पेट्रोल-डिझेल वाढतंय आणि गडकरी म्हणतायत फ्लेक्स इंजिन आणू

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पद्धतशीर सेंच्युरी मारलीये. या सेंच्युरीचे परिणाम खाण्यापासून पार काडीपेटीपर्यंत होताना दिसतायत. पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील या आशेवर असणाऱ्या सामान्य नागरिकांना एक अंधुक का होईना पण नवी आशा दिसली आहे. जी दाखवलीये स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी.

विषय काय झालाय?

नितीन गडकरींनी बोलताना सांगितलं, ‘येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकार सगळ्या प्रकाराच्या गाड्यांना फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता पर्यायी इंधनाची गरज आहे. इथेनॉल, सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रिक हे काही उपलब्ध पर्याय आहेत. त्यापैकी इथेनॉल हा सर्वांत स्वस्त पर्याय आहे.’

आता हे फ्लेक्स फ्युएल इंजिन काय आहे?

हा प्रश्न जसा तुम्हाला पडला तसा आम्हाला पण. आता सकाळीच पेट्रोल भरून येताना पंपावरच्या फ्लेक्सचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे सगळ्यात आधी तो फ्लेक्स आठवला. पण मग जरा डिटेलमध्ये माहिती घेतली. तेव्हा लक्षात आलं की हा विषय बसला तर नक्कीच फायदा होईल.

आता फ्लेक्स फ्युएल इंजिन म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक इंधनावर चालणारं इंजिन. थोडक्यात हे इंजिन टाकलं की आपली गाडी एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर पळणार. आता अपारंपारिक इंधन म्हणजे, इथेनॉल, सीएनजी, बायो-एलएनजी आणि वीज. फ्लेक्स फ्युएल प्रत्यक्षात दोन भिन्न इंधनांचं मिश्रण आहे. याला फ्लेक्स इंधन म्हणायचं कारण म्हणजे, लवचिकता, वापरायला सोपं आणि स्वस्ताई.

फ्लेक्स फ्युएल इंजिनचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचं इंधन एकाच टाकीमध्ये साठवलं जाऊ शकतं.

बऱ्याचशा गाड्या पेट्रोल+सीएनजी अशा असतात. त्या बाय फ्युएल इंजिनवर (ज्याला दोन टाक्या असतात) चालतात. तुम्ही फ्युएल मोड बदलून पेट्रोल किंवा सीएनजी असा ठरवू शकता. फ्लेक्स फ्युएल इंजिनमध्ये एकाच टाकीत फ्लेक्स इंधन बसतं.

इथेनॉलच का?

अपारंपरिक इंधनांपैकी सर्वांत स्वस्त म्हणजे म्हणजे इथेनॉल. सध्या पेट्रोलचे दर लिटरमागे १०० रुपये पार आहेत, तर इथेनॉलचे दर आहेत ५५ रुपये लिटर. म्हणजे जवळपास निम्मी किंमत. सध्या भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता ४२६ दशलक्ष लिटर (गुळावर आधारित) आणि २५८ दशलक्ष लिटर (धान्यावर आधारित) आहे. ही क्षमता वाढवून अनुक्रमे ७६० कोटी लिटर आणि ७४० कोटी लिटर करण्याचा विचार आहे. इतक्या इथेनॉलपासून १०१६ कोटी लिटर ईबीपी (इथेनॉल आधारित पेट्रोल) तयार होईल सोबतच उर्वरित ३३४ कोटी लिटर इथेनॉल इतर कारणांसाठी वापरता येईल.

थोडक्यात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची किंमत साहजिकच परवडणारी असेल. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स फ्लेक्स फ्युएल इंजिन लाँच करण्यास तयार आहेत. जे १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉलवर चालेल सोबतच युरो-VI- उत्सर्जन मापदंडांचे पालनही करेल. टीव्हीएस आणि बजाजही इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाक्या बनवायला तयार आहेत, अशी माहिती गडकरींनी दिली.

प्रदूषण, उपलब्धता आणि परवडणारी किंमत हे मुद्दे आहेतच, पण या इंजिनमुळे गाड्या पण एकदम मक्खन चालणार असा अंदाज आहे.

आता हे इंजिन येईल तेव्हा येईल, तोवर तरी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हावेत अशीच सर्वसामान्य माणसांना आशा आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.