कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी आता सैन्य देखील मैदानातं उतरणार आहे….

देशाच्या सीमांच रक्षण करणं असो की, देशांतर्गत आलेल्या कोणत्याही संकटाचा सामना. सैन्यदल, हवाई दल, नौदल ही भारताची तिन्ही संरक्षण दल आपल्या जबाबदारीपासून कधीच मागे हटत नाहीत. अगदी कच्छचा भुकंप असो की कोल्हापूरचा महापूर, जम्मू – काश्मिरच संरक्षण असो की नेपाळचा भुकंप. प्रत्येक ठिकाणी मिलीटरीनं अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

आता देखील देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मिलीटरीला पाचारण करण्याबद्दल चर्चा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांच्यामध्ये काल या संदर्भात अधिकृत बैठक देखील पार पडली. मागच्या आठड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सैन्याची मदत मागितली होती.

मात्र आता मुख्य प्रश्न असा की संरक्षण दल या आरोग्य आणीबाणीमध्ये नक्की काय आणि कशी जबाबदारी पार पाडणार आहे?

तर जबाबदारी काय पार पाडणार हे अजून अधिकृतरित्या जाहिर झालेलं नसलं तरी सैन्य या परिस्थितीमध्ये नेमकी काय काय भुमिका पार पाडू शकते याचा घेतलेला हा आढावा…

१. हॉस्पिटल सुविधा 

सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्या तरी सैन्यानं कसल्याही आमंत्रणाची वाट न बघता या आधीच संकटाचा सामना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी चर्चा करुन त्यांना काही सुचना दिल्या आहेत. ज्यात राज्यांच्या राजधान्यांमध्ये उपस्थित असलेल्या सैन्याच्या टॉप कंमांडरनी संबंधित मुख्यमंत्र्यांना जी काही मदत हवी असेल ती केली जावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार सैन्याकडून रुग्णांना क्वारंटाईन होण्यासाठी आपल्या मिलीटरी हॉस्पिटल्समध्ये आणि कंटेनमेंट झोनच्या बाहेर देखील तयारी सुरु करण्यात आली आहे.

याचाच एक भाग म्हणून २२ एप्रिल पासून दिल्ली स्थित हॉस्पिटलला कोव्हिड केअर सेंटरमध्ये बदलवण्यात आलं आहे. इथं ऑक्सिजन सुविधा असलेल्या जवळपास २५८ बेड्सवरती रुग्ण दाखल पण करुन घेण्यात आले आहेत. सोबतचं दिल्लीत सामान्य लोकांसाठी १००० बेड्सच आर्मी हॉस्पिटल सुरु करण्यात आलं आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सुदर्शन चक्र कोर कमांडर अतुल्य सोळंकी आणि ब्रिगेडियर आशुतोष शुक्ला यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात सैन्याच्या हॉस्पिटल आणि आयसोलेशन केंद्रांमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार सुरु झाले आहेत. त्यासाठी सैन्यानं भोपाळमध्ये १५० बेड, जबलपूरमध्ये १०० बेड, सागरमध्ये ४० आणि ग्वालियरमध्ये ४० बेडची व्यवस्था केली आहे.

मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सैन्याची मदत घेण्याचा विचार सुरु होता तेव्हा सैन्यांकडून तब्बल ९ हजार बेड तयार ठेवण्यात आले होते, आणि गरज पडली तर त्या सुविधांना दुप्पट-तिप्पट वाढवण्याची तयारी असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. त्यावेळी सैन्यप्रमुख नरावणेंनी सांगितलं होतं की, त्यांच्याजवळं ‘६ तासांचा’ प्लॅन तयार आहे.

त्यामध्ये तात्काळ आयसोलेशन सेंटर्स आणि आयसीयु बेडची साखळी तयार केली जावू शकते.

२. मेडिकल साधन 

एका वरिष्ठ निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,

मेडिकल उपकरणं आणि साधनांसाठी सैन्यांचं डिफेंस पब्लिक सेक्टर युनिट आवश्यक मेडिकल उपकरणांचं उत्पादन करु शकते. हे उत्पादन करण्यासाठी आर्म्ड कोरच्या फॅक्टरी तात्काळ तयार केल्या जावू शकतात. त्यामध्ये कसलीही कमतरता राहणार नाही.

३. मॅनपॉवर

तिसरी गोष्ट म्हणजे मॅनपॉवर देण्यासाठी देखील सैन्य तयार आहे. सैन्याकडे एनसीसीच्या २५ हजार कॅडेडट्सची तयार मॅन पॉवर छोट्या – छोट्या संख्येनं जवळपास प्रत्येक छोट्या – मोठ्या शहरात उपलब्ध आहे. ज्यांना आपात्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी तैनात करता येवू शकते. मागच्या वर्षी देखील या कॅडेट्सना अशा परिस्थितीत मदतीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

या सोबतचं काल पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेनंतर बिपीन रावत यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,

सैन्याचे साडे आठ हजारहून अधिक डॉक्टर्स, हजारो नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल स्टाफला देशभरात तैनात केलं जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं नौदल आणि हवाई दलातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयात सेवेत घेण्यात येणार आहे.

हे सगळे डॉक्टर्स आणि नर्सेस म्हणजे कोरोनाशी लढण्यासाठी पुर्णतः ट्रेंड अशी मॅनपॉवर आहे. या सोबतचं सैन्यातुन निवृत्त झालेले डॉक्टर्स आणि नर्सेस यांची संख्या देखील मोठी आहे. त्यांना देखील ते वास्तव्याला असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या कोविड-१९ उपचार केंद्रात काम करण्यासाठी पाचारण करण्यात येणार असल्याचं रावत यांनी सांगितलं आहे.

मागच्या वर्षी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरोग्य सेवकांना आवाहन देखील केलं होतं. तेव्हा त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

४. वाहतूक

गतवर्षी एअरफोर्सनं मेडिकल कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याची कामगिरी पार पाडली होती. सोबतचं जम्मू-कश्मीर, लडाख, मणिपुर आणि नागालँड इथल्या दुर्गम भागात मेडिकल साधनं सप्लाई केली होती. यात पीपीई किट, हॅन्ड सॅनिटायझर्स, ग्लव्ह्ज, सॅनिटायझर्स अशा वस्तुंचा समावेश होता.

या वर्षी हवाई दल एक पाऊल पुढे आहे. हवाई दलाने यंदा जीव जगवण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या ऑक्सिजनची वाहतुक केली आहे.

हवाई दलाचं सी-१७ हे विमान शनिवारी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हिंडन विमानतळावरून पुण्यात दाखल झाले. या विमानात दोन रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढवण्यात आले आणि पुणे विमानतळावरून हे विमान जामनगरला रवाना झालं. हे दोन टँकर जामनगरला पोहचवून हे विमान पुन्हा पुण्यात आले. दुसरी फेरी करून आणखी दोन ऑक्सिजन टँकर जामनगरला पोहोचवण्यात आले.

सोबतच लडाखच्या दुर्गम भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केलेलं साहित्य हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टर आणि एएन ३२ मालवाहतूक विमानातून पोहचविण्यात आलं आहे. जम्मूमधून लेह आणि कारगिलसाठी बायो सेफ्टी कॅबिनेट्स, सेंट्रिफ्युजेस आणि स्टॅबिलायजर्स असे कोरोना चाचणीचे साहित्य पोहोचविण्यात आलं.

यासोबतच हवाई दलाच्या सी-१७ विमानानं पहाटे दोन वाजता हिंडन विमानतळावरून सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार ऑक्सिजन कंटेनर आणण्यात आले. हे कंटेनर पश्चिम बंगालमधील पानागढ हवाई तळावर उतरविण्यात आले.

गतवर्षीचा आणि या वर्षीचा सैन्यानं कोरोना विरुद्धच युद्ध जिंकण्यासाठी केलेली मदत बघितल्यास नक्कीच आपण हे युद्ध जिंकू शकतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.