्षकांसाठी ‘न भूतो न भविष्यती’ असंच होत.

या फिरत्या रंगमंचाचा हा एक किस्सा प्रसिद्ध.

सुरवातीला या नाटकात रंगमंचाची व्यवस्था वेगळी होती. इतर मुख्य नाटक कोर्टात घडत असलं, तरी या नाटकातील ‘फ्लॅश-बॅक’ तंत्रासाठी एका स्टेजचे दोन भाग करून अर्धगोलाकार पडद्यांचा उपयोग करायचं ठरलं होतं.

तेव्हा या नाटकाची  निर्मिती मो.ग.रांगणेकरांनीली होती. पुढे त्यांचं आणि अत्रेंचं  व्यावसायिक कारणावरून वाद झाले. हे वाद न्यायालयापर्यंत गेले.अखेर अत्रेंनी ‘तो मी नव्हेच’ नाटक रांगणेकरांकडून काढून घेतले आणि या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी स्वतःवर घेतली. 

अत्रेंच व्यक्तिमत्वच आभाळासारखं अगडबंब होत. त्यांना ते नाटक सुद्धा तसंच प्रचंड बनवायचं होत. त्यांच्याच मनात फिरत्या रंगमंचाची कल्पना आली. आता हि साकारायची कशी? अनेक तज्ञांना बोलवण्यात आलं. रंगमंच फिरता हवा आणि तो नाटक झाल्यावर काढून पुढच्या प्रयोगाला नेता ही यावा हि अपेक्षा होती. ते ऐकून सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. असा पोर्टेबल स्टेज शक्यच नाही हे मुंबईच्या इंजिनियरनी अत्रेंना सांगितलं.

पणशीकरांनी स्वतः लहान मुलांच्या खेळण्याच्या रेल्वे रुळाचा वापर करून एक मॉडेल बनवले होते. मात्र ते प्रत्यक्षात येणे अवघड होते.

pan
फिरत्या रंगमंचाचे मॉडेल

एकदा कोल्हापूरला नाटकाचा प्रयोग सुरु होता. तेव्हा अत्रेंनी आपल्या ओळखीच्या एका मिस्त्रीला भेटायला बोलावलं. म्हादबा मिस्त्री त्यांच नाव. पणशीकरांना वाटलं की जिथं भल्या भल्या इंजिनियरनी हात टेकलेत तिथं हा साधा मिस्त्री काय करणार. पण तरी अत्रेंनी पाठवलय म्हटल्यावर त्यांना भेटण भागच होतं. पणशीकरांनी थोड्या नाखुशीतच आपलं मॉडेल मिस्त्रीना दाखवलं आणि काय हवी ते सांगितल.

पणशीकरांनी प्रा. नरेंद्र पाठक यांना दिलेल्या आणि मैत्रेय या वार्षिकांकात छापून आलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे, ते म्हणतात की,

“जेव्हा आम्ही ते मॉडेल म्हादबाला दाखवलं तेव्हा ते पाच मिनिट आमच्या मॉडेलकडे बघत राहिले आणि नंतर विचार करून त्याने  बैलगाडीचं एक चाक आमच्या पुढे जमिनीवर उलट ठेवून गोल फिरवलं आणि म्हणाला “ह्ये आसंच ना साहेब?”

आम्हाला खूप आनंद झाला. आमचं काम त्याने चुटकीसरशी सोपं केलं होतं. काय करायचं, हे त्यालाही स्पष्ट झालं होतं. आम्हाला अपेक्षित असं सारं त्याच्या बैलगाडीच्या चाकाच्या संकल्पनेवरून शक्य होणार होतं. अत्र्यांनी त्याला कामाला लावलं आणि त्यानेही ते काम आव्हान म्हणून स्वीकारलं आणि आम्हाला हवा होता तसा फिरता रंगमंच आकारास आला. 

म्हादबा मिस्त्रींकडे पुस्तकी ज्ञान जरी नसले तरी त्यांच्याकडे अनुभवाचं शहाणपण नक्कीच होतं.

दोन महिन्यात तो फिरता रंगमंच म्हादबा मिस्त्रींच्या ‘विश्वास इंजिनियरिंग वर्क्स’नी बनवला. अत्रे उद्यमनगरातल्या म्हादबा मिस्त्री यांच्या कारखान्यात गेले होते. ‘या रंगमंचाची बिदागी किती देऊ?’ असे आचार्य अत्रे यांनी त्यांना विचारले. तेव्हा म्हादबा म्हणाले, ‘अत्रेसाहेब, तुमच्याकडून बिदागी घेण्याएवढा मी नादान नाही.’ अत्रेसाहेबांचे डोळे भरून आले. म्हादबानी तो रंगमंच नाटकासाठी भेट म्हणून दिला होता. मुंबईला आल्यानंतर दुस-या दिवशी ‘यंत्रमहर्षी म्हादबा मिस्त्री’ असा नितांत सुंदर अग्रलेख वाचकांच्या भेटीला आला.  

भारतभर गाजलेल्या या रंगमंचाचं नाव ‘विश्वास रंगमंच’ असं ठेवण्यात आलं. 

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. नरहर कोरडे says

    हा रंगमंच सध्या अहमदनगर येथे आहे.
    – नरहर कोरडे,
    9423430004.

Leave A Reply

Your email address will not be published.