औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेवून ओवैसींना नेमकं काय सिद्ध करायचं आहे…?

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर गेले. दौऱ्यावर असतांना त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला अन साहजिकच नव्या वादाला तोंड फुटलं..

हिंदू महासंघाने तर औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवाल करत कबर हटवण्याची मागणी केलीय. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवैसींवर टीका करतांना असं म्हंटलंय की, वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे अशी टीका राऊत यांनी केली. 

त्यावर खासदार इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे कि, 

“खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये.” 

पण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घ्यायचा रीतिरिवाज नाही. 

मग मुद्दा येतो तो म्हणजे औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकवून ओवैसींना या नेमकं काय सिद्ध करायचंय ????  

तर त्यामागे ४ अशी राजकीय कारणं आहेत ज्यासाठी हा सगळा उठाठेव चाललाय..

१ ) त्यातलं पहिलं कारण म्हणजे, येत्या महानगरपालिकेच्या निवडणूका.

औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या लवकरच निवडणूक लागणार आहेत.

औरंगाबाद हे असं शहर जे मुस्लिम आणि हिंदुत्त्वाच्या राजकारणाचं केंद्र राहिलंय..इथे जेवढी शिवसेना स्ट्रॉंग आहे तितकीच MIM स्ट्रॉंग आहे. MIM ची इथली ताकद पाहिली तर पक्ष २०१० ला शून्य होता. मात्र तेच २०१५ च्या महानगपालिका निवडणुकीत त्यांचे २५ नगरसेवक निवडून आले होते.  शिवसेनेनंतर MIM च्याच जागा जास्त होत्या.

२०१९ ची  निवडणूक मात्र झाली नाही आणि गेली २ वर्षे झालीत इथे प्रशासक नेमला आहे…सोबतच राज्यभरातील इतर महानगरपालिकेत देखील मुस्लीम मतांचा आकडा महत्वाचा ठरणार आहे.

कारण राज ठाकरेंसह भाजपच्या हिंदूत्ववादी धोरणातून असुरक्षित झालेले मुस्लीम मतदार जोडून घेण्याचं धोरण MIM चं राहणार आहे. आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराचे संस्थेच्या लवकरात लवकर निवडणूक होणार आहेत त्याचीच तयारी म्हणून हे धार्मिक मुद्दे निर्माण केले जात आहेत.

२) दुसरं कारण आहे ते म्हणजे राज्यात अलीकडे जी हिंदूत्वाची धार वाढली त्याला काऊंटर करायला मुस्लिम धार्जिणं राजकारण करणं..

थोडक्यात जसं कि आपण गेली १ महिना झालं पाहतोय राज ठाकरेंनी उपस्थित केलेले हिंदुत्ववादी मुद्दे जे हिंदू व्होट बँक ला आकर्षित करणारे ठरलेत..ज्याचे परिणाम येत्या निवडणुकीत आपल्याला दिसूनच येतील अस बोललं जातय..

हाच धागा हाताशी पकडून मुस्लिम पक्ष असणारा MIM हे सिद्ध करू पाहतोय कि राज्यात जी हिंदूत्वाची धार वाढली त्याला काऊंटर भाषेत करायची मुस्लिम धार्जिणं राजकारण करणं गरजेचं आहे..

३) तिसरं कारण म्हणजे MIM वर जी टीका होते कि, MIM हा बीजेपीची बी टीम आहे. कारण त्यांच्यावर कायम आरोप होत असतो कि भाजप MIM मुळेच जिंकते..

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती. या हे दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे राज्यतल्या ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. आणि या लोकसभा निवडणुकीत या युतीने सुमारे ४१ लाख मते मिळवली होती, जी राज्यातील एकूण मतदानाच्या १४ % इतकी होती. 

पण यामुळे झालं असं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जे काही मुस्लिम आणि दलित मतं होती त्याचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा थेट भाजपला झाला…

४) वंचितसोबतच्या प्रयोगानंतर दलित मुस्लिम ऐवजी फक्त मुस्लीम म्हणून MIM पक्ष समोर येतोय..

जसं कि आपण बोललो वंचित बहुजन आघाडी आणि MIM मध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मध्ये युती झाली होती. तेंव्हा या दोन्ही पक्षांनी एकत्रित प्रचार केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असुदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या टोलेजंग सभाही झाल्या होत्या.  

या युतीमुळे या निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदार त्यातल्या त्यात दलित मुस्लिम या निवडणुकीत एकत्र आले होते. वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला.

मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं होतं कि, आम्हाला MIM चा फायदा झाला नाही उलट आमच्यामुळे एक खासदार निवडून आला…याच वादात दोन्ही पक्षांची युती तुटली. 

त्यानंतर २०१९ ची विधानसभा दोन्ही एकटे एकटे लढले त्यात एमआयएम ला दोन जागा मिळाल्या होत्या.  वंचितसोबतच्या प्रयोगानंतर दलित मुस्लिम ऐवजी आता फक्त कोअर मुस्लिम व्होट मिळवायच्या नादात, MIM च्या नेत्यांकडून औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकवण्याच्या कृती केल्या जातायेत असं बोललं जातंय..

MIM खेळत असलेल्या राजकारणावर बोल भिडूशी बोलतांना  भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली कि, 

“औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरूद्दीन ओवैसी वर तात्काळ FIR दाखल केली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करायला हवी. अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे औरंगजेबाला मोठं करण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या २ वर्षांत आपण पाहिल तर शारजील उस्मानी हिंदू समाजाबाबत बरळला त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो उमर खालिद CAA विरोधात बोलला त्याचं भाषण दिल्ली उच्च न्यायालयाने भडकावू असल्याचं सांगितलं पण आपल्या सरकारने काही कारवाई केली नाही. त्यामुळे आता अकबुरूद्दीन औवेसी सारख्या माणसाला तात्काळ जेलमध्ये टाकायला हवं”, अशी भाजपची भूमिका असल्याचं भातखळकर यांनी स्पष्ट केलं..

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत बोल भिडूशी बोलतांना अशी प्रतिक्रिया देतात की, 

“कुणाच्या कबरीवर कुणी जावं हा ज्याने त्याने ठरवावं, ओवैसी कोणत्या विचारांचे आहेत हे जनतेला माहिती आहे, त्याचा निर्णय जनता घेईल…पण प्रश्न हा आहे की, भाजप नेते ज्या प्रकारे ओवेसींवर कारवाईची मागणी करतायेत ते कोणत्या कलामांच्या आधारे करतायेत? याचं त्यांनी मार्गदर्शन करावं”.

“भाजपने हेही सांगावं की, जेंव्हा अडवाणी हे मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर गेले होते तेंव्हा यांच्यावर कोणत्या कलामांच्या आधारावर भाजपने कारवाई केली होती”? 

सावंत पुढे म्हणतात, “शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ‘मरणांती वैराणी’हाच विचार आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूची अफजलखानाची देखील कबर बांधली आणि त्याच्या निगराणीची देखील सोया करून ठेवली होती हे विसरता काम नये आणि भाजपची जी विकृत विचारधारा आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे”.  

तसेच याबाबत बोल भिडूने काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली. 

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात कि, 

“MIM ने आधी वंचित आघाडीशी युती करून, सोशल इंजिनिअरिंग करून आपला एक खासदार निवडून आणला. आता गेल्या काही काळात एकीकडे हिंदुत्वाचं राजकारण सुरु असतांना दुसरीकडे मुस्लिम मतांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न MIM चा चालूये. कारण दुसरा कोणता व्होट बेसच MIM कडे नाहीये. त्यामुळे अल्पसंख्यांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याचा  प्रयत्न चालूये आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून या कालपरवाच्या घटनेकडे बघावं लागेल”, असं मत अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.

ओवेसींच्या कृतीबाबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे बोल भिडूशी बोलतांना सांगतात की,

“ओवेसींची कृती फार गांभीर्याने घेण्याचं कारणच नाही. ज्याप्रमाणे संघ आणि भाजपचं राजकारण हे धार्मिक ध्रुवीकरणाचं असतं त्याच राजकारणाला पूरक असं राजकारण ओवेसी करतात. औरगंजेबाच्या कबरीवर डोकं टेकवून ज्याप्रकारचं संकुचित प्रकार करून धार्मिक कट्टर मुस्लिमांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न ते करतायेत. राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप हिंदुत्वाच्या राजकारणाला चालना देत असेल तर त्यावर ओवैसींची ही प्रतिक्रिया अपेक्षित होती”.

“राजकारणाचा दर्जा घसरला आहे आणि हे सगळं राजकारण चालूये ते आजच्या काळाशी सुसंगत असं नाहीये” अशी टीका देखील करतात.  

तर या होत्या राजकीय नेत्यांच्या आणि राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया…बाकी हे प्रकरण आणखी काय वळण घेतं हे पाहून महत्वाचं आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.