‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे ऐतिहासिक गाणं बनवण्याची आयडिया पंतप्रधान राजीव गांधींची होती…

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवसांचं विशेष महत्व असतं. टीव्हीवर बॉर्डर आणि तिरंगा लागल्याशिवाय या राष्ट्रीय सणांचा फील येत नाही. सकाळी सकाळी देशभक्तीचे लागणारे गाणे हे त्या दिवसाचा उत्साह वाढवत असतात. या गाण्यांमधून देशप्रेम, देशभक्ती व्यक्त केली पण एक गाणं असं आहे जे एकेकाळी प्रचंड व्हायरल झालं होतं, या गाण्यामागे खुद्द पंतप्रधानाची आयडिया होती.

दूरदर्शनवर राष्ट्रीय सणाच्या दिवशी एक गाणं कंपल्सरी लागायचं ते म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजाने सुरु झालेलं हे गाणं आजही तितकंच फ्रेश आहे. देशातल्या सगळ्या विविधता, भाषा, संस्कृती एकत्र असलेलं हे गाणं तयार कसं झालं, यात सगळे हिरो वैगरे कसे ऍड झाले यामागे एक भारी किस्सा आहे. 

असं सांगितलं जात कि मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्याचा विचार पंतप्रधान राजीव गांधी आणि जयदीप समर्थ यांच्या चर्चेमधून झाला होता. जयदीप समर्थ हे अभिनेत्री नूतन आणि तनुजा यांचे बंधू होते. याबरोबरच राजीव गांधी यांचे खास मित्र आणि ओबीएममध्ये ते वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते.  विविधतेने परिपूर्ण असलेला आपला देश एका गाण्यातून कसा सांगता येईल यावर चर्चा सुरु असताना या गाण्याचा जन्म झाला.

राजीव गांधींच्या या कल्पनेला दुजोरा देत जयदीप समर्थ हे नॅशनल क्रिएटिव्ह हेड असलेल्या सुरेश मुळीक यांना जाऊन भेटले. पुढे सुरेश मुळीक यांनी या गाण्याचा प्रस्ताव फिल्म मेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांच्यासमोर मांडला. यात एक अशी अट ठेवण्यात आली कि गाण्यामध्ये पंडित भीमसेन जोशी असायला हवे, पंडित भीमसेन जोशी आनंदाने या मेगा प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. 

या सगळ्या प्रक्रियेत दूरदर्शनचे अधिकारी महत्वाचे होते. हा भव्य दिव्य प्रोजेक्ट असल्याने यात सेलिब्रिटी लोकांची रेलचेल असण्याची मागणी होती. दिग्दर्शक कैलाश सुरेंद्रनाथ यांनी अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि जितेंद्र या तिघांना या गाण्यात घेण्याचं ठरवलं होतं. तेव्हा दूरदर्शनच्या अधिकाऱ्याने या तिन्ही सेलिब्रिटींना पत्र पाठवले होते.

अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती हे तेव्हा मोठे स्टार होते आणि ते या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतील याची शक्यता कमी होती. पण एके दिवशी अचानक तिन्ही सेलिब्रिटींना मेहबूब स्टुडिओला एकत्र येताना बघून कैलाश सत्येंद्रनाथ आणि दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं. या तिघांनी या प्रोजेक्टमध्ये मोठं योगदान दिलं.

या गाण्यात हेमा मालिनीसुद्धा आपल्याला दिसतात. दिग्दर्शक कैलाश सुरेंद्रनाथ हे हेमामालिनीचे मोठे फॅन होते, ज्या दिवशी हेमा मालिनी यांचं शूट होतं त्या दिवशी दिग्दर्शक एकदम सुटाबुटात आलेलं होते. पुढे लता मंगेशकर सुद्धा या प्रोजेक्टमध्ये जॉईन झाल्या. शूटच्या दिवशी खास तिरंगी साडीमध्ये लता मंगेशकर आल्या होत्या. या प्रोजेक्टमध्ये अभिनेते आणि गायकच नव्हते तर खेळाडूसुद्धा होते. खेळाडूंमध्ये प्रकाश पदुकोण, अरुण लाल सहभागी होते.

पियुष पांडेय यांनी हे गाणं लिहिलं, अशोक पत्की यांनी हे गाणं कंपोज केलं.

१५ ऑगस्ट १९८८ रोजी पंतप्रधानांच्या भाषणानंतर दूरदर्शनने हे गाणं रिलीज केलं आणि अल्पावधीतच हे गाणं लोकप्रिय झालं.

मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, काश्मिरी, पंजाबी, सिंधी, तमिळ, मल्याळम, उर्दू अशा अनेक भाषा या गाण्यामध्ये होत्या. विविधता में एकता विचार असणाऱ्या राजीव गांधींच्या संकल्पनेतून या गाण्याचा उगम झाला आणि हे गाणं कायमच अजरामर झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.