तिचं लग्न झालं आणि त्या रात्री मला ‘गालिब’ भेटला…

कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलो होतो, इतरांचं असतं तसं आमचं पण कोंडाळं होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकत्र असणारं. आम्ही घडलो पण एकत्रच आणि बिघडण्याकडं पावलं टाकली तीही एकत्र. तो फेजच लय डेंजर होता, शिक्षण पूर्ण झालं होतं… पण जॉबचा पत्ता नव्हता. त्यामुळं खिसे रिकामे असायचे आणि घरी पैशे मागायची लाज वाटायची.

अशात एका दोस्ताला जॉब लागला, जॉब लागल्यावर पगार येत नसतोय हे माहीत असूनही भाऊ म्हणाला… पार्टी करु. सगळ्यांनी खिसे मोकळे केले जॉबच्या खुशीत भाऊनं आम्हाला नेलं बारमध्ये. मंद लाईटी, कुठल्याही लोकल बार मध्ये येतो तसा टिपिकल वास. आता आमच्यात एक दोन एक्सपर्ट कार्यकर्ते होते, त्यांनी ऑर्डरी दिल्या आणि त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. आपल्या जिभेला काय ती चव पटत नाही म्हणून आपण ‘कानसेन’ झालो होतो.

तेवढ्यात बारमधल्या खरखर आवाज येणाऱ्या स्पिकरवर गाणं लागलं…

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले 

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…

ब्लूटूथ वाला मोबाईल घेतला, तेव्हाच जगजीतसिंगची गाणी त्यात भरुन घेतली होती. त्यामुळं आवाज ओळखायला वेळ लागला नाही. न पिताच माहोलमध्ये गेलो आणि शेजारच्या टेबलवर बसलेल्या बापाच्या वयाच्या एका माणसानं गाणं ऐकता ऐकता दोन शब्द सांगितले… मिर्झा गालिब.

त्या माणसाच्या ग्लासात असलेल्या गोष्टीची शपथ सांगतो, त्यावेळी ते दोन शब्द ऐकून काहीच वाटलं नव्हतं. आज मात्र त्या दोन शब्दांमध्ये दोस्त आहे, प्रेम आहे आणि शाप म्हणून मिळाल्यासारख्या आठवणी.

शायरी या विषयातला बादशहा, दु:ख आणि दुर्दैव या दोन गोष्टींचा जवळचा सखा आणि बरंच काय काय म्हणजे गालिब. मिर्ज़ा असदउल्लाह बेग ख़ान इतकं लांबलचक नाव असणाऱ्या गालिबचं आयुष्य अजिबात सोपं नव्हतं. आयुष्यभर तो तुटपुंज्या पेन्शनसाठी झगडला. त्याच्या दुःखांची लिस्ट कितीही मोठी काढली… तरी आपलं मुल न जगण्याचं दुःख गालिबला आयुष्यभर बोचत राहिलं, ते सगळ्यात मोठं दुःख. त्याला आणि उमराव बेगमला सात मुलं झाली पण त्यातलं एकही जगलं नाही.

गालिबकडे एक वेगळाच ॲटीट्युड होता… दोस्त भले गरिबीत जगला पण त्यानं कधी नोकरी केली नाही. पेन्शनसाठी लई फिरला, अमाप दारु पिली आणि दिल्लीच्या त्याच्या हवेलीत त्याचा देह हे जग सोडून गेला, पण शब्द आजही कधी कुठल्या बारमध्ये, कधी कुठल्या पुस्तकात आणि कधी कुठल्या न पाठवलेल्या पत्राच्या शेवटी सापडतात.

तिचे डोळे असेच एकदा गर्दीत सापडले होते, नजर खिळते म्हणजे काय होतं हे त्यादिवशी पहिल्यांदा समजलं. कानात झुमके, डोळ्यांमध्ये काजळ आणि असा चेहरा ज्याला काय म्हणायचं हे अजून समजलं नाही. त्यात तिनं गालावर आलेले केस मागे घेतले.. तेव्हा वाटलं…

आह को चाहिए इक उम्र असर होते तक 

कौन जीता है तेरी ज़ुल्फ़ के सर होते तक...

आपला एन्डगेम त्या एकाच क्षणात झाला. बरं कॉलेजचे दिवस होते, त्यामुळं ती कोण, कुठल्या वर्गात हे शोधायला काय वेळ लागला नाही. मैत्री करायला लायब्ररीसारखी सुंदर जागा होती… त्यामुळं पहिल्या मिठीला पुस्तकांचा वास राहिला, हेही खरं.

हम वहाँ हैं जहाँ से हम को भी 

कुछ हमारी ख़बर नहीं आती…

कॉलेज संपेपर्यंतचे दिवस वरच्या दोन ओळींसारखीच गेले. कँटीन, पार्किंग, टपरीवरचा चहा, चांगली हॉटेलं अशी एक जागा नव्हती, जिनं आमच्या भेटी पाहिल्या नाहीत, जिनं आमच्या भविष्याची स्वप्नं ऐकली नाहीत.

पुढं कॉलेज संपलं, खरं आयुष्य सुरू झालं… रात्री कानात हेडफोन टाकून बोलताना तिनं चोरट्या आवाजात सांगितलं, ‘घरचे स्थळ बघतायत.’ उत्तर काय द्यायचं माहीत नव्हतं, पण सोबत स्वप्न पाहिलेली त्यामुळं आपलं लग्न होणार याचा एक वेगळाच माज होता. आपलं एकट्याचं तरी ठरलं होतं…

जान तुम पर निसार करता हूँ 

मैं नहीं जानता दुआ क्या है…

भेटल्यावर तिचे डोळे पहिल्यारखे दिसले नाहीत. त्यात पाणी होतं का भीती हे आजवर कळलं नाही. आणि जॉब नसलेल्या पोराला माझ्या घरचे का हो म्हणतील? या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला हवं होतं, हे सुद्धा!

पुढं जे अनेकांच्या आयुष्यात घडलं ते आमच्याही. आपण ठरवून व्यसनांपासून दूर राहिलो खरं. पण मग एक दिवस जॉब लागलेला मित्र भेटला. तू कसा आहेस? या प्रश्नाआधी प्रश्न आला, तिचं काय झालं रे?

आगे आती थी हाल-ए-दिल पे हँसी 

अब किसी बात पर नहीं आती…

उत्तरादाखल त्यानं बारमध्ये नेलं, बार तोच, टिपिकल वास येणारा, मंद लाईटीवाला. तिथं परत तीच जगजीतल्या आवाजातली गाणी आणि हातात ग्लास घेऊन बसलेला बापाच्या वयाचा माणूस… सगळं सेम. फक्त एक गोष्ट बदलली होती… मला मिर्झा गालिब माहित होता.

जगजीतच्या आवाजात शब्द आले…

हम को उन से वफ़ा की है उम्मीद  

जो नहीं जानते वफ़ा क्या है…

हातात ग्लास असलेल्या मित्रानं ताजी बातमी दिली की, तिचं लग्न झालं रे, तेही आज. त्यादिवशी मला मिर्झा गालिब भेटला. सगळी रात्र… कधी जगजीतच्या आवाजात… तर कधी त्याच्या शब्दांत… त्या रात्री बाकी काही नाही पण पहिल्या मिठीवेळी आलेला पुस्तकांचा वास आठवला.. आणि तीही!

इश्क़ ने ‘ग़ालिब’ निकम्मा कर दिया 

वर्ना हम भी आदमी थे काम के…

– मिर्झा गालिब


हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.