आपल्या आया खेळतात त्या कँडीक्रशमुळेच मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा फॉर्मात आलीये

गेम खेळण्याचं वेड हे प्रत्येकालाच असतं. थोडा मोकळा वेळ भेटला नाही की लगेच गेमिंग सुरु होते. त्यातल्या त्यात मैदानी खेळांपेक्षा मोबाईल गेम्स खेळणं सगळ्यांनाच जमतं. कारण प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल हमखास दिसतो. त्यामुळे मोबाईल गेम्स खूप जास्त प्रसिद्ध सध्या होताना आपण बघतो आहे. म्हणूनच पबजी, टेम्पल रन, लुडो  किंग, रमी अशा अनेक गेमिंग कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात इन्व्हेस्ट केल्या जात आहे.

मोबाईल गेम्स मधला असाच एक गेम सध्या एका कंपनीला गगनाच्या उंचीवर नेऊन ठेवण्यामागचं कारण बनणार आहे. हा गेम आहे कँडीक्रश आणि जी कंपनी मालामाल होणार आहे ती आहे मायक्रोसॉफ्ट. 

कँडीक्रश हा असा गेम आहे ज्याचे सगळ्यात जास्त खेळाडू सध्या आहेत. समजण्यास सोपा आणि एकट्याने खेळता येत असल्यानं लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळे हा गेम खेळण्याला पसंती देतात. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीने ‘कँडीक्रश’ या व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीला विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिजार्ड असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ५.१४ लाख कोटी रुपये अ‍ॅक्टिव्हिजनला देणार आहे. 

मायक्रोसॉफ्टकडे आधीच Xbox या सुप्रसिद्ध गेम कंपनीचे मालकी हक्क आहे. आणि आता ही डील म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या ४६ वर्षाच्या इतिहासातील  सर्वात मोठी डील असल्याचं बोललं जात आहे. 

या डीलमुळे मायक्रोसॉफ्टला अॅक्टिव्हेशनचे सुमारे ४०० दशलक्ष मासिक गेमिंग वापरकर्ते मिळतील. अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्डच्या गेम लाइनअपमध्ये कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश, वॉरक्राफ्ट, डायब्लो, ओव्हरवॉच आणि हर्थस्टोन अशा गेम्सचा समावेश आहे. या सगळ्या गेम्सवर डीलनंतर मायक्रोसॉफ्टचे हक्क असतील.

अशा या ताबडतोड डीलनंतर मायक्रोसॉफ्ट ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी गेमिंग कंपनी असणार आहे. 

पहिल्या क्रमांकावर चीनची टेंसेंट ही कंपनी असून, दुसऱ्या क्रमाकांवर सोनी ही कंपनी आहे. 

ही सॉफ्टवेअर निर्मात्यांचीसुद्धा आतापर्यंतचा सर्वात मोठी डील असून २०१६ च्या LinkedIn च्या खरेदीपेक्षा जवळजवळ तिप्पट मोठी डील आहे. त्यामुळे या डीलमधील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया…

ऍक्टिव्हिजन गेमिंगच्या नवीन जगात एकटी स्पर्धा करू शकत नाही. त्यांना जाणवलं की त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना जोडीदाराची गरज आहे. तर जगातील प्रत्येकाला गेमिंगचा आनंद घेता यावा आणि गेमिंगची एकता राखली जावी, असं मायक्रोसॉफ्टचं ध्येय आहे. म्हणून या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या गरज ओळखून डील  करत आहेत.

मायक्रोसॉफ्ट ही  डील  करतंय ते मोबाईल गेम्सच्या लोकप्रियतेमुळे. हा करार मोबाईल, पीसी, कन्सोल आणि क्लाउडवर त्याच्या गेमिंग व्यवसायाच्या वाढीला गती देईल आणि मेटाव्हर्ससाठी “बिल्डिंग ब्लॉक्स” देखील प्रदान करेल. मायक्रोसॉफ्ट अॅपल आणि अल्फाबेट सारख्या कंपन्यांशी कॉम्पिटिशन करत आहे. अशात गेम वितरणातून सर्वात जास्त पैसे मिळत असल्याने मायक्रोसॉफ्टला गेम आणि कन्टेन्टचं वितरण करण्याची स्वतःची निरंतर क्षमता हवी आहे. या डीलमुळे हे शक्य होईल.

मायक्रोसॉफ्टची कॉर्पोरेट रणनीती क्लाउड, कन्टेन्ट  आणि क्रिएशन अशी आहे. मायक्रोसॉफ्टला त्यांच्या क्लाउड गेमिंग सेवेवर म्हणजेच Xbox गेम पासवर अ‍ॅक्टिव्हिजनचा भूतकाळातील आणि भविष्यातील सगळा कन्टेन्ट मिळवायचा आहे, जे सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या विक्रीलाही चालना देईल.

अशा या सगळ्या बाबी लक्षात ठेवून भविष्याचा विचार करून मायक्रोसॉफ्टनं ही डील केली आहे. आता या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट पुढे जात असल्यानं इतर गेमिंग कंपन्यांवर चांगलाच लोड आला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आता पुढे जाण्यासाठी लढत देणार, हे नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.