राजाने येताना भोपळा आणला आणि मिरजकरांनी त्याचा सतार बनवून गावाला प्रसिद्ध केलं..

मिरज हे पटवर्धन राजाचं संस्थान. पेशवाईत मिरजेची ख्याती वाढली ती पटवर्धनांमुळे. आजूबाजूचे लोक मिरज संस्थानात राजाश्रय मागण्यासाठी येत असत. असच एक कुटूंब मिरजेत आलं,

या कुटूंबाच आडनाव शिकलगार. 

शिकलगार या कुटूंबाला मिळालेल आडनाव हे त्यांच्या व्यवसायामुळे मिळालं होतं. ही मंडळी राजदरबारासाठी शस्त्र तयार करण्याची कामे करत. शिकलगार कुटूंब मुळचं विजापूरमधल्या शिखर्जीचं. त्यानंतर कवठेमहांकाळला ते स्थायिक झालं. राजाने त्यांना कवठेमहाकाळची वतनदारी दिली. पुढे पटवर्धन संस्थानात या कुटूंबातले काही सदस्य स्थलांतरित झाले. राजाश्रय मिळावा म्हणून उद्योग शोधू लागले.

याच दरम्यानच्या काळात म्हणजे १८५० च्या काळात भारतात इंग्रज सत्ता पाय रोवत होती. देशविदेशातून भारताच्या दिशेने होणाऱ्या व्यापाराला गती मिळत होती. भारतात सूत, मसाले घेवून जाणे आणि बाहेरील गोष्टी भारतात विकणे असा व्यापार सुरू झाला होता.

यावेळी आफ्रिकेतून भारतात मध आणलं जात असे.

हे मध आणण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या भोपळ्यांचा वापर केला जात असतं. भारतात होणारे भोपळे सर्वसाधारण भाजीसाठी वापरले जायचे पण वाळलेल्या भोपळ्याचा वापर साठवणुकीसाठी केला जायचा त्यासाठी हे आफ्रिकन भोपळे वापरले जातं. असे भोपळे वाळवल्यानंतर पन्नास वर्ष टिकून रहात हे या भोपळ्यांच वैशिष्ट.

पटवर्धन संस्थानचे राजे मुंबईत गेल्यानंतर त्यांनी आफ्रिकेमधून आलेल्या जहाजातून एक भोपळा खरेदी केला. ते मिरजेत आले. भोपळ्यातील मध वापरल्यानंतर तो भोपळा त्यांनी मिरजेच्या शिकलगार कुटूंबातील प्रमुख रिसाज यांच्याकडे दिला.

दरम्यानच्या काळात शिकलगार कुटूंब शस्त्रासोबत शास्त्रीय संगीतासाठी आवश्यक ती सामग्री बनवण्याच्या मागे लागली होती. मात्र त्याचे विशेष असे पुरावे मिळत नाही. अस सांगतात की रिसाज शिकलगार यांनीच या पहिल्या भोपळ्यापासून सतार बनवली.

या घटनेनंतर इतिहास घडला, 

पहिली गोष्ट म्हणजे यामुळे शिकलगार कुटूंब सतारमेकर म्हणून ओळखले जावू लागले आणि दूसरी गोष्ट मिरज या शहराताची ख्याती सातासमुद्रापार पोहचली.

मिरजेतील शनिवार पेठेत आज सतार बनवण्याचा उद्योग चालतो. याचं श्रेय रिसाज सतारमेकर आणि किराणा घराण्याचे संस्थापक प्रसिद्ध गायक अब्दुल करिम खॉं यांच्याकडे जातं.

मिरजेत ही कला वाढू लागली. १८५० नंतर एकामागून एकजण सतार बनवण्यास शिकू लागला. मिरजेच्या गावगाड्यात “सतारमेकर” हे नवं आडनाव सामिल झालं होतं. मात्र मिरजेची सतार जगप्रसिद्ध व्हायचं अजून बाकी होतं.

हे काम केलं अब्दुल करिम खॉं साहेबांनी.

अब्दुल करिम खॉं साहेबांना असाध्य आजाराने पछाडलं होतं. आपल्या आयुष्याचे खूप कमी दिवस राहिलेत म्हणून खॉं साहेब मिरजेत आले. ते साल होतं १९१७ चं. इथल्या दर्ग्यात त्यांनी मन्नत मागितली. आशिर्वाद मिळाले.

अब्दुल करिम खॉं साहेबांना मिरजेची सितार जवळून पहाता आली. ते या सतारीच्या प्रेमात पडले. त्यांच्याच पाठिंब्याने मिरजेची सतार जगप्रसिद्ध होवू लागली. कोणत्याही शास्त्रीय संगीताची सुरवात मिरजेच्या सतारने होवू लागली असे सोन्याचे दिवस मिरजेला आले.

अस सांगतात की त्या काळात मिरजेत सतार उद्योग करणारे किमान चार ते पाच हजार कामगार असावेत. आफ्रिकेतून आणलेल्या भोपळ्याची शेती देखील याच परिसरात सुरू करण्यात आली. आजही हा भोपळा पंढरपूर परिसरात केला जातो.  लाकूड दक्षिण भारतातून आणलं जात. सतार सजवण्यासाठी लागणार उंची सामान उत्तर भारतातून मागवण्यात येत असे.

विलायत खॉं, पंडित रवि शंकर अशा माणसांनी मिरजेची सतार सातासमुद्रापार नेली. त्यानंतरच्या काळात ही जागा इन्स्ट्रूमेंन्टने घेतली. इलेक्ट्रिक्सचा जमाना आल्याने सतार मागे पडू लागली. काळाची पाऊले ओळखून कारागिरांनी या व्यवसायातून हात मागे घेतले. हळूहळू हा व्यवसाय मागे पडतो की काय अशी शंका उपस्थित होवू लागली.

आज मात्र हा व्यवसाय पुन्हा कात टाकण्याचा प्रयत्न करतोय. इलेक्ट्रोनिक्सची भेसळ कलाकारांना कळू लागल्याने पून्हा हॅण्डमेंड सतारीकडे लोक वळू लागले. देशविदेशातून सतारला पुन्हा मागणी येवू लागली.

आज मिरजेतून वर्षाकाठी २ ते ३ हजार सतार विकल्या जातात. जगभरात कुठेही सतार वाजत असेल तर मिरजकर अभिमानाने,

आमच्या गावाचाय है..!

म्हणू शकतात.

मात्र जातीवंत कलाकारांच्या नशिबी उपेक्षा येते त्याचप्रमाणे इतक्या परिश्रमाचे मोल होत नसल्याने आजही सतार बनवणारे कलाकाम मात्र अनेक गोष्टींपासून वंचित आहेत हे देखील खरं.

जाता जाता हा विषय मांडावा म्हणून आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल वरती विनंती करणाऱ्या व हा व्हिडीओ पाठवणाऱ्या पवन डानकर यांचे आभार. 

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
  1. Vd. Chinmay Phadke says

    आपल्या या लेखमालेला मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा. थोडक्यात पण वेगवेगळ्या विषयावर माहिती वाचायला मिळते. लिखाणाची शैली इतकी छान असते की वाचताना मजा येते. आपला हा उपक्रम निरंतर चालू राहो. आपल्या टीमला सलाम !

  2. Atik says

    चूकीची आणि अपूर्ण माहिती आहे बोल भिड़ू
    कृपया पोस्ट करण्याआधी शहानिशा केला असता.
    माहिती हवी असल्यास दिली जाईल पण खोटी आणि अपूर्ण माहिती देऊन लोकांची दिशाभूल कर नका….
    @बोलभिड़ू

    अतीक सतारमेकर
    मिरज
    9522571171

Leave A Reply

Your email address will not be published.