महात्मा फुले सिनेमात गाडगेबाबांनी रोल केलेला तर मुहूर्त आंबेडकरांच्या हस्ते झाला होता

महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जीवनकार्य म्हणजे धगधगतं वादळ. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार आसूड ओढला. दिनदुबळ्या शेतकरी, कामगार वर्गाची बाजू मांडली. त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारला. 

कित्येकांनी त्यांचा विरोध केला, अंगावर कचरा फेकला. जीवे मारण्यासाठी देखील प्रयत्न झाले. पण फुले दांपत्य मागे हटले नाही. त्यांचा जीवनप्रवास एका सिनेमात मांडणे हि सोपी गोष्ट नाही. पण ते आव्हान उचललं होत आचार्य अत्रे यांनी.

आचार्य अत्रे म्हणजे अफाट व्यक्तिमत्व.

कधी विडंबनकार, कधी विनोदवीर, कधी लहान मुलांवर प्रेम करणारे शिक्षक, मराठा सारख्या वर्तमानपत्राचे रोखठोक संपादक अशी त्यांची वेगवेगळी रूपे होती. नाट्यक्षेत्रातही त्यांनी अजरामर कलाकृती घडवल्या. त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हे विनोदी नाट्य लिहिले. ‘ब्रह्मचारी’ हा बोलपटसुद्धा विनोदी चित्रपटांत महत्त्वाचा टप्पा ठरला. जीवनाकडे प्रत्येक घटकाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी अत्रेंकडे होती. त्यामुळे त्यांच्या लेखनात एवढे वैविध्य दिसून येते. ते म्हणत, ‘ज्याला नाटककार व्हायचे आहे, त्याला नाटकाची तालीम आणि नाटकाचा प्रयोग याच्यातले निराळेपण काय, हे ओळखायला आले पाहिजे.’

अत्रे यांनी चित्रपटलेखनही केले. ‘प्रेमवीर’, ‘बेगुन्हा’ नावाचे चित्रपटही लिहिले. ‘लपंडाव’ नावाच्या चित्रपटातून प्रौढ कुमारिकांच्या विवाहाची समस्या त्यांनी मांडली आहे. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिश्रण आढळून येतं. त्यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘श्यामची आई’ हे चित्रपटातून समाजप्रबोधनाचे उत्तम उदाहरण आहे. या सिनेमासाठी राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला.

श्यामची आईच्या यशानंतर त्यांनी बनवलेला पुढचा सिनेमा म्हणजे महात्मा फुले.

या सिनेमाची निर्मिती अत्रे पिक्चर्सच्या बॅनर खाली झाली होती. त्याचे निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद या सगळ्या बाजू आचार्य अत्रेंनी एक हाती सांभाळल्या होत्या. आचार्य अत्रेंना हा सिनेमा भव्यदिव्य बनवायचं ठरवलं होतं.

या सिनेमाचा मुहूर्त देखील अशाच एका महान व्यक्तिमत्वाच्या हस्ते करायची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निरोप द्यायचं ठरवलं.  बाबासाहेबांची आणि अत्रेंची मैत्री खूप जुनी होती. सुरवातीच्या काळात अत्रेंचे काही मुद्द्यांवरून आंबेडकरांशी वैचारिक मतभेद देखील झाले होते. मात्र पुढे जेव्हा ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले त्यानंतर मात्र त्यांनी आंबेडकरांना आपलं मानलं. हा जिव्हाळा अखेरपर्यंत टिकला. अत्रेंनी एकेठिकाणी लिहून ठेवलं आहे,

‘घटनासमितीत आंबेडकरांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली त्यावेळी त्यांच्या प्रखर देशभक्तीचे मला दर्शन झाले, व त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटू लागला.’

याच घट्ट मैत्रीमुळे आचार्य अत्रेंनी महात्मा फुले हा सिनेमा बनवला तेव्हा त्याच्या उद्घटनावेळी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सेटवर भेट दिली होती.

४ जानेवारी १९५४ चा तो दिवस. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. विवेकी दृष्टिकोन लाभलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंसारखी व्यक्तीच महात्मा फुलेंसारख्या युगप्रवर्तकाच्या कर्तृतत्वाचे सत्य पैलू मांडू शकते, याचा विश्वास बाबासाहेब आंबेकरांना होता. त्यामुळे या चित्रपटाच्या मुहूर्ताला त्यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली . या प्रसंगी आचार्य प्र. के. अत्रे यांना शुभेच्छा देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.

” आजकाल जो उठतो तो राजकारण आणि चित्रपटांच्या पाठी लागतो . मात्र शिलसंवर्धनासाठी समाजसेवेचे महत्त्व अधिक आहे .”

बाबूराव पेंढारकर, सुलोचना, बापूराव माने, दामुअण्णा जोशी यांनी या सिनेमात रोल केले होते. पेंढारकरांनी महात्मा फुलेंची भूमिका केली होती. पण इतकंच नाही तर अमरशेख, सरस्वती बोडस, केशवराव ठाकरे,आचार्य अत्रे, केशवराव जेधे अशा दिग्गज मंडळींनी काम केलं होतं.

इतकंच काय तर संत गाडगेबाबा हे देखील या सिनेमात काही क्षणांसाठी झळकून गेले होते.

 

कर्मवीर भाऊराव पाटील हे सुरवातीपासून आचार्य अत्रेंच्या पाठीशी खणबीरपणे उभे राहणाऱ्यांपैकी एक होते. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या बहुजनवादी चळवळीचे ते खांदे शिलेदार देखील होते. म्हणूनच महात्मा फुले या सिनेमाचा मुहूर्त त्यांच्या हस्ते करण्यात आलाच शिवाय सिनेमात महात्मा फुलेंच्या पोवाड्या वेळी स्वतः भाऊराव पाटील तिथे बसलेले दिसतात.

असा हा आचार्य अत्रे कृत महात्मा फुले हा सिनेमा पन्नासच्या दशकात प्रचंड गाजला. या देखील सिनेमाने राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावेळी रजत कमल जिंकले. आचार्य अत्रेंनी सिनेमाला न्याय तर दिलाच शिवाय जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान संघर्षाला जगापर्यंत पोहचवलं.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.