१२ व्या वर्षी ३८ वेळा अटक झालेल्या पोराला, या माणसाने “माईक टायसन” बनवलं….

न्यूयॉर्क शहरातल्या गचाळ वस्तीतला एक सुनसान रस्ता. नेहमीप्रमाणे स्ट्रीट फायटिंगचे मॅचेस चालले होते. जोरात दंगा सुरु होता. आज विशेष कारण होतं, एक बारा वर्षाचा मुलगा एका मोठ्या माणसाबरोबर बॉक्सिंग खेळत होता. पोरग लैच वांड होतं. उंचीनं आपल्यापेक्षा दुप्पट असणाऱ्या माणसाशी नडत होतं. पण अपेक्षेप्रमाणे जास्त वेळ टिकाव धरणे शक्य नव्हतच. तो मॅच हरला.

पण त्याने दिलेली फाईट त्या भागात सगळ्यांच्या चर्चेचा विषय होती.

पोराच नाव आयर्न माईक टायसन.

तो जन्मला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडले होते. त्याचे खरे वडील नेमके कोण हे त्याला सुद्धा नेमक माहित नाही ज्यांनी सोडलं ते सावत्र वडील. रस्त्यावर आलेल्या त्याच्या आईने कसबस त्याला आणि त्याच्या भावंडाना वाढवल. न्यूयॉर्कमधली ती झोपडपट्टी. तिथे रोज एक खून व्हायचा. काही ना काही कारणानं पोलीसगाडी तिथ फिरत असायचीच. पण कितीही झालं तरी तिथला क्राईम रेट काही कमी होत नव्हता. अशा वातावरणात माईक वाढला.

जात्याच बंडखोर, अंगात रग, कसला तरी राग कायम डोक्यात. त्याचा तोतरा आवाजाबद्द्ल, त्याच्या घरच्या परिस्थिती बद्दल कोणीही काहीही जरी बोलल, त्याने पाळलेल्या कबुतराला कोणी काही केलं तरी लगेच डोकं सटकायचं. मग समोरचा कोणीही असो त्याला धरून ठोकणे एवढचं त्याला कळायचं. असल्या मारामाऱ्या, चोऱ्या अशा वेगवेगळ्या कारणामूळ त्याला बारा वर्षाचा असतानाच ३८ वेळा पोलिसांनी अटक केली होती.

अखेर त्याला रिमांड होमच्या शाळेत घातल गेलं. तिथे बॉब स्टूअर्ट नावाच्या एका कौन्सिलरने त्याला जवळच्या एका  बॉक्सिंग जिममध्ये नेले. फ्लॉइड पटरसनसारख्या जगातल्या सर्वात कमी वयाच्या हेवीवेट चॅम्पियन बॉक्सरला तयार करणाऱ्या कस डीअमलो नावाच्या सत्तरवर्षाच्या म्हाताऱ्याची ही जिम.

कस डी अमेलोला बॉबने या अतिशय व्हायोलंट असणाऱ्या पोराची स्टोरी सांगितली. माईकचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतच. त्याची नजर राहून राहून म्हाताऱ्याच्या एका खोट्या डोळ्याकडे जात होती. शेवटी कसने त्याला विचारलेच,

“तुला ठाऊक आहे का माझा एक डोळा आंधळा कसा झाला ते?”

माईकने नकारार्थी मान हलवली, कसं म्हणाला,

“लहान असताना मी सुद्धा तुझ्यासारखा होतो. गल्लीत दादागिरी करायचो, स्ट्रीट फायटिंग करायचो. लोक म्हणायचे मी पुढे जाऊन मोठा फायटर होणार. पण एकदा एका फाईट मध्ये एकाने मला इतक मारल की माझा डोळा गेला.  गल्लीतल्या भांडणात तुम्हाला जखमा शिवाय काही मिळत नाही. माझ सगळ आयुष्य त्या दिवशी बरबाद झालं.”

माईकला एकदम धक्काच बसला. पहिल्यांदाच आरशात बघतोय आणि तिथे कोणीतरी आपल्याला भविष्य दाखवतोय असं त्याला वाटलं.

दुसऱ्या दिवसापासून माईक टायसन ची ट्रेनिंग सुरु झाली. कस डिमेलोची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती. त्याच्या जिमला खूप मोठी आणि जड जड दारे होती. ही दारे ओलांडून जो लहान मुलगा वरच्या बॉक्सिंग रिंग पर्यंत यायचा त्यालाच कस डिमेलो प्रवेश द्यायचं. बरीच मुले तिथूनच पळून जायची.

पण टायसन पळाला नाही. कस डिमेलोला त्याची रग जिरवायची होती. टायसनला त्याने चांगलेच रगडले कसचे फटके खाऊन पण तो पळाला नाही. रोजच्या इंटेन्स ट्रेनिंग सेशननंतर संध्याकाळी चालता येणं देखील मुश्कील व्हायचं पण तरी टायसन रोज तिथे जातच राहिला. अखेर कसच्या लक्षात आले हा खरा फायटर आहे.

 “इस बंदे मे आग है. फुटला तर ज्वालामुखी बनून फुटेल. याला मी जगानं कधीच पाहिला नाही असा चॅम्पियन बनवणार.”

टायसनला जेवढ त्याने ज्ञान दिल तो पटापट शिकतचं होता. कसने त्याला पिक अ बु स्टेप शिकवली. बॉक्सरला नेहमी आक्रमकतेसोबत स्वतःचा डिफेन्ससुद्धा मजबूत असायला पाहिजे. दिवसरात्र टायसनचं ट्रेनिंग चालायचं. जिममध्ये येणारे बाकीचे बॉक्सर जळायचे, काय आहे त्या माईकमध्ये की हा म्हातारा फक्त त्यालाच ट्रेनिंग देतो. कस फक्त त्यांच्यावर हसायचा.

माईक जेव्हा खऱ्या स्पर्धेत उतरला. तेव्हा तो फक्त समोरच्या बॉक्सरला ठोकू लागला. त्याच्या ठोस्याची प्रसिद्धी कुप्रसिद्धी जगभर पसरू लागली. तो रिंगणात उतरला की समोरचा बॉक्सर थरथर कापत असे. ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धेत त्याने सलग दोन वर्ष गोल्ड मेडल मिळवले.

सगळ चांगलं चाललं होत एवढ्यात बातमी आली माईकची आई वारली. सोळा वर्षाच्या टायसनसाठी तो मोठा धक्का होता. पण कसच्या आधारामुळे तो तुटला नाही. कस डिमेलो आता त्याच्यासाठी आई आणि बाप दोन्ही होता. त्याने त्याला अधिकृतरित्या दत्तकसुद्धा घेतलेलं.

अवघा अठरा वर्षाचा असताना माईक टायसन प्रोफेशनल बॉक्सिंग मध्ये उतरला. पहिल्या वर्षी त्याने २८ मॅचेस खेळल्या. त्यातल्या २६ मध्ये त्याने समोरच्या बॉक्सरला नॉकआउट केले होते. त्यातही १६ सामने पहिल्या राऊंडच्या पुढे गेले नव्हते. सगळ जग त्याला पुढचा हेवीवेट चॅम्पियन म्हणून ओळखत होतं.

आणि घडलंही तसच. २२ नोव्हेबर १९८६ रोजी तेव्हाचा वर्ल्ड चॅम्पियन ट्रेव्हर बर्बिकला हरवून टायसन जगातला यंन्गेस्ट हेवी वेट चॅम्पियन झाला. ही लढत जिंकायला त्याला दोन राउंड सुद्धा लागले नाहीत. जिंकल्यावर त्याने आपल्या मुलाखतीमध्ये जाहीर केलं,

“मी जगातला सर्वात लहान चॅम्पियन आहे आणि काही वर्षांनी जगातला सर्वात म्हातारा चॅम्पियन होण्याचा विक्रम देखील मीच करणार आहे.”

त्याचा हा आत्मविश्वास कोणालाही अहंकार वाटला नाही. 

पण या दरम्यान कस कुठे होता?

कसचं मागच्याच वर्षी न्युमोनियामुळे निधन झालं होतं. आपल्या सगळ्यात लाडक्या पठ्ठ्याला चॅम्पियन होताना तो बघू शकला नाही. एका अर्थे ते बरच झालं. कारण त्यानंतर टायसनने जे जे काही केलं ते सुद्धा त्याला पाहावं लागलं नाही. 

कस डिमेलोच्या स्वप्नाप्रमाणे माईक जगाने घाबरावा असा बॉक्सर बनला. पण त्याला आवरायला कोणी उरल नाही. कसचा मृत्यू ही त्याच्या आयुष्यातली सर्वात दुर्दैवी घटना होती. त्याने नशेत कित्येकदा पत्रकारांना मारहाण केली. ड्रगच्या आहारी गेला. एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतलेल्या मुलीवर रेप केला आणि त्यापायी तीन वर्षे तुरुंगात काढली. सगळ्यात कहर म्हणजे बॉक्सिंग करताना आपल्या स्पर्धकाचा कान चावून तोडला. 

माईक टायसन हे नाव कधीच आदराने घेतलं गेलं नाही. त्याच्यात टलेंट होतं पण टायसनने स्वतःच्या हाताने करीयरचं नुकसान करून घेतलं असच सगळे म्हणत राहिले. त्याला गर्व होता त्याप्रमाणे तो वर्षानुवर्षे चॅम्पियन राहीलाही असता फक्त त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला त्याचा बाप कस डिमेलो अजून काही वर्षे जगायला हवा होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.