ओवेसी सांगतायत, मुस्लिम बांधवानो तुम्हाला तलवार नाही पेन जिवंत ठेवेल

राज्यात एसटी आंदोलन, ड्रग्स प्रकरण, निवडणुका आणि इतर विषय जोमात सुरू आहेत. त्यात आणखी एका विषयाची भर पडली आहे तो विषय म्हणजे, मुस्लिम आरक्षण. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही पुरता निवळलेला नाही. त्यात आता मुस्लिम आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुस्लिम आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आणि आमदार इम्तियाज जलील यांनी सोलापूर येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात केलेलं भाषण. या आक्रमक भाषणात ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. शिवसेनेच्या धर्मनिरपेक्षतेवरुन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला चिमटेही काढले.

काय म्हणाले ओवेसी-

सगळ्यात आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं. ते म्हणाले, ‘मुस्लिम बांधवांनो शिवसेनेला ओळखा. यांनी फक्त सत्तेसाठी, परिवारासाठी, आपले खिसे भरण्यासाठी, आपली भ्रष्टाचाराची प्रकरणं लपवण्यासाठी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेला गाडून टाकलं आहे. भाजप आणि शिवसेनेत फरक कधीपासून निर्माण झाला? तुम्ही सत्तेपासून दूर व्हा, पुन्हा एकदा निवडणूक घ्या. तुमच्याकडे इतका पैसा तर आहे ना?’

‘इथं आमच्या विचारांची चेष्टा केली गेली. राज्यात धर्मनिरपेक्षतेला गाडून टाकलं. त्या धर्मनिरपेक्षतेच्या कबरीवर या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा महल उभा केलाय. आणि त्याच्या जोरावर ते महाराष्ट्रात सत्ता गाजवत आहेत,’ अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाही जाब विचारला. ते म्हणाले, ‘मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा दोन्ही काँग्रेस विसरल्या आहेत का? कारण आता मुस्लिम आरक्षणाची चर्चाच होत नाही. चर्चा फक्त समीर वानखेडेंची होते, ते मुसलमान आहेत का नाही याची होते. मुसलमानांना आरक्षण हवं आहे, त्याचं काय? मी उद्धव ठाकरेंना जाहीरपणे विचारतो की, महाराष्ट्रात मुस्लिमांमध्ये ५० ते ५५ जाती आहेत, त्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं का नाही?’

‘नोकरीमध्ये आरक्षणाचा कोटा वाढला, त्यामुळं तुम्ही शिक्षणात आरक्षण द्यायला हवं. ते तुम्ही का देत नाही? दोन्ही काँग्रेस यावर तोंड दाबून का बसल्या आहेत? ही या सरकारची मुस्लिमांबद्दलची आस्था आहे का?’

मुस्लिम तरुणांनो जवळ पेन ठेवा, तलवार नाही

यावेळी बोलताना ओवेसी यांनी मुस्लिम तरुणांना शिक्षणाकडे गांभीर्यानं पाहण्याचा सल्लाही दिला. ‘समोर असणाऱ्या किती लोकांच्या खिशात आत्ता पेन आहे? हाच मुस्लिमांचा प्रॉब्लेम आहे. स्वतःच्या खिशात पेन ठेवा, लिहा. हा पेनच तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार जिवंत ठेवणार नाही. महाराष्ट्रात जवळपास ११ टक्के मुस्लिम आहेत. त्यातले पदवीधर किती आहेत? तर फक्त चार टक्के,’ असं ओवेसी म्हणाले.

त्यांनी शिक्षण व्यवस्थेमधला मुस्लिमांचा ड्रॉपआऊट रेटही सांगितला. ‘सुरुवातीला प्राथमिक शाळांमध्ये मुस्लिमांचं प्रमाण २२ टक्के असलं, तर ते माध्यमिक शाळांमध्ये १३ टक्के असतं. दहावीपर्यंत आणखी एखादा टक्का घसरतो आणि तिथून पुढच्या शिक्षणात तो ७.१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. हे सगळं जाऊन फक्त ४ टक्के लोक पदवीधर होतात. त्यामुळं माझं आवाहन आहे की शिक्षणाकडे लक्ष द्या.’

आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी आणखी तीव्र करण्यासाठी आधी औरंगाबादमधून, तर आता सोलापूरमधूनही ‘चलो मुंबई’ असा नारा दिला आहे.

त्यामुळं आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण पुन्हा तापणार का? आणि शिवसेना-एमआयएममध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.