अजय देवगणच्याही आधी विमलचे सगळ्यात पहिले ब्रँड अँबॅसिडर मिलिंद गुणाजी होते

आजच्या काळातले समाज माध्यमांवर वावरणारे सो कॉल्ड vlogger म्हणून मिरवणारे लोकं एका बाजूला आणि सह्याद्रीची भटकंती करून मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मिलिंद गुणाजी एका बाजूला. महाराष्ट्रातील दुर्लक्षित गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे, सह्याद्री डोंगररांगांची सफर घडवून आणणारे मिलिंद गुणाजी प्रत्येक मराठी दुर्गप्रेमी लोकांना माहिती आहे.

त्यांचा अभिनय , त्यांचे सिनेमे आपल्याला परिचित आहेत पण त्यांची विशेषता ही होती की ज्या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका मिळायची, पण दाढी काढावी लागेल असा समोरून जेव्हा प्रस्ताव यायचा तेव्हा ते तो चित्रपट सोडून द्यायचे.

त्यांच्या या अटीमुळे बॉलीवूड्मध्ये नवीन पायंडा पडला आणि दाढी असलेले नायक येऊ लागले.

त्यांच्यामुळे बॉलीवूडला दाढीवाला नायक मिळाला. त्यांच्या या दाढी प्रकरणामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. अनेक चांगले चित्रपट त्यांच्या हातून गेले पण याबद्दल जराही पश्चाताप न बाळगता ते पुढे यशस्वी काम करत राहिले. या दाढीवाल्या अभिनेत्याबद्दल आपण जाणून घेऊया.

मिलिंद गुणाजी यांना महाविद्यालयीन काळात असताना डॉक्टर बनायची प्रचंड इच्छा होती. पण कमी गुण आल्यामुळे त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना खेळाची भयंकर आवड होती. त्यामुळे त्यांची शरीरसंपदाही उत्तम होती.

मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी मॉडेलिंग सुरु केली. मॉडेलिंगच्या दरम्यान त्यांनी  प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजध्यक्ष यांच्याकडून एक फोटोशुट करून घेतलं. गौतम राजाध्यक्ष यांनी फक्त मिलिंद गुणाजिंच फोटोशुट न करता जाहिराती बनवणाऱ्या लोकांनाही मिलिंद गुणाजींचा चेहरा सुचवला.

प्रसिध्द जाहिरातकार शंतनू शौर्य आणि मिलिंद गुणाजी यांची भेट राजाध्यक्ष यांनी करवून दिली. त्यांनी एका जाहिरातीसाठी मिलिंद गुणाजींना  निवडलं. याअगोदर शंतनू हे एक जाहिरात करत होते त्याचे मुख्य नायक शेखर कपूर होते पुढे कपूर यांनी ती जाहिरात सोडली आणि त्यांच्या जागेवर मिलिंद गुणाजींची वर्णी लागली.

या जाहिरातीत मिलिंद गुणाजींच्या बिअर्ड लुकची चांगलीच चर्चा झाली आणि ती लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली.

मॉडेलिंगच्या क्षेत्रात त्यांचा चांगलाच बोलबाला होता. मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत ते झळकू लागले. अजय देवगणच्या आधी आणि सगळ्यात पहिले विमल या ब्रांडचे मॉडेल मिलिंद गुणाजी होते.

नटराज स्टुडिओत एक जाहिरात शूट करत असताना मिलिंद गुणाजींना प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी पाहिलं आणि थेट चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा मिलिंद गुणाजींनी नम्रपणे सांगितले की मी मॉडेलिंग करतो अभिनय मला जमत नाही.

गोविंद निहलानी त्यांना नाटककार सत्यदेव दुबे यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवायला पाठवलं. सहा महिने मिलिंद गुणाजींनी दुबेंबरोबर थेटर शिकले. जेव्हा गुणाजी थेटर करत होते तेव्हाच त्यांना कुरुक्षेत्र या  टीव्ही मालिकेत काम करण्यासाठी साइन करण्यात आलं.  द्रोह काल या त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटातून त्यांचं बरच कौतुक झालं पण चित्रपट तितका चालला नाही.

मिलिंद गुणाजींच्या नावाचं वलय निर्माण झालं ते महेश भट्ट यांच्या फरेब या चित्रपटातून.   त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांनी चांगल्याच डोक्यावर घेतल्या.

या चित्रपटातील ए तेरी आंखे झुकी झुकी या गाण्याने मिलिंद गुणाजी घराघरात पोहचले.

१९९०च्या सुमारास चित्रपटातील नायक हा क्लीन शेव्ह मध्ये असायचा पण मिलिंद गुणाजींचा दाढीवाला लुक सगळ्यांनाच भावला. छोट्या पडद्यावर मिलिंद गुणाजी तुफ्फान लोकप्रिय होते. दाढीवर त्यांचं इतकं प्रेम होतं की कुठल्याही परिस्थितीत ते दाढी काढायला तयार नव्हते भले मग तो सिनेमा कितीही मोठा असो.

अशातच त्यांना दिलवाले दुल्हनिया हा चित्रपट ऑफर झाला त्यातली परमीत सेठीने केलेली भूमिका त्यांना ऑफर झाली होती पण दिग्दर्शकाची अट होती की क्लीन शेव्ह हवी त्यामुळे मिलिंद गुणाजींनी ती भूमिका नाकारली. दिलजले चित्रपटात सुद्धा त्यांचा रोल क्लीन शेव्ह न करण्याच्या निर्णयामुळे गेला.

विरासत आणि गॉडमदर  या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयाचा प्रत्यय आला.

२००२मध्ये मध्ये भन्साळींनी त्यांना देवदाससाठी निवडलं आणि त्या संधीचं गुणाजींनी सोनं केलं. मराठी दाक्षिणात्य भाषेतही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. महाराष्ट्रातील बापू बिरू वाटेगावकर ह्या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीत मोलाची भर टाकली.

उत्तम फोटोग्राफर आणि भटकंतीची आवड असलेला हा माणूस छोट्या पडद्यावर आजही लोकप्रिय आहे.

उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक गडकिल्ल्यांची छायाचित्रे टिपली आहेत. ते उत्तम BLOGGER देखील आहेत. भटकंती आणि प्रवास या विषयावर मिलिंद गुणाजींनी बारा पुस्तकं लिहिली आहेत यातून ते एक उत्तम लेखक असल्याचही कळत. हा दाढीवाला हिरो अजूनही आपली लोकप्रियता टिकवून रसिकांच्या मनावर राज्य करतोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.