ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून सामान्य घरातला पोरगा आशियातला पहिला ‘ग्रँडमास्टर’ झाला

बुद्धिबळ म्हणजेच चेस हा गुंतागुंतीचा खेळ खेळतांना खेळाडूच्या डोक्याचा चांगलाच कस लागतो. भले भले या खेळात गारद होतात. हा खेळ जगात खेळला जात असला तरी आजही या खेळावर युरोपातील खेळाडूंचा वरचष्मा आहे. अनेक नामवंत चेस प्लेयर युरोप किंवा वेस्टर्न कंट्रीज मधले असतात. 

मात्र स्वातंत्र्यापूर्वी भारतात सुद्धा एक खेळाडू होता जो त्या काळातील प्रसिद्ध चेस प्लेयर होता. ज्याने सहा वर्ष वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेत्या जोस राउल कॅपाब्लांसा याला हरवून जगात आपली छाप सोडली आणि आशिया खंडातील पहिला ग्रँडमास्टर झाला होता.

त्या खेळाडूचं नाव होतं मीर सुल्तान खान…

मीर सुलतानाचा जन्म फाळणीपूर्वीच्या पंजाब राज्यातल्या एका सामान्य घरात झाला होता. तो लहानपणी आपल्या भावंडांबरोबर चेस खेळायचा. त्यामुळे त्याच्या मनात चेस खेळण्याची आवड वाढत होती. त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील मिया नदीम दिन यांनी मीर सुलतानाला चेसच्या आणखी वेगवेगळ्या क्लुप्त्या शिकवायला सुरुवात केली.

वडिलांनी शिकवलेल्या क्लुप्त्यांमुळे तो इतर मोठ्या मंडळींबरोबर सुद्धा चेस खेळायला लागला होता. वडील जमीनदार असल्यामुळे बाकी काही जबाबदाऱ्या त्याच्यावर नव्हत्या. त्यामुळे मीर चेसवर चांगलं लक्ष केंद्रित करून खेळातल्या भारतीय पद्धतीच्या डावपेचांनी प्रॅक्टिस करत होते.

त्याचे खेळ बघून पंजाबमधले एक जमीनदार सर उमर तिवाना हे फार प्रभावित झाले होते. सर तिवाना यांनी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत चांगलीच उठबस होती. त्यांचे लंडनमधील अनेक लोकांशी चांगले संबंध होते. त्यांनी शेजारच्या गावात मीर सुलतान याला आपली एक जमीन दिली आणि त्यावर मीरच्या चेस प्रॅक्टिसची व्यवस्था करून दिली. त्यासाठी चेस बोर्ड आणि लागणाऱ्या पैशांची सुद्धा मदत त्यांनी केली. 

जेव्हा या नवीन अकादमीत मीर सुलतान प्रॅक्टिस करत होता त्याच दरम्यान १९२८ मध्ये ऑल इंडिया चेस चॅंम्पियन्शिप आयोजित करण्यात आली होती. 

त्यात मीर सुद्धा सहभागी झाला आणि त्यात बाजी पण मारली. मीर सुलतानच्या विजयामुळे सर उमर आनंदित झाले आणि ते थेट मीर सुलतानाला थेट लंडनला घेऊन गेले आणि त्याला इंपीरियल चेस क्लबचा सदस्य बनवलं. त्या काळात चेस हा श्रीमंत आणि धनाड्य लोकांचा खेळ होता आणि याला खेळण्यासाठी क्लब मध्ये सदस्यत्व असणं गरजेचं होतं. त्यामुळे इंपीरियल क्लबमध्ये सदस्यत्व मिळाल्यामुळे मीरला मोठी संधी उपलब्ध झाली होती. 

आजपर्यंत चेसच्या भारतीय डावपेचांचा अभ्यास करणाऱ्या मीरला अगदी वेगळ्या पद्धतीच्या वेस्टर्न डावपेचांचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली होती.

मीर वेस्टर्न पद्धतीला शिकतच होता त्याच दरम्यान लंडनमध्ये ब्रिटिश चेस चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. मीर वेस्टर्न पद्धतीत पुरेसा पारंगत झालेला नव्हता तरी सुद्धा त्याने चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्यकारक रीतीने विजयी सुद्धा झाला. 

ही चॅम्पियनशिप ब्रिटिशांची होती आणि त्यावेळी ब्रिटिशांचं साम्राज्य जगभर पसरलेलं होतं त्यामुळे या चॅम्पियनशिपमध्ये विजयी होणं  हे त्या काळातलं सगळ्यात मोठं सन्मान मानलं जायचं. 

त्या यशानंतर मीरला आणखी वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचे आमंत्रण येऊ लागले होते. मीरने सुद्धा त्या आव्हानांना स्वीकारलं आणि वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हायला लागला होता. एकापाठोपाठ एक आलेल्या स्कारब्रॉट टूर्नामेंट, हॅम्बर्ग ऑलिम्पियाड, लीग टूर्नामेंट यांसारख्या मोठं मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने विजय मिळवला.

या सगळ्या टूर्नामेंट तर महत्वाचं होत्याच परंतु १९३० मध्ये पार पडलेल्या ११ व्या हॅस्टिंग ख्रिसमस चेस फेस्टिवलमुळे मीरच्या नावाचा जगभर डंका वाजला होता. कारण या स्पर्धेत मीरने तब्बल सहा वेळ वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेत्या जोस राउल कॅपाब्लांसाला हरवलं होतं. जोसला चेसमध्ये हरवणे ही त्या काळातली सगळ्यात मोठी गोष्ट होती. 

त्यामुळेच जोस राउल कॅपाब्लांसाने आपल्या आठवणींमध्ये मीरचा उल्लेख ‘चेसचा जिनियस’ असा केला होता.

जोसनंतर मीरने अनेक चेस प्लेयर्सला हरवलं होतं त्यात फ्रेंच-पोलिश चेस प्लेयर सेविली टार्टाकॉवर, तसेच प्राग इंटरनेशनल टीम टूर्नामेंटमध्ये पोलिश चेस मास्टर अकीबा रुबिनस्टीन आणि चेक प्लेयर सालो फ्लोहर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. 

त्यानंतर चेसचे विश्वविजेते खेळाडू अलेक्जेंडर अलेखाइन यांच्यासोबत मीरची चेस मॅच झाली. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये झालेली ही मॅच चक्क ड्रॉ झाली. त्यामुळे अलेक्जेंडर अलेखाइन आणि मीर हे दोघेही सामान पातळीवर येऊन ठेपले. 

मीरच्या या यशाचं गमक त्याच्या स्वतःच्या शैलीत होतं. मीर चेसची ओपनिंग अगदी साधेपणाने करायचा मात्र जेव्हा खेळाचा शेवट होण्याची वेळ यायची तेव्हा तो असे डावपेच आखायचा की प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने असलेली बाजी क्षणात बदलून टाकयचा. खेळ खेळतांना स्वतःवर कंट्रोल ठेऊन कठीणात कठीण प्रसंगी सुद्धा स्ट्रेसमधून बाहेर पाडण्याचं कसब त्याच्याकडे होतं त्यामुळे त्याला ‘एंड गेमचा मास्टर’म्हटलं जायचं.

मीरने आपल्या खेळामुळे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात भारताची मान उंचावली होती. त्याच्या या यशामुळे त्याला आशिया खंडातील ग्रँडमास्टर म्हटलं जायचं.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.