मध्यरात्री फोन करुन त्यांना सांगण्यात आलं, उठा तुम्हाला पंतप्रधान व्हायचय..

विचार करण्यासारखी गोष्टय, जर अर्ध्या रात्री अंगावर काम आलं तर झोपेतून उठून त्या कामाला आलिंगन देण्याचं धाडस करणं अनेकांना शक्य होत नाही. पण भारतीय राजकारणात एक अशी घटना घडून गेलेली आहे की जी इतिहासाच्या पानावर अचानक झालेल्या निर्णयाने लिहून आलेली आहे.

देशात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे एका नेत्याला काहीही पूर्वसूचना न देता अर्ध्या रात्री एक फोन आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत साऱ्या देशाला आश्चर्याचा धक्का बसला. अर्ध्या रात्री आलेला एक फोन माणसाची दुनिया कुठून कुठे नेऊन ठेवीन हे मात्र सांगता येत नाही. समोरून फोनवर आवाज आला की,

“ उठा चला. सत्तेवर विराजमान व्हा कारण तुम्हाला आता देशाचं प्रधानमंत्रीचं पद सांभाळायचं आहे.”

फोन ठेवला गेला. थोडयावेळ त्या व्यक्तीला विश्वासचं बसला नाही.

अर्ध्या रात्री स्वप्नात प्रधानमंत्रीचं पद सांभाळायचं हे तर नाही पाहिलं ना? हा स्वप्नातला फोन नव्हता ना. अश्या अनेक प्रश्नांनी पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या मनात अविश्वास निर्माण झाला. पण गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीला जागं करून देश सांभाळायला देण्यासाठी एक फोन येणं हे खोटं किंवा स्वप्नातलं कधीच नसू शकतं.

एक मुलगा जो सैनिकांच्या गावात जन्मला, तारुण्यात तो पाकिस्तान मधून भारतात आला. इंदिरा गांधीने त्याच्यावर विश्वास ठेवून कॉंग्रेस मध्ये चांगलं पद दिलं.

पुढं चालून इंदिरा गांधीच्या मुलासोबत त्याचं खटकलं.

आणि मग त्याने न घाबरता इंदिराच्या मुलाला खूप सुनावून त्याला त्याची जागा दाखवून दिली.

देश सांभाळायचं स्वप्न पाहणाऱ्या त्या व्यक्तीच्या पारड्यात आयुष्यभर राजकारण करून वयाच्या ७८ व्या वर्षी अर्ध्या रात्री प्रधानमंत्री बनण्याची संधी आली. पण काळ अस्थिर होता म्हणून त्याच्या गळ्यात पदाची माळ पडली होती, हे त्यालाही माहित होतं.

अनेक संकटात त्याला पद मिळालं होतं. एक महिना सुद्धा सरकार चालू शकेल की नाही याचा जनतेला काडीमात्र विश्वास नव्हता. पण हे व्यक्तिमत्व जरा वेगळचं होतं. पाच वर्षं जरी सत्ता उपभोगता आली नाही, सरकार चालवता आलं नाही; पण काही महिने मात्र त्याने सरकार चालवून दाखवलं.

ऐन म्हातारपणात अर्ध्या रात्री प्रधानमंत्री झालेल्या व्यक्तीचं नाव होतं, इंदरकुमार गुजराल !

सरकार म्हणजे राजकारणातील एका प्रकारचा मुकुटचं आहे. तो कधी कुणाच्या डोक्यावर चढेल आणि उतरेल याचा काही नेम नाही. मुकुट उतरणीला सुरुवात झाली कर्नाटक चे माझी मुख्यमंत्री एच डी देवगौडा यांच्यापासून.

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पार्टीला पुर्ण बहुमत मिळालं नाही. तरीही १६ मे १९९६ ला अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या अकराव्या प्रधानमंत्रीच्या रुपात शपथ घेतली. पण अवघ्या तेरा दिवसात त्यांच्या सरकार ला पायउतार व्हावं लागलं. बहुमत सिद्ध करण्यात वाजपेयी अपयशी ठरले.

पुढे १ जुन १९९६ ला तोच मुकुट जनता दलाच्या एचडी देवेगौडा यांनी बाराव्या प्रधानमंत्रीच्या रुपात डोक्यावर चढवला.

पण काळ अजूनही स्थिर झाला नव्हता. कुणाचचं कुणाला देखवत नव्हतं. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सिताराम केसरी यांच्यामुळे देवगौडा सरकारला राजीनामा द्यावा लागला. कारण सिताराम केसरी प्रधानमंत्री बनण्याच्या तयारीत होते. पण त्यांच्या नावाची कॉंग्रेसमध्ये विचारणाच झाली नाही.

कधी मुलायमसिंह यादव यांचं नाव आघाडीवर आलं तर त्यांना पिछाडून तामिळनाडू चे जी के मूपनार समोर आले. पण त्यांचं ही नाव फार काळ आघाडीवर राहिलं नाही. शेवटी मुकुट चढवायचा मान मिळाला इंदरकुमार गुजराल यांना. तोही अर्ध्या रात्री. जनता दलाकडून.

इंदरकुमार गुजराल यांचा जन्म ४ डिसेंबर १९१९ मध्ये पाकिस्तानच्या झेलम नदीकाठी वसलेल्या एका गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं नारायण गुजराल आणि आईचं पुष्पा. लहानपणीच्या नकळत्या वयात ते आसपास चाललेल्या स्वातंत्र्याच्या घटना पाहत राहिले. याचा त्यांच्यावर खूप प्रभाव झाला. तारुण्यात ते भारतात आले.

१९४२ च्या ‘ इंग्रज भारत छोडो ’ या आंदोलनात सहभागी होऊन ते जेल मध्ये सुद्धा गेले. स्वातंत्र्याच्या अनेक लढाईत ते सामील झाले. राजकीयदृष्ट्या पार्श्वभूमीवर काहीतरी पद सांभाळून काम करावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे त्यांनी राजकीय सुरुवात कम्युनिस्ट पार्टी सोबत केली. नंतर काही काळ कॉंग्रेसच्या पार्टी सोबत काम केलं.

पुढे ते जनता दलात गेले. जिथं शेवटी त्यांचं भाग्य उजाडलं. उशिरा का होईना पण प्रधानमंत्री झाले.

१९७५ मध्ये इंदिरा गांधीच्या सरकार मध्ये त्यांनी केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं. १९७१ च्या आसपास देशात आणीबाणी लागू करून बेकायदेशीर रित्या इंदिरा गांधीने सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी घडलं असं की इंदिरा गांधीचे सुपुत्र संजय गांधीने उत्तरप्रदेश मधून हजाराच्या वर ट्रकभर माणसं आईच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जाणुन बुजून ठरवून आणले होते.

याचं प्रसारण न्यूज कव्हर करायला इंदरकुमार यांना मंत्री म्हणून सांगितलं होतं. त्यांनी अश्या खोट्या आंदोलनाला दाखवायला विरोध दर्शविला.

याचाच परिणाम म्हणून त्यांना मंत्री पदाचा राजीनामा देवा लागला होता.

पुढं १९८० च्या इंदिरा गांधीच्याचं सरकारात मॉस्कोत भारतीय राजदूत म्हणून सोवियेत कडून अफगाणिस्तान मध्ये होणाऱ्या ह्स्तक्षेपात त्यांनी विरोध केला होता. तेव्हापासून भारतीय विदेश नीती मध्ये खूप बदल झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वर्चस्व वाढलं होतं.

त्यामुळे आजही इंदरकुमार गुजराल यांना केंद्रीय मंत्री, राजदूत, आणि प्रधानमंत्री म्हणून आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत आदराने पाहिलं जातं.

कोणत्याही यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे इंदरकुमार गुजराल यांची पत्नी शीला गुजराल यांनी नवऱ्याला खूप मोलाची साथ दिली. त्यांना दोन मुलं आहेत. त्यामधील नरेश गुजराल राज्यसभेच्या सदस्यपदी राहिलेला आहे, तर दुसऱ्याचं नाव विशाल गुजराल आहे, जो बिझनेस सांभाळतो.

११ जुलै २०११ ला पत्नी शीला गुजराल यांचं निधन झालं. तर अवघ्या काही महिन्यात म्हणजेच ३० नोव्हेंबर २०१२ ला इंदरकुमार गुजराल यांचं ही दीर्घ आजाराने निधन झालं.

  • भिडू कृष्णा वाळके

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.