कोल्हापुरातल्या पीराच्या मिरवणुकीला वाजतो मिल्ट्रीचा बँड !

कोल्हापूर हे कायमच पुरोगामित्वाचा वारसा जपताना दिसत. त्याच प्रतिबिंब इथल्या चालीरीतींमध्ये उमटलं आहे. आणि विशेष म्हणजे कोल्हापूरकरांनीही आपल्या या चालीरीती अत्यंत प्राणपणानं जपल्या आहेत.

आता याच उदाहरण द्यायचं झालं तर मोहरम आणि गणपतीचा सण. हिंदू आणि मुस्लिम भाविकांचा एकत्रित सहभाग कोल्हापुरातील मोहरमचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरातील मोहरमला किमान २०० ते ३०० वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे, असे जाणकारांचे मत आहे.

मुस्लिम धर्मात मोहरम हा दु:खाचा सण मानला जातो. हसन आणि हुसैन यांच्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे मोहरम. मोहरम महिन्याचे पहिले दहा दिवस हा सण असतो. अन्य ठिकाणी ताबूत किंवा ताझीया बसवण्याची पद्धत आहे, तर कोल्हापुरात पंजे बसवले जातात. या पंजांना मुस्लिम वल्लींची नावे दिलेली असतात.

पण कोल्हापुरच्या मोहरमची बरीच वैशिष्ट्ये सांगता येतील. विशेष करुन शाहू महाराजांनी अनेक पंजांना मदत केल्याचे दस्त कोल्हापुरात सापडतील. बाबुजमाल तालमीचा नाल्या हैदर कलंदर पंजा सध्याच्या ठिकाणी आणण्यासाठी खुद्द शाहू महाराज आले असल्याचं सांगितले जाते.

या पंजाला किनक्वॉब म्हणून जे कापड वापरले जाते ते शाहू महाराजांनी भेट दिलेले आहे. तसेच पंजा जेथे बसतो तेथील शोभच्या हंड्यादेखील शाहूकालीन आहेत. घुडणपीर दर्ग्यांतील अलीझुल्फीकार पंजाचे किनक्वॉब देखील शाहू महाराजांनी दिलेले आहे. भवानी मंडपातल एका कमानित वाळव्याची स्वारी नावाने पंजा आणि ताबूत बसवतात.

शाहू महाराजांनी या पंजाच्या मानकऱ्यांना काय मदत हवी का ? अशी विचारणा केली होती, पण पंजाच्या मानकऱ्यांनी कसलीही मदत न मागता ताबूताला पालखीचा मान मागितला.

आजही या ताबुताला राजघराण्याकडून पालखीचा मान देण्यात येतो. टी. ए. बटालियन येथील हजरत पिरानेपीर मेहबूब सुबहाणी दर्ग्यातील पंजाला टी. ए. बटालियनच्या वतीने सलामी देण्याची पद्धत आहे. तर लाइन बाजार येथील पंजाला पोलिसांची सलामी असते. म्हणजे मिल्ट्रीच्या बटालियन द्वारे या दर्ग्याला सलामी देण्याची परंपरा ब्रिटिशकालीन आहे. आणि आजसुद्धा ही परंपरा कोल्हापुरात जपली आहे. 

कोल्हापुरात जवळपास सर्वच तालीमत  पंजे बसवले जातात. पूर्वी बत्त्या आणि माशालींच्या उजेडात पंजे भेटींच्या मिरवणुका निघायच्या. १९६० च्या दशकात मोहरममध्ये जुना बुधवार पेठ परिसरात एका कार्यकर्त्याचा खून करण्याचा प्रकार झाला होता, त्यानंतर मात्र मिरवणुकीत मशालींच्या वापरावर निर्बंध येत गेले.

मिरवणुकीत पूर्वी झरपांचा खेळ सादर केला जायचा. हा खेळ सादर करणारे तीक्ष्ण शस्त्रांनी अंगावर वार करून घेतले जात. ही प्रथा कोल्हापुरातून बंद झालेली आहे. कत्तल रात्रीला खाई फोडण्याचा कार्यक्रम मात्र पारंपरिक पद्धतीने आजही बाबूजमाल, बाराईमाम अशा ठिकाणी होत असतात. पंजांच्या मिरवणुकीमध्ये आता आधुनिक साऊंड सीस्ट‌िम येत असल्यातरी ताशांच्या गजर आणि अबिराच्या उधळणीशिवाय मिरवणूक निघत नाही. कत्तल रात्री पंजानजीक मलिदा आणि सबज्याच्या बियांचे सरबत वितरीत करण्याची पद्धत आजही आहे.

असं हे कोल्हापूर जिथं मोहरम सण नक्की कुणाचा हे कळूनच येत नाही. अगदी हिंदू आणि मुस्लिम हे शब्दसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणून तर कोल्हापूर खास आहे आणि कोल्हापूरकरांच्या प्रथा सुद्धा.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.