पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी दिले नाव ” अपशिंगे मिलिटरी”

सातारा सोडून कराडच्या दिशेने हायवेवरुन १४ किलोमिटर पुढे आले की उजव्या बाजूला बोरगाव रोड लागतो. तिथून ४ किलोमिटर आत गेले की ‘ग्रामपंचायत अपशिंगे मिलीटरी’ अशी भली भोठी कमान आपले सहर्ष स्वागत करते.

सामान्यपणे आपल्याकडे खुर्द, बुद्रुक आणि तर्फ या नावाने गावांना ओळखतात. पण सातारा जिल्ह्यातील अपशिंगेला मिलीटरीच्या नावान ओळखतात. अगदी शासकीय कामकाजात सुद्धा.

पर्यटन, ऐतिहासिक वास्तू अशा कारणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या जिल्ह्यात अपशिंगे मिलीटरी हे गाव लढाऊ बाणा आणि देशसेवेच्या व्रताच प्रतिक आहे.

८५० कुटुंब असलेल्या या गावची लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. यापैकी आता सध्या ४५० पेक्षा जास्त भारतीय सैन्यात सेवा देत आहेत. सोबतच सीआरपीएफ मध्येही ४० जवान कार्यरत आहेत. तर ८०० पेक्षा जास्त आजी – माजी सैनिक आहेत. म्हणजे निम्मा गाव रणभुमी गाजवून आला आहे, तर काही जण अजून ही गाजवत आहेत.

गावाला नाव कसे मिळाले?

आपशिंगे या गावाच ‘अपशिंगे मिलिटरी’ असे नामकरण करण्यामागे पहिल्या महायुद्धादरम्यानचा इतिहास आहे. १९१४ ते १९१९ या काळात गावातील तब्बल ४६ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

त्यामुळे तत्कालिन ब्रिटिश सरकारने या गावाला आपशिंगे मिलिटरी असा विषेश सन्मान देवून त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. पुढे स्वातंत्र्यापुर्वीच्या सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावातील ४ जवान सामिल झाले होते.

स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक युद्धात सहभागी :

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६२ साली चीनविरुद्ध झालेल्या युद्धात या गावातील ४ जवान शहीद झाले होते. तर, १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात अपशिंग्यातील २ जवांनानी आपल्या प्राण दिला होता. त्यानंतर १९७१ च्या युद्धात ही एका जवानाने आपले प्राण अर्पण केले होते.

प्रत्येक कुटुंबातील एक जण सैन्यात :

अपशिंगेतील तरुणांच्या रक्तातच देशसेवा असली तरी इथल्या लहानग्यांना गावातीलच निवृत्त झालेल्या जवानांकडून लहानपणापासूनच आर्मीचे डोस मिळतात.
याची सुरुवात शाळेपासूनच होते.

गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्येच मुलांना परेड, ड्रिल यांचा अभ्यास शिकवला जातो. त्यातुनच सैन्य प्रेम, सैन्य शिस्त या गोष्टी आपोआप अंगी भिनतात. त्यामुळेच इथल्या प्रत्येक कुटुंबातील एक तरी जण सैन्यात आहेच.

याच उदाहरण म्हणजे गावात रमेश निकम यांचे कुटूंबीय.

या कुटूंबातील आतापर्यंत जवळपास १० जवान सैन्यात होते. तर ६ जण अजून ही कार्यरत आहेत. म्हणजेच या गावात अशीही काही कुटूंब आहेत जी संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब सैन्यात सामिल आहेत. त्यांच्या वडिलांनी आणि चार काकांनी मिळून ही प्रथा सुरु केली.

गावातील शहीद जवानांसाठी स्मारक :

अपशिंगेमधील ज्या जवानांना देश सेवा बजावताना वीरमरण आले. त्या सर्व शहीद जवानांच्या कार्याचा गौरव आणि आठवण म्हणून एक स्मारक बांधले आहे. या स्मारकावर लढताना शहीद झालेल्या प्रत्येक जवानाचे नाव लिहीले आहे.

त्यामध्ये तायबुबी इनाम शेख आणि मालन प्रल्हाद निकम या दोन महिलांचाही समावेश आहे. त्याचे नाव स्मारकावर लिहिण्यामागे एक कारण म्हणजे, या दोघींचेही पती सैन्यात सामिल होते. पण १९६२ साली चीन युद्धात त्यांनी आपल्या पतींना गमावले. म्हणूनच या वीरपत्नींची नावे या स्मारकावर कोरण्यात आली आहेत. एकूणच सैनिकाच्या मृत्यु नंतरही त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला महत्व दिले जाते.

गावातील बाप-लेक दोघे ही चीनच्या ताब्यात अडकले होते :

१९६२ च्या चीनच्या युद्धात चीनच्या सैनिकांनी हिंदुराव पाटील यांना पकडून नेले. जवळपास २ वर्ष ते चीनमध्ये बंदिस्त होते. युद्धादरम्यान ते हरवले असल्याची तार त्यांच्या कुटूंबाकडे आली. साहजिकच घरचे प्रचंड खचले.

कारण यापुर्वी हिंदुराव यांच्या वडिलांनाही चीन सैनिकांनी बंदिस्त करून ठेवलं होते, जे पुढे केव्हाच भारतात परतले नाहीत.

त्यामुळे हिंदुरावांच्या बाबतीत देखील हिच भिती मनात होती. पण १९६३ साली एक यादी बाहेर आली. या यादीमध्ये नाव असलेल्यांना भारतात परत सोडण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. सुदैवाने या यादीत हिंदुराव यांचे नाव होते. १९६४ साली चीनच्या सरकारने त्यांना सोडले आणि ते गावात परतले.

आजची काय परिस्थिती ?

पहिल्या महायुद्धातील लढ्यानंतर गावाला अपशिंगे मिलीटरी हे नामकरण झाले. या गोष्टीला आता जवळपास शंभर वर्षे लोटली आहेत न् चौथी पिढी हयात आहे. पण गावातील नव्या पिढीने देशसेवेची ही परंपरा त्याच अभिमानाने जपली आहे आणि वाढवली आहे.

आज जवळपास गावची लोकसंख्या सहा हजारांच्या घरात गेली आहे. त्यापैकी ५०० पेक्षा जास्त जण आज सैन्यांत मराठा रेजीमेंट, महार रेजीमेंट, इंजीनियर रेजीमेंट, मद्रास रेजीमेंट, सीआरपीएफ अशा वेगवेगळ्या रेजीमेंटमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

गावातील अनेक घर अशी आहेत जिथल्या महिलांनी अनेक वेळा आपला कर्ता पुरुष गमावला आहे.

मागील वर्षी पुलवामा इथे सीआरपीएफच्या बस वर झालेल्या हल्ल्यानंतर गावात पाकिस्तान विरोधात संतापजनक वातावरण तर होतेच. पण काळजीने संपुर्ण गाव सुन्न झाले होते. कारण गावातील ४० जण सीआरपीएफमध्ये सेवा बजावत आहेत.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.