आणि बालेवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं श्री शिवछत्रपती स्टेडियम उभं राहीलं..

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मुख्य स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या.

मंत्र्यांना लिफ्टने जाण्याचा त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असं बोललं गेलं. इतकंच नाही, तर सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती.

या सर्व प्रकारावरून नेतेमंडळींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. विशेषतः ज्या शरद पवारांनी बालेवाडी स्टेडियम उभं केलं त्याच पवारांनी तिथल्या महागड्या ट्रॅकवरून गाडी चालवली असे म्हणत विरोधक त्यांच्यावर टीकेचे लक्ष्य करत आहेत.

काय आहे बालेवाडी स्टेडियमचा इतिहास? कशी त्याची सुरवात झाली?

गोष्ट आहे १९९४ सालची. महाराष्ट्रात नॅशनल गेम्स आयोजित केले जाणार होते. १९८५ साली राजीव गांधींनी नॅशनल गेम्सचे फॉरमॅट ऑलिम्पिक गेम्सच्या धर्तीवर बदलल्यापासून हि तिसरीच राष्ट्रीय स्पर्धा होती. तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी या क्रीडास्पर्धांचे आयोजन यशस्वी करून संपूर्ण देशभरात एक बेंचमार्क सेट करायचं ठरवलं होतं.

शरद पवारांनी ही जबाबदारी दिली होती आपल्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याकडे. त्याच नाव सुरेश शामराव कलमाडी.

एकेकाळी इंडियन एअरफोर्समध्ये गाजलेला हा लढाऊ पायलट संजय गांधींचा खंदा समर्थक म्हणून राजकारणात आला. अल्पावधीतच पुण्याच्या राजकारणात आपली छाप सोडली. १९८२ पासून त्यांना राज्यसभेत संधी मिळाली. शरद पवारांनी या चळवळ्या कार्यकर्त्याला हेरले आणि दिल्लीत आपला खास कार्यकर्ता म्हणून त्यांचा उपयोग करण्यास सुरवात केली.

१९८९ साली पुणे फेस्टिव्हल यशस्वी आयोजित करून कलमाडींनी आपले इव्हेन्ट मॅनेजमेंट स्किल दाखवून दिल होतं. काँग्रेसच्याच विठ्ठल गाडगीळ यांना हरवून पवार कलमाडी गटाने पुण्याचं कारभारीपद आपल्या खिशात टाकलं होतं. सुरेश कलमाडी यांनी ऑलिम्पिक असोशिएशनमध्ये देखील चंचुप्रवेश केला होता.

त्यांच्याच जोरावर पवारांनी राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचललं होतं.

पुण्याच्या पश्चिमेला म्हाळुंगे गावच्या पठारावर बालेवाडीत भव्य क्रीडा नगरी उभारण्याचा घाट घालण्यात आला. तब्बल या स्टेडीयमसाठी ८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पवारांनी आपल्या संपूर्ण बजेट मध्ये क्रीडाक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीच्या चौपट रक्कम बालेवाडी स्टेडियमसाठी खर्च केली होती.

२ कोटी रूपये फक्त गेम्स साठी दिले होते. पुणे महापालिकेने देखील २० कोटी रुपये रस्त्यांच्या सुधारणे साठी आणि एकूण बालेवाडीच्या डेव्हपलमेंटसाठी वेगळे बाजूला काढले होते. पुण्याचे तत्कालीन महापौर भारत सावंत म्हणाले,

“गेल्या तीस वर्षात पुण्याचा जेवढा विकास झाला नसेल तेवढा गेल्या काही महिन्यात करण्यात आला आहे.”

अतिशय वेगाने हे क्रीडासंकुल उभारण्यात आले. मुख्य स्टेडियम २० हजार प्रेक्षकांच्या आसनक्षमतेचे बनवण्यात आले होते. तिथे आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक बनवण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक फोटो फिनिश मशीन बसवण्यात आले होते. स्विमिंग पूल, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिससाठी स्पेशल कोर्ट बनवण्यात आले होते. हे फक्त तात्पुरते कोर्ट नव्हते तर तिथे वेगळे आंतरराष्ट्रीय गेम्स भरवता येतील अशी खास व्यवस्था करण्यात आली होती.

खेळाडूंच्या राहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. विक्रमी वेळेत या सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे शिवछत्रपती म्हाळुंगे बालेवाडी क्रीडासंकुल उभारण्यात आले.

१७ जानेवारी १९९४ रोजी अत्यंत रोमहर्षक समारंभात राष्ट्रीय क्रीडास्पर्धांना सुरवात करण्यात आली. मिल्खा सिंग, पिटी उषा अशा दिग्गज ऍथलिटसच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. राजू नावाचा वाघ या खेळांचा मस्कोट होता. हजारो खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. सामने पाहायला प्रचंड गर्दी झाली होती.

आजवर भारतात असे अत्याधुनिक व सुसज्ज स्टेडियम बांधले गेले नव्हते. कित्येक खेळाडू तिथल्या सुविधा पाहून भारावून गेले होते. शायनी विल्सन नावाची आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणाली,

“This time it was like an international meeting.”

तर खास अमेरिकेतून आलेला सुप्रसिद्ध धावपटू राजीव बालकृष्णन म्हणाला,

“तरुण खेळाडूंना या फॅसीलीटीमुळे नक्कीच प्रेरणा मिळेल. उज्वल भविष्यासाठी हे आश्वासक आहे.”

तर के.व्ही.शर्मा नावाचे जलतरण स्पर्धांचे तांत्रिक सल्लागार म्हणाले,

“Hats off to Sharad Pawar and Suresh Kalmadi. आजवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हि सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे.”

पण फक्त कौतुकच नाही तर पवार आणि कलमाडी याना टीका देखील सहन करावी लागली. राज्यातील त्यांचे विरोधक इतका अफाट खर्च एका स्टेडियमवर केल्याबद्दल टीका करत होते. बालेवाडी स्टेडियम हा पांढरा हत्ती आहे आणि महाराष्ट्र शासनाला तो इथून पुढे आयुष्यभर पोसावा लागणार आहे असे आरोप वर्तमानपत्रातून करण्यात आले.

पण सुरेश कलमाडी यांनी फक्त राष्ट्रीय स्पर्धा नाही तर यापुढे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा या क्रीडासंकुलात आयोजित करण्यात येणार आहेत याच आश्वासन दिल. शिवाय महाराष्ट्रातील भावी अनेक खेळाडूंना वर्ल्डक्लास स्टेडियम व त्याच्या सोयीसुविधा वापरायला मिळतील हा बेनिफिट असल्याचं त्यांनी सांगितलं.

कलमाडी म्हणाले त्याप्रमाणे त्यावर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी चमकदार झाली व मेडल्सच्या टॅली मध्ये महाराष्ट्र सर्वात एक नंबरला दिसला. समारोपाच्या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान पी,व्ही.नरसिंहराव आले होते आणि त्यांनी हे स्टेडियम पाहून शरद पवारांची पाठ थोपटली.

भारतात भविष्यात ऑलिम्पिक झालं तर ते पुण्यात घेता येईल इतकी तयारी आम्ही केली आहे असे उद्गार या प्रसंगी काढण्यात आले.

गेल्या पंचवीस तीस वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. २००८ साली झालेल्या युवा कॉमनवेल्थ गेम्स भरवण्यात देखील सुरेश कलमाडींचा पुढाकार होता.

ग्रीन गेम्स म्हणून पब्लिसिटी केलेल्या या स्पर्धांसाठी बालेवाडी स्टेडियम पुन्हा नव्या रूपात बहरलं. जगभरातून आलेल्या खेळाडूंनी त्याच कौतुक केलं. पवार कलमाडींचा पांढरा हत्ती म्हणून फेमस असलेल्या या स्टेडियमने आपली उपयुक्तता जागतिक स्तरावर सिद्ध केली. २०१० मधल्या भारताच्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी ची लिटमस टेस्ट म्हणून पुण्याकडे पाहण्यात आलं आणि त्यात कलमाडी आणि टीम पास झाली.

मात्र याच अतिआत्मविश्वासात त्यांनी दिल्ली कॉमनवेल्थच शिवधनुष्य उचललं, स्पर्धा देखील यशस्वी केली पण त्यात केलेल्या घोटाळ्यांमुळे कलमाडींना तुरुंगात जावे लागले. अगदी टिश्यू पेपर पासून ते स्टेडियमच्या बांधकामापर्यंत अनेक गोष्टीत पैसे खाल्ल्याचे आरोप करण्यात आले. कलमाडींचं राजकीय करियर संपुष्टात आणायला हा कॉमनवेल्थ घोटाळा कारणीभूत ठरला. मात्र एवढं सगळं असताना कलमाडी यांनीच उभारलेल्या बालेवाडी स्टेडियमच्या निर्माणात कधी कोणताही आरोप झाला नाही.

आजही म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात सर्वोत्कृष्ट स्टेडियमपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.