नार्वेकरांना बालाजी पावला पण याचा सेनेला राजकीय फायदा होऊ शकतो का ?
देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान कोणतं असं विचारलं तर डोळ्यासमोर उभे राहतील आंध्रातले तिरुमला तिरुपती बालाजी. आणि आता याच तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना नियुक्त करण्यात आलं आहे.
हि यादी काल आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. या यादीत महाराष्ट्रातून नार्वेकरांनी आपलं स्थान निश्चित करण्यामागे मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोन होता.
तर,
संबंध भारतातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाच्या ट्रस्ट मध्ये सदस्यपदाच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. यावर प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.आता महाराष्ट्रातून नियुक्ती करायची म्हंटल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांना फोन केला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.
त्याप्रमाणे आंध्र सरकारने काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नव्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या खांद्यावर आधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. मग त्यात आणि आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.
आता याचा सेनेला काय फायदा होणार ?
मीडियाच्याही ब्लॅक लिस्टमध्येच असलेले, राज ठाकरेंपासून ते नारायण राणेंनी मस्त काळ्या रंगात रंगवलेले, या सगळ्यामुळे आज कुणाची इच्छा असो अगर नसो, हे मिलिंद नार्वेकर महाराष्ट्राच्या ओळखीचे बनलेले आहेत.
नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचलेले नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या गळ्यातले ताईत बनले. आजवर अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडणाऱ्या नार्वेकरांना विधानपरिषदेवर पाठवायला हवं, अशी चर्चा चालू होती. पण आजवर त्यांना आमदार काही होता आलं नाही. कदाचित हे मानाचं पद देऊन दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न असावा.
दुसरं म्हणजे वायएसआर काँग्रेसशी जवळीक साधण्यासाठी पण हा प्रयत्न असू शकतो. सगळ्यांनाच माहित आहे कि, भाजपशी सत्तेच्या वाटाघाटी असो नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन सेनेच्या पदरात मुख्यमंत्री पद पाडून घेणं असो, सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणून मिलिंद नार्वेकरांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सेनेचे चाणक्य असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना हे पद देऊन सेनेचा देशपातळीवर ऍक्टिव्ह होण्यासाठीचा हा प्रयोग असू शकतो.
नाहीतरी सेनेचे सचिव झाल्यापासून नार्वेकरांना बरीच काम असतील. ते कशाला घेतील एवढं मोठं मानाचं पद. नाही का..?
हे ही वाच भिडू
- किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर असलेले महाविकास आघाडीचे ११ नेते
- उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन पक्ष सोडलेले पहिले शिवसैनिक म्हणजे भास्कर जाधव
- २६ वर्षांपूर्वी शाखाप्रमुख व्हायचं स्वप्न घेवून मातोश्रीवर आलेला पोरगा पुढे खास माणूस झाला