मायकल जॅक्सनला प्रश्न पडला होता, हा राज ठाकरे कोण? त्याला ४ कोटी का द्यायचे ?

१  नोव्हेंबर १९९६. भारतात एक वादळ आलं होतं. साधंसुधं वादळ नाही तर इंटरनॅशनल वादळ. नाव एमजे उर्फ मायकल जॅक्सन. जगातला सर्वात मोठा रॉकस्टार, किंग ऑफ पॉप. आभाळात आलेल्या एलियन प्रमाणे तो स्टेजवर अवतरला. आपल्या मुन वॉकने इंडियन पब्लिकला देखील पागल केलं. भारताच्या कल्चरल प्लॅटफॉर्मसाठी हा ऐतिहासिक दिवस होता.

जगातला सर्वात हायेस्ट पेड कलाकार, ज्याच्या शो साठी श्रीमंत देश वाट बघत असतात असा मायकल जॅक्सन, भारतासारख्या तुलनेने गरीब देशात कार्यक्रमासाठी येतो म्हणजे तेव्हाच्या काळात आश्चर्यच मानलं गेलं.

हा योग जुळवून आणला होता महाराष्ट्रातल्या एका तरुण नेत्याने. नाव राज श्रीकांत ठाकरे.

अवघ्या पंचविशीतल्या राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनला भारतात आणण्याचा पराक्रम केला, न भूतो न भविष्यती असा झगमगाटी सोहळा मुंबईत करून दाखवला. त्यांचं कौतुक तर झालंच पण पाठोपाठ टीका देखील झाली. तो काळ युती सरकारचा होता आणि राज ठाकरे शिवसेनेत होते.

हि टीका होती की,

मायकल जॅक्सनला मुंबईत कार्यक्रम करण्यासाठी राज ठाकरेंना ४ कोटी रुपये द्यावे लागले होते.   

काय होत नेमकं प्रकरण ? खरंच मायकल जॅक्सनने ठाकरेंना पैसे दिले होते का? त्या पैशांचं पुढं काय झालं? या सगळ्या प्रश्नासाठी त्याच्याहि आधी थोडे दिवस जावे लागेल. २६ ऑक्टोबर १९९६ रोजी आऊटलूक मासिकात छापून आलेल्या बिझी बी यांच्या लेखात एक प्रसंग छापून आला आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मायकल जॅक्सन मनीला येथे गेला होता. हॉटेलमध्ये अराम करता असलेल्या मायकलला अचानक त्याचा एजंट भेटायला आला. यावेळी आलेल्या एजंटला बघून मायकलला देखील लक्षात आलं काही तरी मोठी गोष्ट घडली आहे. त्याने आल्या आल्या एक बॉम्ब फोडला,

“जॅको तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. मुंबई मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुला एका राज ठाकरे नावाच्या माणसाला ४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.”

मायकल जॅक्सनला धक्काच बसला,

मी असा मूर्खपणा का करेन? मी कुठल्याही राज ठाकरेला पैसे देणार नाही.”

एजंट म्हणाला जर पैसे दिले नाहीत तर मुंबईत शो होईल असं वाटत नाही. आणि तुला तर माहित आहे यापूर्वी देखील तुझा तिथला एक शो कॅन्सल झाला आहे.

मायकल म्हणाला,

हे हे हे, माय हार्ट बिट्स फॉर मुंबई. काहीही झालं तरी मला तिथे शो करायचाच आहे. 

त्याने आपल्या एजंटला विचारलं, हा राज ठाकरे आहे तरी कोण? तो मुंबईमधला कोणी मोठा माणूस आहे का?

एजंटने सांगितलं की त्याच्या बद्दल मला माहित नाही पण त्याचे काका तिथला मोठा माणूस आहे असं म्हणतात.त्याच्याशी पंगा घेणे कोणालाही परवडत नाही. शोचे ऑर्गनायजर असलेले विझक्राफ्टवाले देखील ते करणार नाहीत.

तेव्हा मायकल जॅक्सनच्या डोक्यात आयडिया आली, आपण राज ठाकरेला शो करायला सांगितला आणि पैसे दिलेच नाहीत तर? यावर एजंट थोडा वैतागलाच. तो म्हणाला,

असं म्हणतात की राज ठाकरे त्याच्या डिफॉल्टर्सना मुनवॉक करायला लावतो. नुकतीच त्याच्या बद्दल एक केस झाली आहे पण मला ती माहित नाही. त्यामुळे त्याचे पैसे बुडवावे अशी रिस्क मी तरी घेणार नाही. आणि तसंही तुझ्यासाठी हे चार कोटी म्हणजे पॉपकॉर्नच आहे.   

हे  ऐकल्यावर मायकल जॅक्सन थोडा नरमला. तो म्हणाला,

“पण एवढ्या पैशांचं तो राज ठाकरे करणार तरी काय ?”

एजंटने सांगितलं की हे पैसे एका चांगल्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्याच नाव शिव उद्योग सेना. मायकल जॅक्सनला हे नाव खूप आवडलं. तो स्वतःशीच ते नाव गुणगुणू लागला.

“That’s a song, man, a new album label, hey, hey that sounds good.”

यावर त्याचा एजंट म्हणाला,

“हे काही गाणं नाही. तू हवं असलं तर ठाकरे तुला तुझ्या अल्बम साठी नक्की वापरू देतील. शेवटी तू त्यांना पैसे देणार आहेस ना. पण शिव उद्योग सेना ही एक संघटना आहे. या संघटने तर्फे राज ठाकरे २७ लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत.”

मायकल जॅक्सन म्हणाला,

” ते सगळं ठीक आहे पण हि २७ लाख लोकं माझे फॅन्स आहेत का?”

एजंटने सांगितलं,

“मला ठाऊक नाही. पण जर तू ते पैसे दिलेस तर ते २७ लाख लोक तुझे नक्कीच फॅन होतील.”

यावर खुश होऊन मायकल जॅक्सन म्हणाला,

“Well, if we have to pay Mr. Raj Thackeray, we have to pay.”

आणि खरोखर मायकल जॅक्सनने राज ठाकरेंच्या शिव उद्योग सेनेला ४ कोटी रुपये दिले.

मायकल जॅक्सन मुंबईत उतरला तेव्हा राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी मराठमोळं स्वागत केलं. त्याच्या गळ्यात हार घातला. मायकल जॅक्सन थाटामाटात मातोश्रीवर आला. बाळासाहेबांसोबत त्याने खांद्यावर हात ठेवून फोटो काढून घेतले. त्याचा शो मधला मुन वॉक मुंबईत तर फेमस झाला पण त्याच्याही पेक्षा जास्त त्याची मातोश्रीवरची हि भेट जास्त गाजली.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.