तेव्हा बाळासाहेबांनी ठरवलं, “या आपल्या लाडक्या बंगल्यात पुन्हा पाऊलदेखील ठेवायचं नाही.”
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पत्नी मीनाताई ठाकरे यांचं नातं त्यांच्या जवळच्यांना आणि शिवसैनिकांना चांगलाच माहित होतं. बाळासाहेबांच्या प्रत्येक निर्णयात मीनाताई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असायच्या. आपल्या पतीच्या स्वभावाची त्यांच्या बेधडक निर्णयाची मनात भीती जरी वाटली तरी चेहऱ्यावर मात्र एक चिंतेची आठीही त्यांनी उमटू दिली नाही.
बाळासाहेबांच्या प्रभुत्वामागे सर्वांत मोठी ताकद मीनाताईंची होती. शिवसैनिकांना मीनाताई नेहमी कुटुंबाचा हिस्सा मानत, त्यांचे बोलणे आपुलकीचे आणि जवळीकतेचे वाटायचे. मीनाताईंनी सर्व कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचे मोठे काम केले.
घरामध्ये दररोज शेकडो शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे चाहते भेटायला यायचे, मीनाताईंनी त्यांचे नेहमीच हसतखेळत स्वागत केले. कधीही कोणत्याही स्वरूपाचा तिरस्कार किंवा रागे भरण्याची घटना कोणालाही अनुभवास आली नाही.
मीनाताई सुरुवातीपासून असंख्य अडचणींना सामोरे गेल्या, बाळासाहेबांना त्यांनी सातत्याने फक्त आणि फक्त प्रोत्साहनचं दिले.
म्हणतात ना स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि आयुष्यभराची आई असते. आई म्हणून बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ह्या सर्वांवर संस्कार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य मीनाताईंनी केले. सर्वजण मीनाताईना
माँसाहेब म्हणून हाक मारायचे. कारण बाळासाहेब बाहेरचा कारभार सांभाळायचे तर मीनाताई सगळ्या कुटुंबाचा गाडा एकट्या ओढायच्या.
१९८२ मध्ये कर्जत-चौक रस्त्यावर भिलवले येथे पाझर तलावाच्या परिसरात शिवसेनाप्रमुखांचे फार्महाऊस झाले. त्या वेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांनी शिवसेनाप्रमुखांना भेट हे फार्महाउस दिलं होत. जे जवळपास साडेसहा एकरमधील ५ गुंठे क्षेत्रामध्ये आहे.
शिवसेनाप्रमुख मीनाताईंसह अनेकदा विश्रांतीसाठी त्या कर्जतच्या बंगल्यावर यायच्या. बंगला खालापूर तालुक्यामध्ये असला तरी तो कर्जतचा बंगला म्हणूनच प्रसिद्ध होता.
अश्याचं एका निवांत क्षणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंबरोबर बंगल्यावर विश्रांतीसाठी आले होते. दुपारी १२.०० वाजता शिवसेनाप्रमुखांनी मातोश्रीवर उद्धव यांच्याबरोबर बोलणे केले, तोपर्यंत त्यांची प्रकृती व्यवस्थित होती, मात्र काही वेळानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
मीनाताईंना याच बंगल्यात हृदय-विकाराचा झटका आला. आयत्यावेळी आवश्यक औषध मिळाले नाही, मीनाताईंना तातडीने पनवेल मधल्या इस्पितळात हलविण्याचे ठरविले. मात्र इस्पितळात जाण्यापूर्वीच त्यांची मीनाताईंची प्राणज्योत विझली.
त्या वेळी शिवसेनाप्रमुख भावनाप्रधान होऊन म्हणाले,
“मी अनेक लढाया जिंकल्या, परंतु ही लढाई मात्र हरलो.”
एकेकाळी बाळासाहेबांचे नेहमी जाणं -येणं असलेला हा बंगला ६ सप्टेंबर १९९६ नंतर ओस पडला. बाळासाहेब ठाकरे यांचे पत्नीवर प्रचंड प्रेम होते. मीनाताईंच्या निधनानंतरही त्यांचा फोटो कायम त्यांच्या कुर्त्याच्या खिशात असायचा. पण मांसाहेबांच्या आठवणींमुळे कर्जतच्या बंगल्यात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं होतं.
दरम्यान, २०१० साली बाळासाहेब ठाकरे एकदा या कर्जतच्या बंगल्यावर येऊन गेल्याचे समजते. बंगल्याच्या रिनोव्हेशन नंतर उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे बाळासाहेबानी कर्जत येथे भेट दिली होती. प्रकृती अस्वस्थामुळे हेलिकॉप्टरनं या बंगल्यावर आले होते. हि त्यांची भेट शेवटची ठरली.
हे ही वाचं भिडू :
- चौगुलेंची शॅंपेन बाळासाहेब ठाकरेंना देखील आवडायची..
- सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने या गोष्टींना बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं आहे
- राज ठाकरेंचं पहिलं भाषण सुरु होतं आणि बाळासाहेब ते फोन वरून ऐकत होते..