एक बातमीमुळे राहूल कुलकर्णींना अटक झाली होती, मग वडेट्टीवारांवर कारवाई का नाही.?

काल दुपारी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील लॉकडाऊन शिथिल करत असल्याची बातमी दिली. यात त्यांनी हे लॉकडाऊन हटवण्यासाठी एकूण ५ टप्पे असल्याचं सांगितलं.

यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असून तिथले निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मंत्री वडेट्टीवार यांच्या या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.

या १८ जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काही ठिकाणी पेढे वाटण्यात आले, आणि नाशिकमध्ये तर चक्क फटाके फोडल्याची देखील बातमी पाहायला मिळाली. त्याचं कारण पण साहजिक होतं.

व्यापाऱ्यांना मागच्या २ महिन्यांपासून बंद असलेली दुकान उघडायला मिळणार होती. अनेकांचं सुटलेलं काम पुन्हा मिळणार होतं. जळगावचा तर एक जण सांगतं होता, मालकांनी फोन करून सांगितलं उद्यापासून दुकान उघडणार आहे म्हणून. एकूणच राज्यात आनंदाची परिस्थिती होती.

पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली.

ज्यात असा कोणताही निर्णय झाला नसून राज्यातील निर्बंध हटवण्यात आलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. इतकंच नाही तर नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं देखील सांगण्यात आलं.

महाराष्ट्र सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर महाराष्ट्रभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारमध्ये ताळमेळ आहे कि नाही अशी विचारणा केली जाऊ लागली.

अनेकांनी खोटी माहिती दिली म्हणून विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलं. सोबतच लॉकडाऊन हटवला नसून देखील अफवा पसरवली म्हणून कारवाई केली जावी अशी मागणी केली.

यानंतर विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना यू टर्न घेतला.

ते म्हणाले, अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही. मला फ्लाईट पकडायची होती म्हणून मुंबईमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये निर्णय तत्वतः मान्य झाला आहे हे सांगायचे राहून गेलं. सोबतचं महाराष्ट्रातील १८ जिल्हे उद्यापासून अनलॉक होत आहेत हे मी नव्हे तर प्रसारमाध्यमांनी सांगितलं, असं देखील ते म्हणाले.

मी त्या खात्याचा मंत्री आहे त्यामुळे बैठकीत तत्त्वतः निर्णय झाल्यानंतर ते जाहीर करण्यासाठी मला कोणाला विचारायची किंवा सूचनांची गरज नाही. तत्त्वतः निर्णय झाल्यानंतर आता महाराष्ट्र अनलॉक होण्याची प्रक्रिया कशी राहील, त्याचे टप्पे कसे असतील हे उद्या सकाळी नऊ वाजता स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील असं देखील वडेट्टीवार म्हणाले होते. 

विजय वडेट्टीवार यांनी अफवा पसरवली का?

असा यु-टर्न घेतला म्हणून केलेले वक्तव्य आणि त्यातून झालेलं नुकसान माघारी घेता येतं नाही. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी अफवा पसरवली असं म्हणण्यास जागा आहे.

कारण आता मुद्दा असा आहे कि,

मंत्री महोदय जबाबदार पदावर आहेत, त्यातचं राज्यासह देशात आरोग्य आणीबाणी आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या निर्णयांना आणि वक्तव्यांना अत्यंत महत्व प्राप्त होतं असते, हे कोणीही नाकारणार नाही. कारण त्यामुळे संपूर्ण राज्य प्रभावित होण्याची शक्यता असते.

त्यामुळेच मंत्री वडेट्टीवार यांनी देखील असे निर्णय जाहीर करताना अत्यंत जबाबदारीने जाहीर करणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालेलं दिसून येतं नाही. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन हटवत असल्याची अफवा पसरत गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

बर राज्यात आरोग्य आणिबाणी लागू असताना एपिडमीक ॲक्ट १८९७ लागू आहे. या ॲक्टनुसार सर्वसामान्य व्यक्तींवर देखील गुन्हे होत असतात त्याचसोबत साथीच्या आजारांना आमंत्रण देणारी वक्तव्य, कृती करु नये म्हणून जबाबदार व्यक्तींवर देखील कारवाई होते. असच एक उदाहरण मागच्या वर्षी ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी यांच्या बाबतीत घडलं होतं.

अफवा पसरवल्या प्रकरणी राहुल कुलकर्णी यांच्यावर कारवाई झाली होती.

याआधी अफवा पसरवल्याच्या आरोपांमुळे गतवर्षी ABP चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यावर कारवाई झाली होती. त्यावेळी हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं. त्याचं पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली जातं आहे.

यात पत्रकार राहुल कुलकर्णी यांना एक न्याय आणि वडेट्टीवार यांना एक न्याय का? असा देखील प्रश्न विचारला जातं आहे.

मात्र मुद्दा असा कि मंत्री वडेट्टीवार यांच्यावर कारवाई होऊ शकते का? 

या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला आधी पत्रकार राहुल कुलकर्णी यांचं प्रकरण काय आहे ते समजून घ्यायला हवं. 

१४ एप्रिल २०२०. देशात कोरोनाची पहिली लाट सुरु होती. ती रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी १४ एप्रिल रोजी मोदी यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करत तो ३ मेपर्यंत केला.

मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं मंगळवारी १४ एप्रिलला सकाळी ९ ते ११. ३० या वेळेमध्ये दाखवलं होतं. यावेळी राहुल कुलकर्णी यांनी दक्षिण मध्य रेल्वेकडून काढण्यात आलेल्या एका पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचे उल्लेख त्यांनी वार्तांकन करताना म्हटले होते.

यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकात गर्दी झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

यानंतर त्याच दिवशी साधारण ४.४५ च्या दरम्यान वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर ‘आम्हाला गावी जायचं आहे. परवानगी द्यावी’ अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर परराज्यातील प्रवाश्यांची गर्दी उसळली. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला. अखेर दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली होती.

मात्र ही गर्दी राहुल कुलकर्णी यांच्या याच वृत्तानंतर जमल्याचा आरोप झाला, आणि त्यानुसार राहुल कुलकर्णी यांना त्यासाठी दोषी देखील धरण्यात आलं. सोबतच वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा (CR 291/20 ) कलम 117, 188, 261, 270, 505 B 3 epidemic act.1897 ) दाखल केला.

त्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी उस्मानाबादेत अटक करून मुंबईला घेवून जाण्यात आलं. त्यासाठी वांद्रे पोलिसांचं एक पथक सकाळी उस्मानाबाद मध्ये दाखल झालं होतं. त्यानंतर १६ एप्रिल रोजी वांद्रे सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुढे ४ महिन्यानंतर त्या आरोपातून मुंबई पोलिसांनी कुलकर्णी यांना निर्दोष ठरवलं होतं.

त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील अशा प्रकारची कारवाई होऊ शकते का?

याबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने राहुल कुलकर्णी यांच्याशीच संपर्क केला. ते म्हणाले,

माझ्या बाबतीतील जे प्रकरण होतं ते एपिडेमिक ऍक्ट अंतर्गत झाली असली तरी तो एकप्रकारे माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता. कारण २ दिवस आधीच वाधवान यांचं प्रकरण झालं होतं. त्यामुळे एकप्रकारे ती संपूर्णपणे सूडबुद्धीनं केलेली कारवाई होती. सरकार त्यासाठी सर्वोच्च पातळीवर गेले होते. त्यामुळेच पोलिसांना माघार घ्यावी लागली होती.

त्यामुळे माझ्या आणि वडेट्टीवार यांच्या प्रकरणामध्ये थोडा फरक आहे. वडेट्टीवार यांच्या बाबतीमधील जे प्रकरण ते अधिक गंभीर यासाठी आहे कारण सरकारमधील एखादा मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे बोलतात, आणि त्यातून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही हे लक्षात येत, तर अशा बेजबाबदार पणा बद्दल मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं कि नाही याचा पण विचार करायला हवा.

सोबतच वडेट्टीवार यांच्या बाबतीमधील हे पहिलंच प्रकरण नाही. याच्या आधी देखील त्यांनी मुंबईत लोकल सुरु होणार वगैरे अशी वक्तव्य केली होती.

कुलकर्णी पुढे म्हणाले, आता राहिला प्रश्न गुन्हे दाखल होण्याचा. तर बेजबाबदार पणाच्या वक्तव्याबद्दल वडेट्टीवारच काय मंत्रिमंडळातील अर्धा डझन पेक्षा जास्त मंत्र्यांवर गुन्हे दाखल होतील. मुळात दाखल व्हायला पाहिजेत. कालच त्यांनी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे जो एपिडेमिक ऍक्ट यांना लावला, किंवा त्या अंतर्गत हजारो सामान्य माणसांवर गुन्हे दाखल केले. त्या तुलनेत वडेट्टीवार यांचा तर महाभयंकर गुन्हा आहे. त्यामुळे त्यासंबंधातून तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. कारण लोकांना वडेट्टीवार यांची बातमी ऐकून उत्साह होता, दिलासा मिळाला होता.

महाराष्ट्राच्या बाबतीत आणखी वाईट एक गोष्ट बघायची म्हंटली तर प्रशासकीय दृष्ट्या दशकभरापूर्वी बघितलं जात होतं तिथं वारंवार दिसून येत आहे कि ना राजकीय पातळीवर समन्वय आहे ना प्रशासकीय पातळीवर. याच एक उदाहरण म्हणजे एका जिल्ह्यातील अधिकारी एक निर्णय घेतो, दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी दुसराच निर्णय घेतो हे सातत्यानं बघायला मिळतं,

असं हि कुलकर्णी म्हणाले.

आता या सगळ्या गोंधळानंतर, समन्वयाच्या अभावानंतर मुख्यमंत्री आणि राज्य सरकार काय निर्णय घेणार? वडेट्टीवार यांच्यावर कारवाई होणार का? आणि झाली तर काय? हे पुढे बघावं लागणार आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.