पुण्यात MPSC, UPSC करणारी पोरं हा राष्ट्रीय मुद्दा आहे ; आत्ता सवय झालेय…!

कधी काळी एका गावात एक राजा रहायचां, तसच आमचं पण आहे बघा. कधी काळी आम्ही पण MPSC, UPSC करायला पुण्याला आलेलो. पेठेत राहिलो. चाणक्य, युनिक, सिनर्जी, कोळंबे अस मनसोक्त बागडलो. अंगाखांद्यावर ढेकणं घेवून झोपलो. हिंदू वाचून दमलो. पोह्यात सांभार खावून झिजलो आणि चैनीची गोष्ट म्हणजे आवारे आणि मिलनमध्ये रविवारचं मटण खाल्लो.

काळ बदलला आणि आज बोलभिडू झालो. आत्ता पोरं परिक्षा रद्द झाल्या की चौकात उतरू लागली. समाजसुधारक वाचता वाचता स्वत: समाजसुधारक झाली. मग म्हणलं आत्ताचं वातावरण बदललं असल. आमच्या काळी अस नव्हतं. 

फोन केला चौकश्या सुरू झाल्या… 

तर भिडू लोकं आजही मुलांची सकाळ होते ती सहा वाजता. सहा वाजता जावून अहिल्यासारख्या कित्येक ठिकाणी जागा पकडण्यावरुन मारामारी असते.

आम्ही पहिल्या मुलाला फोन लावलेला तो अहिल्या अभ्यासिकेच्या बाहेरच उभा होता. अहो फोनवरुन देखील तो कुजट पुस्तकांचा वास आमच्या नाकाला भिडला.

त्याला म्हणालो,

मग काय DYSP साहेब कधी आला पुण्यात.

पोरगं लाजलं, कशाचं डिवाएसपी घेवून बसलाय दादा. हितं गावात तोंड दाखवायचं अवघड झालय. दोन वर्षात एक लग्न नाय का एक दिवाळी नाय. अहो हा पठ्या एकेकाळचा नवरात्र केसरी आहे. दांड्या हातात आल्या की मी निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा जोरात घुमायचो. पण आत्ता भारतात शेअर बाजार किती, स्थापना कधी, भांडवल काय, GDP काय असलच चालतय.

पोराला थोडा धीर दिला आणि विचारलं मग आत्ता कस वाटतय..? 

पोरगं म्हणालं सवयीचं झालय बघा. सवय हा सगळ्यात रामबाण उपाय. राम मंदिर… तो अचानक थांबला आणि म्हणाला, हे बघा रामबाण म्हणलं तरी राममंदिर आठवत. अस आयुष्य झालय आमचं.

मग मित्रा पुण्यात आलास त्याबद्दल दोन वाक्य बोलं,

पुण्यात सगळ्यात अवघड गेलं ते बोलाई पचवायला. एकवेळ तुकाराम जाधव सरांच पॉलिटिक्स पचल पण बोलाई तशी अवघडच गोष्ट. पण मी यशस्वी लढा उभा केला. इतिहासात होतच ते. त्यानंतरचा प्रश्न होता पोहे सांभार नामक पदार्थाचा. आपल्याला अज्जून कोण पोहे खायला बोलवत नाही पण पोह्याची तशी सवयच म्हणां. पण सांभार हे जरा अशक्य वाटतं होतं. हळुहळु लक्षात आलं, सांभार म्हणजे एकनाथ पाटलांच्या ठोकल्यासारखं आहे. कुठही वापरा कसही वापरा. चालुन जातय.

छान छान, ज्या मुलाने अन्नपदार्थ पचवले त्याला MPSC, UPSC म्हणजे किस झाट की पत्ती, बरोबर ना भावा.. 

आत्ता तुम्ही लेखक झालाय म्हणल्यावर बरोबरच असल. ते MPSC म्हणून फक्त भावना दुखवू नका. माझं सायन्स झालय सो मी UPSC करणं मस्ट आहे. तस मी MPSC च करतो पण क्लास लावताना UPSC चा लावतो. म्हणजे वजन मिळतं.

ठिकाय म्हणून आम्ही फोन ठेवला. या भिडूला पुण्यात स्थलांतर करुन दोन वर्ष झाली होती. त्याला आत्ता कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता. टोकाच्या भावना उत्पन्न व्हायला एकतर पाच वर्ष पुण्यात राहिलेला असावा किंवा मग आत्ताआत्ता पुण्यात आलेला असावा, म्हणून आम्ही नव्याकोऱ्या पोराला फोन लावला.

हॅल्लो, मित्रा मला तुझ्याशी बोलायचा आहे…? 

बोल्ला की दादा, कायपण बोला सगळं सांगतो…? 

मग कस वाटतय पुण्यात येवून..? 

अहो दादा कस वाटतय म्हणून काय विचारता, अधिकारी नाही नागरिक बना टाईप आहे बघा सगळं. गेल्या दीड वर्षी महिन्यापुर्वी ढोल वाजवले ना पथकात. तो माझा दोस्त तर टिळक रोडवर हाताला हात धरून देशसेवा करत होता की. (मनातल्या मनात म्हणलं, ह्यो खरा नवा माणूस आणि चाणक्यवाला पण)

बर मित्रा जेवण, खाणं, राहणं एकंदरीत कस आहे..?

रात्री ढेकणांचा त्रास होतो पण अधिकारी व्हायचं आहे तर तेवढं तर केल पाहीजेच की. नांगरे पाटलांना चावली नसतील का ढेकणं. ते एवढे मोठ्ठे अधिकारी. आपणाला चावली तर त्याचं काय कौतुक. अहो नांगरे सर, अन्सारी, आंधळे सर अशा कित्येकांच रक्त आहे या पेठेतल्या ढेकणात. असली मोठ्ठी ढेकणं आपल्यासारख्या आत्ताच क्लास लावणाऱ्या पोरांना चावत्यात म्हणजे नशीबच समजायचं की.

बाकी रुमच म्हणाल तर मी फक्त झोपायला जातो. सकाळी सहाला उठून हिंदू घेवून येतो. लोकसत्ताचं एकपण संपादकिय चुकवलं नाही. गावाकडं गेलो की तावातावनं गावच्या म्हाताऱ्याबरोबर GDP वर भांडतो. सुट्टी नसते एकंदरीत. आपलं क्लियर हाय. या वर्षी UPSC फक्त रॅंक आणि केडर एवढाच काय तो मुद्दा. कधीकधी आसामला जावू वाटतय.

बघू वेळ आल्यावर… आणि हो…….

त्याचा उत्साह तोडत आम्ही बोलुया निवांत म्हणून कटवला. आत्ता तिसरा फंटर मिळाला की स्टोरी पुर्ण आणि संपादक खुष या एकमेव विचारात आम्ही १० वर्ष जुन्या स्थलांतरीत (काकांना) फोन लावला..

हॅल्लो दादा अमुक तमुक विषयावर बोलायचा आहे. मी बोलभिडूतून बोलतोय..? 

हा बोला, मी वाचलय तुमचं. जमतय तुम्हाला पण अजून जरा वढलं पाहीजे. कसय अजून तो फ्लो मेंन्टेन करायला जमला पाहीजे. हे बघा तुमच ऱ्हस्व दिर्घ तर चुकलेलच असतय शिवाय ते ग्रामर तिथपण मार्क जावू शकतो. बाकी राहता राहिलं डिझाईन.. वगैरे वगैरे… (सदरच्या काकांचे सल्ले पाहून म्हणलं, चला हा खरा जुना खोंड, देव पावला योग्य माणसाला फोन लागला. जोपर्यन्त माणूस सहाय्यकारी क्रियापद होत नाय तोपर्यन्त त्याला MPSC, UPSC त मुरल्याला आहे म्हणायचं नाही)

बर ते ठिकाय पण तुम्ही सुरवात कधी केली म्हणायची…?

सुरवात बघा मागच्याच्या मागच्या ऑलिम्पिकला. अभिनव बिंद्राच्या हातात जेव्हा सुवर्ण पडलं तेव्हाच माझ्या हातात एकनाथ पाटीलांचा ठोकळा पडला. मग औंरगाबाद आणि मग पुणे. आत्ता लायब्ररीत जातो. काय वाचायचाय सगळं वाचून झालय. आत्ता दहा वर्षात पुस्तकं पण बदलली. सगळं वाचलं बघा. पुण्याचं म्हणला तर एकन एक जागा माहितय. कुठं जायचं, कधी जायचं सगळच्या सगळं. गावातलं काही आठवत नाही खरं. तो विषयचं वेगळा. पाहुण्यांची एक पोरगी पाच वर्षांमागे बघितली. करायचं होतं पण आत्ता तीच पोरगं तीन वर्षाचाय. मला मामा पण म्हणतय. चालायचं. बाकी मिलन, आवारे आपल्याला पर्सनल ओळखतात. झेरॉक्स काढायला गेलं तरी उधारी चालते. एवढचं काय..? रुममालक.. अहो पुण्याचा रुममालक माझा रिस्पेक्ट करतो. पाच वर्ष तीच रुम तीच खॉट. लय बघितले उत्साही कार्यकर्ते. एका मार्कात हुकलो. तो काय..? कसा DYSP झाला कुणास ठावूक. माझ्या नोट्स वाचायचा. पण डोक्यानं येडाच होता.

मग काका आत्ता लग्नाचा काय विचार ?

तेवढ्या बाबतीच मी सुखीए. आपल्याला असच एका दिवशी आयड्या सुचली. लगीनच करायचं नाही. ना रहेंगा बास, ना बजेंगी बासरी. एक रुम, महिना आठ-दहा हजार, आणि सल्ले देवू वाटले तर आजूबाजूला दोन चार नविन पोरं. खूष असतो आपण. दुख नाही…

पोरांन रडक्या डोळ्यानं फोन ठेवला हा विश्वास आम्हाला इथ बसून मिळाला. आत्ता या भट्टीतनं तावून सुलाखून बाहेर पडणारे आहेतच. पण गोलगोल फिरणारे अधिक आहेत. चालायचं आयुष्याचे भोग म्हणयाचे आणि MPSC भोगायचं, आत्ता झाल्या सवय म्हणा…

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.