मोदींना देखील एक पाऊल मागं घ्यायला लावत दानवेंनी मंत्रिपद राखलं..

प्रधानमंत्रीकी अगली बारी ..अटल बिहारी.

रावसाहेब दानवे तेंव्हा कार्यकर्ते सोबत घेऊन घोषणा देत होते. अटलबिहारी वाजपेयी यांचं आगमन झालं. दानवे आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणा दिली. प्रधानमंत्रीकी अगली बारी..अटल बिहारी. अटलजीनी रावसाहेब दानवेना सांगितलं निवडणूक आलीय. आता अगली बारी नहीं. अबकी बारी म्हणा. रावसाहेब दानवेंनी चूक सुधारली. अबकी बारी म्हणू लागले.

हे किस्से दानवेच सांगत असतात. आपल्या चुका, आपलं गावरान असणं, आपल्याला इंगजी न येणं हे दानवेंचे भाषणातले मुख्य विषय.

लोक हसतात हे त्यांना माहित आहे. दानवेंनी एवढी वर्षं सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तर लोकांना हसवलं. गप्पा मारून खुश ठेवलं. आणि केवळ एवढ्या भांडवलावर जालना मतदारसंघ ताब्यात ठेवला.

बीड, जालना हे मतदारसंघ कमळासाठी अत्यंत अनुकूल. कमळ फुलायला चिखल लागतो. आणि या दोन मतदारसंघात एका पावसात सगळीकडे चिखलच चिखल होऊन जातो. यापेक्षा वेगळं काही कारण कमळ यायला दिसत नाही. कारण विकास या मतदारसंघात दिसत नाही.

मागच्या टर्ममध्ये दानवेंनी जालन्यासाठी बराच निधी आणला. पण जालन्याचे रस्ते सुधारले नाहीत. स्वच्छतेच्या नावाने बोंब आजही आहे. दानवे नेहमी म्हणतात आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला सत्ता मिळेल. आम्ही इथपर्यंत पोचू. आम्ही फक्त काम करत गेलो. जालन्याच्या लोकांनापण माहित नव्हतं आपल्यावर ही वेळ येईल. आपण एवढ्या खराब रस्त्यावर प्रवास करू. ते फक्त कमळाला मतदान करत गेले. 

13178724 1561828620777099 7332021896048867278 n

एकेकाळी बीजेपीचे फक्त दोन खासदार होते. लोक चिडवायचे. देशात सरकार चालवणार कोण? ज्यांचे खासदार दोन. पण गंमत अशी झाली की सत्ता आली आणि दोनच लोकांनी कारभार चालवायला सुरुवात केली. मोदी आणि शहा. बाकीचे सगळे फक्त साक्षीदार.

रावसाहेब दानवे काही दिवस या सरकारमध्ये मंत्री झाले होते. त्यांच्याकडे खातं होतं consumer affairs आणि उपभोक्ता मंत्री. हे खातं कोणतं हेच माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कळत नव्हतं असं दानवे गमतीने म्हणत. कायर्कर्त्यांना खातंच माहित नसेल तर त्या खात्याशी संबंधित काम तरी कसं घेऊन जायचं मंत्र्याकडे हा प्रश्न होता. त्यात दिल्लीत गेल्यापासून रावसाहेबांचा सूर हरवल्यासारखं झालं होतं. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषांशी त्यांचं जुळत नाही.

तरी मोदींच्या पहिल्या मंत्रीमंडळात एक सोय होती. पन्नास टक्के मंत्री लोकांना पाच वर्ष झाली तरी माहित झाले नाहीत. रावसाहेब तसे इतरांसारखे निभावून गेले असते. 

पण इकडे महाराष्ट्रात फडणवीस यांच्या रूपाने एक ब्राम्हण मुख्यमंत्री पक्षाने दिला होता. त्यात खडसे यांची नाराजी बहुजन समाजाला दुरावणारी ठरेल असं वाटू लागलं होतं. म्हणून रावसाहेब दानवे यांच्या रुपात एक मराठा प्रदेशाध्यक्ष देऊन मलमपट्टी करायचं ठरलं. पण जेव्हापासून ते प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून हि मलमपट्टी बीजेपीला सहनही होत नव्हती आणि सांगता पण येत नव्हती. त्याला कारण होतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विधाने.

रावसाहेब दानवे खरंतर शून्यातून वर आलेले आहेत.

ते पहिल्यांदा पंचायत समितीचे सभापती झाले होते तेंव्हा त्यांच्या गावात खबरसुद्धा नव्हती. भोकरदनमधली विजयी मिरवणूक आटपून मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन रावसाहेब रात्री आपल्या गावात गेले. अपेक्षा होती की गावात ताशा असेल. मिरवणूक निघेल. पण गाव सुमसाम. झोपी गेलेलं. रावसाहेब घरी गेले. जेवायला काही नव्हतं. तुराटीनी पिठलं हाटून दिलं आईनी. भाकरी होईपर्यंत धीर नव्हता. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापतीने पहिल्या रात्री मित्रांसोबत फक्त पिठलं खाऊन विजय साजरा केला.

पुढे रावसाहेब महाजनांच्या जवळ गेले.

जालन्यात पुंडलिक हरी दानवे हे बीजेपीचे एकमेव ज्येष्ठ नेते होते. खासदार होते. पण प्रमोद महाजनांना नवीन टीम बांधायची होती. आपल्या मर्जीतली. त्यांनी रावसाहेब दानवेना बळ द्यायला सुरुवात केली. एकदा रावसाहेब दानवेना डोंबिवलीहून निरोप आला. निवडणूक आहे. प्रचाराला या. दानवेंनी घरी सांगितलं. गावात सांगितलं. सांगणारच. संपूर्ण बीजेपीत त्याकाळी पंचायत समिती सभापती म्हणून एकमेव दानवे निवडून आलेले होते.

त्यात डोंबिवली म्हणजे मुंबईच. मुंबईहून प्रचाराला बोलवलं म्हणून सगळीकडे कौतुक सुरु झालं. निरोप द्यायला लोक जमले. थाटात दानवे डोंबिवलीत पोचले. तिथे गेल्यावर दानवेना डोंबिवलीच्या नेत्यांनी पोस्टर आणि डिंक दिला. पोस्टर चिटकवा म्हणून सांगितलं. रावसाहेबांच विमान जमिनीवर आलं. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय चीज आहे याची त्यांना ओळख होऊ लागली.

बीजेपीचा एखादा निवडून आलेला सरपंच असला तरी नेते देव आल्यासारखे उठून उभे रहायचे. गुलाल वर्षानुवर्ष अंगावर पडायचा नाही असा काळ होता. त्यात रावसाहेब दानवे यांच्यासारखे हमखास निवडून येणारे लोक किती महत्वाचे असले पाहिजे होते. पण बीजेपीने महत्व दिलं नाही असं म्हणा किंवा दानवेना ते महत्व मिळवता आलं नाही असं म्हणा. दानवे महाराष्ट्र काय मराठवाड्याचे पण नेते होऊ शकले नव्हते. जालन्यात अडकून पडले होते. कार्यकर्ते त्यांना पत्र मागायला यायचे.

दानवे कार्यकर्त्याला सांगायचे, माझं पत्र घेऊन काय करतो? काही फायदा नाही होणार. तू माझं शर्ट घे. आता काढून देतो. काही कामाला त येईल. पत्र कशाला घेतो? भोवतालचे लोक हसायचे. कार्यकर्ता हसायचा. प्रश्न तसाच.

हा गमती जमतीचा स्वभाव सोबतच्या माणसांना खुश करणारा असतो.

पण राज्याच्या नेतृत्वासाठी काम पाहिजे. विषयाचं गांभीर्य पाहिजे. ते नसल्याने दानवेना राज्यमंत्रीपद मिळण्यासाठी २०१४ पर्यंत वाट पहावी लागली होती. मंत्रीपद भेटल्यावर त्यांची प्रतिक्रिया सूचक होती. म्हातारपणात पोरगं झाल्यासारखा प्रकार वाटला त्यांना.

त्यानंतर मोदींना भेटायला किती खटपट असायची याचं वर्णन ते नेहमी रंगवून सांगतात. मोदी परदेशातून आले. त्यांना भेटायला सगळे मंत्री गोळा झाले. दानवे लांब होते. मोदींचं लक्षच गेलं नाही. मग रावसाहेबांनी आयडिया केली. मोदी बाहेर पडताना आपण त्यांना दिसलो पाहिजे अशा जागी उभे राहिले. 

मोदींचं लक्ष गेलं. मोदींनी त्यांच्याकडे बघून इशारा केला. भेटायला बोलवलं. एवढे सगळे लोक सोडून आपल्याला भेटायला बोलवलं म्हणून रावसाहेबांना आनंद वाटायच्या ऐवजी चिंता वाटली. आता मंत्रीपद काढून घेतात का काय? अशी भीती वाटली. मोदींच्या ऑफिस मध्ये टेबल समोर दोन खुर्च्या. लांब भिंतीपाशी सोफा. जास्त जवळ कशाला बसायचं म्हणून रावसाहेब लांब सोफ्यावर बसले. मोदींनी सांगितलं तुम्ही प्रदेशाध्यक्ष. मंत्रीपद जाणं हे दानवेंना अपमानास्पद वाटलंच नाही. उलट प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली त्या रात्री त्यांना झोप आली नाही. ह्या अंगावरून त्या अंगावर करत राहिलो असं ते भाषणात सांगतात.

रावसाहेब पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले.

म्हणजे प्रमोद महाजनांनी त्यांना बळेच उभं केलं. दानवे स्वतःच भिंती रंगवत होते. पण त्यांनी पक्षाचा मतदारसंघातील उमेदवार एवढच रंगवून ठेवलं. स्वतःचं नाव टाकलं नाही. कारण त्यांना विश्वास नव्हता तिकीट फायनल होई पर्यंत. तिकीट फायनल झाल्यावर त्यांनी पुन्हा आपलं नाव रंगवलं. दानवे यांच्यात क्षमता होती. पण आत्मविश्वास नेहमीच कमी पडला. म्हणून त्यांच्या नंतरचे लोक त्यांना खूप मागे टाकून पुढे निघून गेले. एकेकाळी दानवे यांच्या पक्षाची निशाणी होती नांगरधरी शेतकरी. दानवे घोषणा द्यायचे.

जाऊन सांगा घरोघरी. गरीबाचा कैवारी, नांगरधारी शेतकरी.

पण पुढे निशाणी कमळ झाली. दानवे नांगरधारी शेतकरी विसरले. फक्त विसरले नाही तर त्या शेतकऱ्याबद्दल बोलताना त्यांची जीभ सैल सुटली. आज शेतकरी वर्गात त्यांनी आपलं नाव अतिशय खराब करून घेतलंय.

पण दानवे पहिल्यापासून सुदैवी आहेत. अर्जुन खोतकर यांनी खूप आव आणला. अर्जुन दानवाचा वध करणार अशा घोषणा केल्या. पण शेवटी अर्जुन खोतकर शांत झाले. बच्चू कडू यांनी पण जालन्यात निवडणूक लढवणार असं जाहीर करून माघार घेतली. रावसाहेब दानवेना २०१९ ची निवडणूक अतिशय अवघड जाईल असं वाटत होतं. कॉंग्रेसने विलास औताडे यांना उमेदवारी दिली. औताडे यांनी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन पण करायची तसदी घेतली नाही. आणि दानवे नेहमीप्रमाणे नशीबवान ठरत लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले.

दानवे नेहमीप्रमाणे नशीबवान ठरले. खासदार होवून पुन्हा मंत्रीपदावर थाटात बसले. 

आज सकाळपासून मात्र रावसाहेब दानवे पुन्हा चर्चेत आले होते. कारण होत मंत्रिमंडळ विस्तार. आज मोदींनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार केला. अनेक जुन्या मंत्र्यांना नारळ दिला. यात आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, सदानंद गौडा अशा अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या दुर्दैवी यादीत सकाळपासून रावसाहेब दानवे यांचं देखिल नाव झळकत होतं. 

अनेकांनी खात्रीपूर्वक दानवे मंत्रिमंडळातून गेले अशीच बातमी लावली. पण दिवसभरात दानवेंनी कोणती चक्रे फिरवली काय माहित पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील एक पाऊल मागे घ्यावं लागलं. ऐनवेळी दानवेंच्या ऐवजी प्रकाश जावडेकर यांना डच्चू दिला.

रावसाहेब दानवेंनी आपलं राजकारणातलं महत्व अबाधित राखलंय.

एक मात्र खरं आहे. दानवे खरंच बारा भोकशाचा पाना आहेत. पाना कशीबी सायकल खोलतो आणि कशीबी फिट करतो. फक्त त्या सायकलवर पाना स्वार होऊ शकत नाही. पाना नेहमी दुसऱ्यासाठी फिटिंग करत असतो. सेटिंग करत असतो. काम झालं की पाना कुठं लटकून ठेवायचा हे दुकानदाराला चांगलं माहित असतं. दानवे मंत्री झाले तरी आजही त्यांच्या नशिबात  कुठंतरी लटकून राहणं आलं आहे हे मात्र तितकंच खरं. 

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.