ताजमहालवरून हेलिकॉप्टर उडवायची परवानगी एकदाच मिळाली होती, ती या गाण्यासाठी

१९८८ साली घडलेली गोष्ट. राजीव गांधी लाल किल्ल्यावरून भाषण देत होते. त्यांचं भाषण झाल्यानंतर टीव्हीवर एक गाणं वाजवण्यात आलं. सगळ्या देशाने हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं होतं. १५ ऑगस्टला जण गन मन आणि वंदे मातरम वगळता काही ऐकायची कुणाला सवय नव्हती. त्यामुळे हे गीत लोकांच्या औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरलं.

तेव्हापासून आजतागायत हे गाणं भारतच्या एकतेचे आणि वैभवाचे प्रतीक बनलं आहे. लाखो लोकांसाठी हे गाणं अनऑफिशियली प्रति-राष्ट्रगीतच बनलं आहे.

या गाण्याचं नाव आहे ‘एक सूर’… ज्याला आपण सगळे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणून ओळखतो. या गाण्यात राष्ट्रभक्तीचं आक्रमक जाज्ज्वल्य रूप नव्हतं. हळूच मनात रुंजी घालून अलगद देशाचं प्रेम फुलवण्याची किमया होती. माणसाला आपोआपच देशाचं प्रेम वाटू लागायचं. परस्पर भाषेविषयीचं प्रेम त्यात दिसत असे.

भारताचे गानसेन भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या आवाजाने सुरु होणारं गाणं सर्वांच्या अतिपरिचयाचं झालं. याच्या नंतरच्या पिढीच्याही मनात अजून हे गाणं आपली छाप ठेवून आहे.

राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते. आपले मित्र जयदीप समर्थ यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना या गाण्याची संकल्पना सुचली.

त्यावेळी भारतीय फिल्म्समध्ये बनणाऱ्या कोणत्याही गाण्यापेक्षा मोठी हिट या गाण्याला भेटली.

हे गाणं बनवायला सहा महिन्यांचा अवधी गेला होता. लोकसेवा संचार निगमच्या प्रस्तुतीने हे गाणं बनवलं गेलं होतं. पियुष पांडे हे तेव्हा ओजिल्व्ही अँड मॅथर कंपनीत अकाउंट मॅनेजर होते.

त्यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते.  २०१४ साली मोदींच्या ‘सबका साथ’ किंवा ‘मेरा देश बदल रहा है’ यामागेही हेच गृहस्थ होते. नंतरच्या काळात ते कंपनीच्या अध्यक्षपदापर्यंतही पोचले.

सहा मिनिटांचं हे गाणं मराठी, हिंदी, असमी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेमध्ये गायलं गेलं होतं.

या गाण्यात त्या कालचे आघाडीचे सगळे नट होते. कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, बच्चन साहेब हे गट एकमेकांच्या गळ्यात हात घालून होते. या गाण्यात दिसण्यासाठी अनेक हिरोंची धडपड सुरु होती. कुठलेही पैसे ना घेता अनेकजण केवळ फिलर म्हणून यात येण्यासाठी तयार झाले.

यात आपल्या नंबर लागावा म्हणून बच्चन साहेबानी शर्थीचे प्रयत्न केले होते. पण एका हिरोला कैलाश सुरेंद्रनाथ यांनी स्वतः विचारूनही यात यायला त्यांनी नकार दिला होता. ते म्हणजे नसरुद्दीन शाह.

१९८४ साली नुकतीच मोठी दिल्ली दंगल होऊन गेली होती. काही दिवसात निवडणुकाही येणार होत्या. अशा पार्श्वभूमीवर ‘ही जाहिरात राजकीय आहे’ असं सांगून नसरुद्दीन शाह यांनी यात यायला नकार दिला होता.

वहिदा रहमान, हेमा मालिनी, तनुजा, शबाना आझमी, शर्मिला टागोर या सगळ्या आघाडीच्या नट्या एकावेळी या गाण्यात होत्या. डायना फ्रॅम एडुलजी या टेस्ट क्रिकेटरही यात होत्या. प्रकाश पदुकोण हेही कास्टचा भाग होते. फिल्म डिरेक्टर मृणाल सेन हेही एका फ्रेममध्ये दिसून गेले.

“माझ्या-तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा” एवढी एक ओळ मराठी ताल ठेक्यामुळे सर्वांच्या लक्षात राहिली होती. भारताच्या बहुरंगी संस्कृतीला आपलंस करणारी याहून परिणामकारक जाहिरात होऊ शकत नव्हती.

लता मंगेशकर आणि इतर गायकांचे चेहरेही लोकांना यातून पहिल्यांदा मनभरून पाहता आले.

लिरिल आणि वाह ताज अशा जाहिराती बनवणारे कैलाश सुरेंद्रनाथ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. १९८५ साली त्यांनी देशाच्या एकतेवर टॉर्च ऑफ फ्रिडम हा चित्रपट बनवला होता. तो कमालीचा यशस्वी झाला होता. त्यामुळे याची जबाबदारी आपोआपच त्यांच्याकडे चालून आली.

याचे स्वर आणि ताल, विविध भारतीय वाद्यांचा वापर हे गाण्याचं वैशिष्ट्य होतंच, पण त्याचबरोबर त्याचा व्हिडिओसुद्धा प्रचंड लक्षवेधी बनवला गेला होता. ताजमहालचे हवेतून घेतलेले दृश्य पहिल्यांडच चित्रित करण्यात आले.

एरव्ही ताजमहालावरून विमान उडवण्याचीही परवानगी भेटत नाही. त्यावर सुरक्षेच्या आणि काळजीच्या कारणास्तव कोणतेही हेलिकॉप्टर नेऊ दिले जात नाही. त्यावेळी आपल्या गाण्यात ताजमहाल हवाच म्हणून सुरेंद्रनाथ अडून बसले होते. ताजमहालाची कुणालाही ना दिसलेली बाजू त्यांना गाण्यात दाखवायची होती. अर्थातच यासाठी वरतून त्याला चित्रित करावे लागणार होते.

सुरेंद्रनाथ यांनी थेट भारतीय हवाईदलाच्या एयर चीफ मार्शलची भेट घेतली. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ताजमहालावरून विमान उडवण्याचीही परवानगी मागितली. या प्रकल्पाचे महत्व ओळखून तेही तयार झाले. त्यांनी सुरेंद्रनाथ याना ताजमहालावरून विमान उडवण्याचीही परवानगी दिली. त्याबरोबरच एयर फोर्सचे एक हेलिकॉप्टरसुद्धा देऊ केले.

ताजमहालाच्या सर्वात जवळ पोचलेले हवाई यंत्र असा त्याचा उल्लेख केला जातो. त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही याची परवानगी कुणालाच दिली गेली नाही.

दुर्दैवाने या घटनांनंतर त्या हेलिकॉप्टरचा पायलट ऑफिसर चांगलाच अडचणीत आला होता. पण कैलाश सुरेंद्रनाथ यांनी स्वतः त्या हेलिकॉप्टरचा सर्व खर्च केला आणि हे फुटेज जाहिरातीत वापरण्यात ते यशस्वी  ठरले.

भारतातली पहिली आणि तेव्हाची एकमेव कोलकाता मेट्रो यात दाखवण्यात आली होती. आत्ता ९० वर्षे पूर्ण केलेल्या पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचाही दृश्यात समावेश केला होता.

यातले धबधबे लिरिल साबणाच्या जाहिरातीत वापरलेले होते. सहा महिन्यांच्या काळात कैलाश देशातील अनेक राज्ये, स्थळे आणि जागा फिरून फुटेज घेण्यात आणि लोकांना भेटण्यात बिझी राहिले.

नंतरच्या काळात याचे संगीत कुणी दिलं यावरून भीमसेन जोशी यांचे पुत्र जयंत आणि अशोक पत्की यांच्यात वादही झाला होता. पत्की यांनी याचे संगीत देणाऱ्यांमध्ये मी एक होतो असा दावा केला होता.

“पत्की केवळ अरेंजमेंटच्या कामासाठी तिथं होते” असं जयंत यांनी लिहून ठेवलं आहे.

नंतरच्या काळातही असे गाणे बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले, देशातल्या कितिक कलाकारांना सोबत घेऊन रेकॉर्ड बनवण्याचे किंवा यापेक्षा पैसा खर्च करून प्रचंड मेहनतीने लोकांनी गाणी बनवली.

पण ”मिले सूर मेरा तुम्हारा’ एवढी प्रसिद्धी कुणालाच लाभली नाही. फोर्ब्स या जगातल्या आघाडीच्या मासिकानेही याची नोंद घेतली आहे.

 

 हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.