…अन् कम्युनिस्ट सोवियतच्या राष्ट्रध्यक्षांनी अमेरिकेच्या पिझ्झा हटच्या ऍडमध्ये काम केलेलं

हायस्कुलमध्ये इतिहास शिकतांना शीतयुद्ध हा शब्द ऐकून ऐकून अनेकांचे कान गरम व्हायचे. अनेक जण म्हणायचे हे काय चाललंय? एकतर खडाजंगी युद्ध नाही आणि इतके दिवस झाले तरी युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. हे शीतपुराण ऐकून ऐकून कंटाळा आला राव. या रशियाची कम्युनिस्ट सरकार आणि अमेरिकेची भांडवलशाही लय जड जातेय. 

परंतु भिडूंनो ज्या अमेरिका आणि रशियाच्या कोल्ड वॉरचा इतिहास शिकताना आपले कान कंटाळायचे, त्या कोल्ड वॉरला ज्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी संपवलं त्यांचं कालच म्हणजेच ३० ऑगस्टला रशियाच्या मास्को शहरात निधन झालं. 

या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं नाव कदाचित अनेकांना माहित नसेल…पण त्यांच्याबद्दल माहिती असू देणं मस्ट आहे.

तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हियत युनियन नावाचे दोन देश महासत्ता म्हणून उदयाला आले. त्यात अमेरिका ही भांडवलशाही होती आणि सोवियत युनियन हा कम्युनिस्ट देश होता. या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या विचारांवरून एक मोठं आणि दीर्घकाळ युद्ध चाललं ज्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो. 

हे कोल्ड वॉर समाप्त व्हावं आणि जगभर लोकशाही मूल्य रुजवित असं जगभरातील अनेकांना वाटत होतं मात्र त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. परंतु जगभरातील सामान्य लोकांप्रमाणे विचार करणारे एक व्यक्ती सोवियत युनियन मध्ये सुद्धा होते. ते म्हणजे सोवियत युनियनचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह.

मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी झाले आणि जगाचा इतिहासच बदलून गेला. 

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म एका गरीब रशियन परिवारात झाला. परंतु आपल्या कामाच्या बळावर ते थेट रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या सर्वोच्च पदावर पोहोचले. १९८५ मध्ये मिखाईल कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी झाले. जनरल सेक्रेटरी पदाच्या कार्यकाळात १९९०-९१ या दोन वर्षात ते सोवियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा झाले.

गोर्बाचेव्ह सोवियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष होते परंतु त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही या दोन मूल्यांची आवड होती. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या राष्ट्रपती पदाच्या काळात १९९० सालात अमेरिका आणि सोवियत युनियनमध्ये अनुशस्त्र नष्ट करण्यासाठी न्यूक्लिअर फोर्स करार घडवला. त्या करारामुळे अमेरिका आणि सोव्हियत युनियनमध्ये असलेली शस्त्रास्त्र स्पर्धा थांबली आणि शीतयुद्ध समाप्त झालं.

त्या अणुशस्त्र नष्ट करण्याच्या करारामुळे गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये शांततेच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 

शस्त्रास्त्र करारासोबतच मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोवियत युनियनच्या सरकारवर असलेला कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. सोवियत सरकार ही एका पार्टीची न राहतात ती लोकशाही पद्धतीची असावी यासाठी त्यांनी देशात राजकीय सुधारणा सुरु केल्या. तसेच सोवियत सरकारकडून लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी थांबवण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आपल्या देशात सुधारणा घडवून आणल्या मात्र त्यांचे सहकारी त्यांच्या विरोधात जायला लागले.   

देशातील सुधारणा आणि पूर्व युरोपमधील देशांमध्ये लोकशाही आंदोलनांवर बळाचा वापर न केल्यामुळे सोव्हियत युनियनची सत्ता ढासळली. अनेक वर्षांपासून एकसंध असलेल्या सोवियत युनियनचं १९९१ मध्ये विघटन झालं आणि त्याजागी १५ नवीन देश निर्माण झाले.

सोवियत युनियनच्या विघटनाचं खापर मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यावर फोडण्यात आलं. त्यामुळे मिखाईल गोर्बाचेव्ह यांची राजकीय ताकद जवळपास समाप्त झाली.    

सोवियत युनियनच्या विघटनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यावर राजकारणी आणि जनता दोन्ही स्तरातून आरोप करण्यात आले. मुळात कम्युनिस्ट शासनात राष्ट्राध्यक्ष केव्हा मरतो हे कळू सुद्धा दिलं जात नाही. त्याच कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव देशाच्या राजकारणातून कमी करण्यासाठी मिखाईल यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे कम्युनिस्ट नेत्यांनी त्यांना रशियाच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.

राष्ट्राध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यांनतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘गोर्बाचेव्ह फाउंडेशन’ची स्थापना केली.

लोकशाही मूल्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या मिखाईल यांनी ‘गोर्बाचेव्ह फाउंडेशन नावाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अभ्यास करणारी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून जगातील इतर देशांसोबत रशियाचा अभ्यास केला जाऊ लागला होता.

रशियन राजकारण्यांनी गोर्बाचेव्ह यांना राजकारणातून दूर सरल्यामुळे ते रशियात जणू अडगडीत पडले होते. तरीही निराश न होता गोर्बाचेव्ह यांनी १९९६ मध्ये रशियन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत गोर्बाचेव्ह यांना केवळ १ टक्का मतं मिळाली होती. 

१९९६ मध्ये मिळालेल्या १ टक्का मतांमुळे गोर्बाचेव्ह यांनी कायमचं राजकारण सोडलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य गोर्बाचेव्ह फाऊंडेशनच्या कामासाठी वाहून घेतलं. 

परंतु गोर्बाचेव्ह यांच्या फाउंडेशनपुढे मोठी आर्थिक समस्या होती. त्यामुळे फाउंडेशनसाठी निधी गोळा करणे गरजेचे होते. फाउंडेशनचा निधी गोळा करण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी कम्युनिस्ट रशियाच्या पारंपरिक विचारांना फाट्यावर मारून थेट पिझ्झा हट या अमेरिकन कंपनीची जाहिरात केली.

पिझ्झा हटच्या जाहिरातीची शूटिंग रशियातील कम्युनिस्ट क्रांतीच्या रेड स्वेअर मधील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.  

जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे गोर्बाचेव्ह आपल्या नातीबरोबर रेड स्वेअर मधील हॉटेल मध्ये येतात आणि पिझ्झा हट खायला बसतात. तेव्हा गोर्बाचेव्ह यांना बघून आजूबाजूला बसलेले काही लोक त्यांच्यावर टीका करायला लागतात. ते म्हणतात गोर्बाचेव्ह यांच्यामुळे देशाचे तुकडे झाले, देशात राजकीय अस्थिरता आली, देशाची अर्थव्यवस्था बदलली. 

टीकाकार गोर्बाचेव्ह यांच्यावर टीका करत असतांना त्यातीलच काही जण गोर्बाचेव्ह यांच्या बाजूने बोलायला लागतात. ते गोर्बाचेव्ह यांचा बचाव करतांना त्यांच्यामुळे झालेल्या सुधारणांचा पाढा वाचतात. परंतु टीकाकार आपली टीका करणं थांबवत नाही. 

तेव्हा टीकाकारांच्या बाजूला बसलेली एक महिला उभी होऊन म्हणते कि ‘गोर्बाचेव्ह यांच्यामुळेच आपल्याला हा पिझ्झा हट खायला मिळत आहे.’ त्या महिलेलच्या या वाक्यावर सगळे जण हसतात आणि पिझ्झा खायला लागतात. 

गोर्बाचेव्ह यांनी केलेली जाहिरात कम्युनिस्ट रशियाच्या साम्यवादी विचारांना तोडणारी होती. त्यामुळे ती जाहिरात रशियामध्ये कधीच दाखवण्यात आली नाही. परंतु जगभरात मात्र या जाहिरातीला फार महत्व मिळालं. ही जाहिरात बघून गोर्बाचेव्ह यांच्यामुळे कम्युनिस्ट रशियात अमेरिकन भांडवलशाहीचा विजय झाला अशी चर्चा केली जाऊ लागली.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या या जाहिरातीमध्ये दाखवलेले व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही रशियामध्ये आणण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी प्रयत्न केले होते. गोर्बाचेव्ह यांच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच अंशी रशियाच्या व्यवस्थेत बदल झाला. त्यामुळेच लोकशाही तत्व रशियात काही प्रमाणात पाळल्या जाऊ लागले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.